…तर कल्याण पूर्व-पश्चिम मतदारसंघ स्वतंत्र लढण्याचा शिवसेनेचा पवित्रा !

कल्याण पूर्व आणि पश्चिम विधानसभा क्षेत्राच्या जागा मित्रपक्ष भाजपने शिवसेनेसाठी न सोडल्यास या दोन्ही जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

ब्रेनवृत्त | प्रतिनिधी
कल्याण, २९ सप्टेंबर

वरिष्ठ पातळीवर शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपाबाबत एकीकडे खलबतं सुरू असताना, दुसरीकडे कल्याण शहरात मात्र शिवसेनेने आपला मित्रपक्ष असलेल्या भाजपविरोधातच आक्रमक पवित्रा घेतला आहे. कल्याण पूर्व आणि पश्चिम या दोन जागा  भाजपने शिवसेनेसाठी न सोडल्यास या दोन्ही जागांवर आपला उमेदवार उभा करण्याचा थेट इशारा कल्याण शहर शिवसेनेने दिला आहे. आज संध्याकाळी कल्याण शहर शिवसेना शाखेमध्ये आमदारकीसाठी इच्छुक उमेदवारांनी एकत्र येत हा इशारा दिला.

संग्रहीत छायाचित्र

कल्याणमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा विचार करता शिवसेनेची ताकद भाजपपेक्षा अधिक आहे. कल्याण पश्चिमेत शिवसेनेचे २० आणि पूर्वेत १६ नगरसवेक आहेत. तर भाजपचे कल्याण पश्चिमेत केवळ ६ आणि पूर्वेत ५ नगरसेवक आहेत. या संख्याबळाचा विचार करता शिवसेनेचे पारडे पूर्वीपासूनच या ठिकाणी जड आहे. म्हणूनच कल्याण पूर्व आणि पश्चिम या दोन्ही जागा शिवसेनेला मिळाल्याच पाहिजेत, अशी आक्रमक भूमिका शिवसेना कल्याण शहरप्रमूख विश्वनाथ भोईर यांनी काल मांडली. त्याचबरोबर, जर या जागा यंदाही भाजपच्या वाट्याला गेल्या, तर दोन्ही ठिकाणच्या इच्छुक उमेदवारांपैकी एक जण स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उभा राहील, असा पवित्राही त्यांनी यावेळी घेतला.

महाराष्ट्रातील युतीत हवंय भाजपला मोठा वाटा ?

कल्याण पश्चिमेतील विद्यमान भाजप आमदार आधीच अंतर्गत विरोधकांमूळे चिंतेत आहेत. “विद्यमान आमदारांना त्यांच्याच पक्षातून विरोध असताना मग शिवसेनेने त्यांचे काम का करायचे?” असा सवालही यावेळी शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांनी उपस्थित केला आहे. त्यासाठी येत्या ४ ऑक्टोबरला इच्छुकांमधील एक उमेदवार आपला अर्ज दाखल करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

विधानसभेच्या मुहूर्तावर व्यंगचित्रांतून अशीही जनजागृती ! 

दरम्यान, आधीच स्वकीयांनी निर्माण केलेले बंड विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढ्यात असताना, आता शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्यामूळे पवार यांच्या डोकेदुखीत आणखीनच भर पडली आहे.

◆◆◆

आता पाठवा तुमच्या परिसरातील बातम्या आणि घडामोडींची माहिती थेट ई-मेलने. लिहा writeto@marathibrain.com ला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: