‘जो राममंदिर बांधेल, तोच राज्य करेल!’
वृत्तसंस्था
मुंबई, ३ डिसेंबर
‘जो राममंदिर बांधेल, त्यालाच भक्तांनी निवडून द्यावे आणि जे राममंदिर बांधतील तेच देशावर राज्य करतील’, असा इशारा नरेंद्रचार्य महाराज यांनी रविवारी इथे दिला. ते विश्व हिंदू परिषदेने मुंबईत आयोजित केलेल्या एका सभेत बोलत होते.
छायाचित्र स्रोत : ट्विटर
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राम मंदिर बांधण्यासंबंधी कायदा करावा आणि तसा अध्यादेश पारित करण्यात यावा, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे काल मुंबईच्या धर्मसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला उपस्थित स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांनी राम मंदिर बांधणारेच निवडून येणार असल्याचे वक्तव्य केले आहे. ‘राममंदिर हा हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न आहे. हिंदूंची वज्रमुठ काय करू शकते याची जाणीव सरकारला करून देणे गरजेचे आहे. इतर देश जर धर्मासाठी झटत असतील, तर देशातील हिंदूंनी बांगड्या घातल्या आहेत का?’ असा सवालही त्यांनी केला आहे.
राम मंदिरासाठी संसदेने कायदा करावा : रामदेव बाबा
सभेत उपस्थित महाराज नयनपद्म सागरजी यांनी, ‘आदिवासींनी हिंदू धर्मामधून दुरावण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतात मुस्लिम जेवढे सुरक्षित आहेत, तेवढे इतरदेशांत नाहीत’, असे म्हटले आहे.
चांगल्या हिंदूंना राम मंदिर नकोय : शशी थरूर
‘देशात विकासाबरोबर मंदिरही आवश्यक आहे. त्यात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे’, असे प्रतिपादन सभेत उपस्थित गोविंदगिरी महाराज यांनी केले. ‘देशातील सरकारचे कामकाज केवळ रामभक्तांमुळे सुरू असून, जर रामाला मंदिरात बसवले तर हे सरकार अजून ५० वर्षे राज्य करेल’, विधान महामंडलेश्वर विश्वेश्वरानंद महाराज यांनी केले आहे.
◆◆◆