काही नियम शिथिल, मात्र सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक

ब्रेनवृत्त, मुंबई

राज्यात लॉकडाऊनच्या काळातही कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे देशाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ही परिस्थिती पाहता राज्यातील ‘ग्रीन झोन’मध्ये असलेल्या जिल्ह्यांत काही प्रमाणात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत पत्रक काढून ग्रीन झोनमधील नियम शिथिल करण्यासंदर्भात माहिती दिली आहे.

केंद्र शासनाने देशभरातील जिल्ह्यांचे रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तीन झोनमध्ये वर्गीकरण केले आहे. या वर्गीकरणाची यादी देखील केंद्र सरकारने जाहीर केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधताना याविषयी माहिती दिली. राज्यातील उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, वर्धा, गोंदिया, गडचिरोली हे सहा जिल्हे ‘ग्रीन झोन’मध्ये आहेत. ३ मे नंतर राज्यातील ‘ग्रीन झोन’ आणि ‘ऑरेंज झोन’मधील परिस्थिती पाहून काही प्रमाणात मोकळीक दिली जाणार आहे.

● ‘ग्रीन झोन’मध्ये निम्म्या क्षमतेने प्रवासी वाहतुकीस परवानगी

दरम्यान, देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. देशात लॉकडाऊनच्या कालावधीत दुसऱ्यांदा करण्यात आलेली वाढ आहे. या लॉकडाऊनच्या काळात राज्य शासनाने काही गोष्टींमध्ये सुट दिली आहे. राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन संदर्भात वेगवेगळे नियम करण्यात आले आहेत. यात रेड झोनसाठी अतिशय कमी, तर ग्रीन झोनसाठी सर्वाधिक सुट देण्यात आली आहे. यावेळी ‘ग्रीन झोन’मध्ये येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये 50 टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू राहणार आहे.

ग्रीन झोनमधील दारूची दुकाने आणि पान शॉप्स सुरू ठेवण्याचा विचारही सरकार करत आहे. परंतु, दुकानदाराने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. दुसरीकडे, 17 मे पर्यंतच्या लॉकडाऊन काळात बस डेपोमध्ये 50 टक्केच कर्मचारी काम करणार आहेत.

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: