‘सुपरमॉम’ सुषमा स्वराज यांचे निधन !

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली

०७ ऑगस्ट २०१९

देशातील एक कणखर राजकीय नेतृत्त्व व माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज रात्री अकस्मात निधन झाले आहे. सुषमाजी 67 वर्षांच्या होत्या. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांची प्राणज्योत मावळली. देशाने त्यांच्यारूपात एका प्रभावी व संवेदनशील नेतृत्त्वाला गमावले.

दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षणमंत्री, वकील आणि ख्यातनाम वक्त्या असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या सुषमा स्वराज यांचे रात्री निधन झाले. काल रात्री 9 वाजण्याचा सुमारास स्वराज यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातच उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

हृदयविकाराचा झटका येण्याच्या दोन तासांआधी, सायंकाळी 7 वाजता स्वराज यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याबद्दल मोदी सरकारचे कौतुक करणारे ट्विट केले होते. आयुष्यभर मी याच एका क्षणाची वाट बघत होते, असेही या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर लगेच दोन तासात त्यांची प्राणज्योत मावळली आणि देशाने एक बहुआयामी नेतृत्त्व गमावले. देशभरातून व विविध माध्यमांतून सुषमा स्वराज गेल्याची हळहळ व दुःख व्यक्त केले जात आहे.

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात स्वराज यांनी परराष्ट्रमंत्रीपद भूषवले होते. या पदावर पूर्णकाळ काम करणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला ठरल्या. दरम्यान, प्रकृती खालावल्यामुळे स्वराज यांनी यावर्षीची लोकसभा निवडणूक न लढण्याचे ठरवले होते.

ओघवती वक्तृत्व, बाणेदारपणा, कणखर नेतृत्त्व व तेवढीच भावनिकता यासाठी सुषमा स्वराज प्रसिद्ध होत्या. पक्षबाहेरील लोकांशीही त्यांचे संबंध अगदी सौहार्दाचे होते. त्यांच्या जाण्याने देशात एक मोठी राजकीय व मानवीय पोकळी निर्माण झाल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: