विलासरावांच्या आठवणींत डायरीची पानेही बोलकी होतात तेव्हा…

“घरी आल्यावर पप्पांना संध्याकाळी शिर्डीला जायचं असल्याने ते म्हटले दुपारी हॉटेलात जाऊ. तेव्हा मी कालच मांडलेला विचार परत मांडला, “आज नको. नंतर जाऊ. आज राज्यात दुखवटा आहे. आज विलासरावांवर अंत्यसंस्कार असल्याने मला हॉटेलात जाणं बरं नाही.”

 

ब्रेनविशेष | आठवणी 

महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन झाल्यावर श्वेताच्या अनावर होणाऱ्या भावना डायरीवर उतरण्यास वेळ लागला नाही. आज विलासरावांच्या स्मृतिदिनी सात वर्षानंतरही त्याच डायरीची ही पाने उलगडली की, तिचं मन हळहळतं, आठवणींनी अश्रू दाटून येतात. वाचा सविस्तर तिच्याकडूनच…

 

कॉलेजमधून घरी आले तेव्हा, आई व व. आई सोफ्यावर बसल्या होत्या व ‘एबीपी माझा’वर खाली पट्टी सरकली की ‘उद्या ३ वा. अंत्यसंस्कार’ ! काही कळायच्या आतच दुसरी पट्टी आली ‘चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये विलासराव देशमुखांचे निधन!’. हे बघताच मी हादरले, माझ्या पायाखालची जमीन सरकली, माझे दाटून आलेले अश्रू रोखत पप्पांना ते गाडीत असतानाच म्हटले “पप्पा! विलासराव देशमुख वारले!” अजूनही माझा हात चालत नाहीये, माझ्या ह्या भावना व्यक्त करताना.

विलासरावांच्या निधनाने महाराष्ट्रात ज्यांना अत्यंत दुःख झाले असेल, त्यांच्यातील मीही एक. विलासरावांत मला महाराष्ट्राचा एक आशावादी चेहरा दिसायचा. असं मनोमन वाटायचं की, यार आज नाही, पण उद्यातरी विलासराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील व जो २६/११ च्या पूर्वीचा राजकीय स्थिरता असलेला महाराष्ट्र पुन्हा उदयास येईल. औद्योगिक, सांस्कृतिक आणि सोबतच प्रबळ राजकीय नेतृत्त्व असलेला महाराष्ट्र पून्हा उदयास येईल. पण माझे स्वप्न स्वप्नच राहिले.

विलासरावांच्या जाण्याने महाराष्ट्राचं जे नुकसान झालंय, ते न भरून काढता येण्यासारखंय. या मोठ्या नेत्याच्या जाण्यानं महाराष्ट्र पोरका झालाय. आमच्यापुढे आता एकही चेहरा राहिला नाही, की जो प्रबळपणे महाराष्ट्राचं नेतृत्त्व करू शकेल. विलासरावांशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाची मी कल्पनाच करू शकत नाही. मी तिसरीत असताना विलासराव पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख’ हे इतर लहान मुलांसारखे मलाही तोंडपाठ झाले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्यांच्या रुबाबाचा माझ्या मनावर न पुसणारा ठसा उमटला. त्यांची हेअर स्टाईल, त्यांचं हसणं, त्यांची वक्तृत्त्वशैली, त्यांचा पेहराव, चालणं-बोलणं यांत देशमुखी थाट होता.

 

मी सातवीला असेपर्यंत विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मला तेव्हाचा जो महाराष्ट्र आठवतोय, तो प्रत्येक बाबतीत देशात अग्रेसर होता. अनेक उद्योगधंदे महाराष्ट्रात सुरू झाले. वीजपुरवठा मुबलक प्रमाणात महाराष्ट्रात होता. शेतीचा व ग्रामीण भागाचा बहुतांश विकास याच काळात झाला. महाराष्ट्र होता, तेथून बराच पुढे निघून गेला. महाराष्ट्री व मराठी संस्कृतीला त्यांनी मोठा राजाश्रय दिला. कला व साहित्य यांच्या समेलनांस त्यांनी अमूल्य देणगी दिली. पुष्कळ सेझ प्रकल्प महाराष्ट्रार सुरू झाले. त्यांच्या जाण्याने माझ्यासारख्या महाराष्ट्रवादी मुलीने आपल्या अश्रूंनी भावनांचा बांध फोडला.

आज स्वातंत्र्यदिन व पप्पांचा वाढदिवसही. मात्र आजचा हा पहिलाच स्वातंत्र्यदिन आहे की, जेव्हा माझ्यात फारसा उत्साह नाहीये. माझ्या मनात देशाविषयी दरवर्षी ज्या अपार भावना दाटून येतात, त्या येत नाहीयेत. पप्पांना उठल्या उठल्या शुभेच्छा देणारी मी, आज आठवण असूनही वाघ काकांचा फोन आल्यानंतर शुभेच्छा दिल्या, त्याही मोजक्याच उत्साहात. कारण, अर्थातच काल विलासरावांचं झालेलं निधन. काल माझा आवडता नेता हरवला, महाराष्ट्रातील राजहंस निजला.

मी आज एनसीसीत होते. घरी आल्यावर पप्पांना संध्याकाळी शिर्डीला जायचं असल्याने ते म्हटले दुपारी हॉटेलात जाऊ. तेव्हा मी कालच मांडलेला विचार परत मांडला, “आज नको. नंतर जाऊ. आज राज्यात दुखवटा आहे. आज विलासरावांवर अंत्यसंस्कार असल्याने मला हॉटेलात जाणं बरं नाही.” नंतर पप्पा व त्यांचे मित्र परत येताना हॉटेलातून जेऊन आले.

साडेचार-पाचच्या दरम्यान अमित देशमुखने विलासरावांना अग्नी दिला व महाराष्ट्राचा लाडका लोकनेता अनंतात विलीन झाला. एका तेजस्वी सूर्याचा अंत झाला. महाराष्ट्र काँग्रेसचा चेहराच जणू विलासरावांच्या अस्थिसोबत जळत होता. ज्यांच्या हाती महाराष्ट्राच्या उद्याचे भविष्य मी पाहत होते, त्यांना अशाप्रकारे कायमचा रामराम करताना पाहून, बाभळगावला जमलेल्या आयाबापड्यांचा शोक पाहून माझ्याही डोळ्यांतून अश्रुधारा वाहिल्या. पण मी आईला कळायच्या आता त्या पुसल्या.

जो प्रश्न विलासरावांच्या जाण्याने मला पडलाय, त्यावरच आजचा ‘माझा विशेष’ चालू आहे. ‘विलासरावांनंतर महाराष्ट्र काँग्रेसचं काय होणार?’ त्यात एक सहभागी व्यक्तीने म्हटलं ” 82 ची संख्या 50 वर आली, तरी नवल वाटायला नको”. यावरूनच विलासरावांची ताकद किती मोठी होती ते कळतं. त्यांच्यानंतर दोनच प्रबळ नेते महाराष्ट्र काँग्रेसमध्ये उरतात, सुशीलकुमार शिंदे आणि नारायण राणे. मात्र यांच्यातही विलासरावांएवढी ताकद नक्कीच नाही. म्हणूनच मला विलासरावांचं जाणं म्हणजे महाराष्ट्राचं अतोनात नुकसान वाटतंय.

दिल्लीतही शरद पवार यांच्यांतरच ताकदवान चेहरा होते विलासराव देशमुख. त्यामुळेच सोनिया गांधी, मनमोहन सिंग आवर्जून अंत्ययात्रेला उपस्थित होते. जनसागर तर अफाटच होता. अवघा महाराष्ट्र दुःखात बुडालाय. एखादा नेता जाण्याने यशवंतरावांनंतर प्रथमच महाराष्ट्र कष्टी झालाय. आमचा राजा आम्हाला सोडून गेलाय.

आता काय असेल माझ्या स्वप्नातील उद्याच्या महाराष्ट्राचे भविष्य? विलासरावांशिवाय…

 

 

लेख : श्वेता गोराणे (@Shwetta_Indian)

ई-पत्ता : shweta.gorane@gmail.com

 

(संपादन : संपादक, मराठीब्रेन डॉटकॉम)

◆◆◆

 

 

(इथे प्रकाशित होणाऱ्या लेखांतील माहिती आणि विचार हे पूर्णतः लेखकांच्या हक्काधीन असून मराठी ब्रेन त्या विचारांशी सहमत असेलच असे नाही.)

विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: