‘शहरी नक्षलवाद : भ्रम आणि वास्तव’ – भाग २

नक्षलवाद हा गंभीर प्रश्न केवळ विषमता विरहित आदर्श राज्य निर्माण करण्याचा आणि शासनाच्या वाईट प्रवृत्ती उजागर करण्यापुरता सीमित नाही, त्याहीपेक्षा कोणत्याही न्याय आणि आधाराशिवाय जे नाहक मारले जात आहेत अशा हजारो निष्पाप भारतीयांचा आहे!

 

पहिल्या भागात आपण ‘शहरी नक्षलवाद’ म्हणजे काय? नक्षलवाद आणि इतर संबंधित संघटना कशा उदयास आल्या आणि त्यांचा देशभर प्रसार कसा होत गेला? ह्या शहरी नक्षलवादी चळवळींची भूमिका काय आहे? या प्रश्नांवर विचार केला आहे. पुढे वाचा ह्या लेखाचा दुसरा आणि उर्वरित भाग…

छायाचित्र स्रोत

● विविध नक्षली फ्रंट संघटना आणि परिषद 

गडचिरोलीतील नक्षलवाद्यांची ‘कमलापुर परिषद’ अशाच नक्षली फ्रंट संघटनांच्या कामाचे प्रतीक आहे. ही परिषद नक्षल परिषद असल्याच्या माहितीमुळे शासनाने त्यावर बंदी आणली होती, तरी या परिषदेला महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेशशिवाय इतर राज्यांच्या मोठ्या शहरांतूनही अनेक लोक आल्याची नोंद आहे. अजूनही अशा शेकडो परिषदा उघड आणि गुप्त, अशा दोन्ही प्रकारे चालतात. कधीतरीच यांच्या आयोजन समितीचे संबंध प्रत्यक्ष नक्षल चळवळीसोबत सिद्ध झाले आहे. अशा १७५ संघटना त्यांच्या नक्षल पार्श्वभूमीमुळे राज्यनिहाय फ्रंट संघटनेच्या शासकीय सूचित आहेत. पण कायद्याच्या चौकटीत कार्यवाही अजूनही शून्यच. यात महाराष्ट्रात दंडकारण्य आदिवासी किसान मजदुर संघटना (DAKMS), क्रांतिकारी आदिवासी महिला संघटना (KAMS), रिवोलुशनरी डेमॉक्रॅटिक फ्रंट (RDF),  विद्रोही सांस्कृतिक चळवळ (विदर्भ), इंडियन असोसिएशन ऑफ पीपल्स लॉयर (IAPL), कमिटी अगैन्स्ट व्हायलांस ऑन वूमन, कबिर कला मंच, आणि चासी मुलिया आदिवासी संगठन अशा प्रसिद्ध संघटनांची नावे आहेत.

अर्थातच, नक्षलवाद वाढीसाठी शहरात काम करणारे, नक्षल हिंसेचे समर्थन करणारे, नक्षलवाद्यांचा अजेंडा शहरात राबविणारे, नक्षलवाद्यांचे रक्षक कोण समजायचे? याचे अनेक प्रमाण नक्षलवाद्यांच्या पार्टी कागदपत्रांमध्येही स्पष्ट आहेत.

२००४ ला भारतातल्या ३५ पेक्षा अधिक भूमिगत नक्षलवादी संघटना CPI (Maoist) पक्षांतर्गत राष्ट्रीय स्तरावर एकत्र आल्या. गेल्या दशकात त्यांनी शहरी भागात जोमाने काम करण्यावर भर दिला. त्यांनी STRATEGY & TACTICS OF THE INDIAN REVOLUTION’ ह्या नावाने त्यांचे पार्टी डॉक्युमेंट प्रकाशित केले. ह्यात फ्रंट संघटना, अर्थातच शहरी नक्षलवादाविषयी स्वतंत्रपणे लिहिले आहे, “The urban movement is one of the main source, which provides cadres and leadership having various types of capabilities essential for the people’s war and for the establishment of liberated areas. Moreover, the responsibility for the provision of supplies, technology, expertise, information and other logistical support to the people’s war too, lies on the shoulders of the urban revolutionary movement itself.” याचे महत्व स्पष्ट करताना ते सांगतात की, राष्ट्रीय स्तरावर शहरातून मोठ्या प्रमाणात लोकांचे अस्तित्व आणि त्यांचा माओवादी चळवळीसाठी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणे आणि समविचारी लोकांना सरळ नक्षल चळवळीत जोडणे महत्त्वाचे आहे.

 

या चळवळींच्याच डॉक्युमेंटनुसार, ‘सर्वदूर क्रांतीच्या उद्देशासाठी, गुरिल्लाह (जंगलातील) झोनच्या विकासासोबतच प्राथमिक स्तरावर शहरी भागात काम करणे, शहरी क्रांतिकारी चळवळ उभारणे,  इत्यादींवर भर देणे महत्त्वाचे आहे.’ एवढेच नव्हे, तर ‘चळवळीचे बळ वाढवायला ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन, ऑर्डीनन्स फॅक्टरी, पॉवर प्लांट, माईन्स इत्यादी औद्योगिक क्षेत्रातील लोकांसोबत संबंध प्रस्थापित करून त्यांच्याशी सयोजन करायला पाहिजे’ असेही त्यांचे मत आहे. सशस्त्र माओवादी क्रांतीसाठी यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास, “Party has to pay special attention to its efforts on key industrial organisations from the beginning and allocate leadership cadres accordingly. We should not forget the dialectical relationship between the development of the urban movement and the development of the people’s war in the countryside. In the absence of a strong revolutionary urban movement, the people’s war in the countryside will face many difficulties.” ह्याकरिता शस्त्राची गरज नाही. त्यांच्या दृष्टीने ह्या चळवळींसाठी सशक्त गुप्त पक्ष, क्रांतिकारी युनायटेड फ्रंट आणि शहरी गुर्रिल्ला दस्ता हे तीन महत्त्वाचे शस्त्र आहेत. त्यांच्या माध्यमातून वर्गसंघर्ष विषयी वातावरण निर्माण करणे आणि लाखो शहरी समूहाचे माओवादी जन-युद्धासाठी समर्थन मिळविणे अत्यंत आवश्यक आहे.

नक्षल चळवळीच्या सुरुवातीच्या उभारीनंतर मधल्या काळात तिला उतरती कळा आली होती. ती उणीव कोबाड गांधीसारख्या शहरातून आलेल्या अनेक लोकांनी भरून काढली. मिलिंद तेलतुंबडे हा असाच शहरी फळीतून तयार होऊन, अनेक आंदोलने उभारत गरजेच्यावेळी भूमिगत झाला. तो महाराष्ट्र नक्षलवादी राज्याच्या समितीचा सचिव आणि केंद्रीय समितीचा सदस्य आहे. ऍड. सुरेंद्र गडलिंग, ऍड. अरुण परेरा, सुधीर ढवळे, सुद्धा ह्याच लोकांच्या संपर्कात आलेले आजचे हे तरुण आहेत. मात्र कदाचित कामाच्या विभागणीनुसार अद्याप ते भूमिगत झाले नसावेत. अरुण परेराच्या प्रयत्नाने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ‘देशभक्ती युवा मंच’ ही विद्यार्थी संघटना उभी झाली. वरवर दिसणाऱ्या तिच्या ‘स्टूडेंट फ्रेंडली’ स्वरूपामुळे शेकडो विद्यार्थी आणि प्राध्यापक तीत सामील झाले.

२००७ पर्यंत खैरलांजीसारख्या अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांबाबत हे सर्व सक्रिय होते. पुढे यातीलच काही विद्यार्थी सरळ नक्षल चळवळीत गेले. या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष अरुण भेलके हा शहरी चेहरा काही सदस्यासह तुरुंगात गेला. पण न्यायालयातून तो बाहेर पडला तेव्हा, मिलिंद तेलतुंबडेची पत्नी (अँजेला सोनटक्के) आणि काही सहकाऱ्यांसह नाव बदलून ‘गोल्डन कॅरिडोर’ ह्या नक्षलवादासाठी पैसा उभारणाऱ्या टीममध्ये भूमिगत झाला. तो पुढे मित्रांसोबत मुंबई, पुणे, नाशिक आणि अहमदाबाद या शहरी भागात क्रियाशील होता. याच काळात झोपडपट्ट्यांमध्ये त्याने आपले नेटवर्क उभे केले. सध्या ATS मुळे तो जेलमध्ये आहे. पण बाहेर पडला की तो पुन्हा नव्या जोमाने कामाला लागणार यात शंका नाही. असे शेकडो मिलिंद, अरुण घडविणारे शहरी नक्षल लोक प्रत्यक्ष हिंसेच्या नियोजनात सहसा प्रत्यक्ष सहभागी नसतात. पण मागील ३०-४० वर्षातील त्यांच्या भूमिकामुळे शेकडो लोक शहरातून नक्षल चळवळीत दाखल झाले आहेत.

अलीकडे नक्षल प्रभावित भागांत पोलिसांचा प्रभाव वाढल्यामुळे तिथेसुद्धा यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. याचेच उदाहरण म्हणजे, अलीकडे शासनाने उत्खनन जाहीर केलेले ग्रामीण भाग लक्षात घेण्यासारखे आहेत. गडचिरोलीच्या एटापल्ली भागात काही लोहखनिज उत्खनन लिज देण्यात आली. अनेक दिवसांपासून बड्या उद्योगपतींना देण्यात आलेले उत्खनन कोणत्याही अटीशिवाय बंद करा, ही मागणी विशिष्ट संघटनेकडून रेटली जात आहे. २०१६ ला ७०-८० नक्षलवादी आणि ४०० च्यावर गावकऱ्यांनी सोबत येऊन ८० ट्रक जाळून खाणकाम बंद पाडले. सुरू असलेले उत्खनन चुकीच्या पद्धतीचे आहे, त्यात शासनाचे भ्रष्ट राजकारण आहे, हे सर्व खरेच, मात्र दुसऱ्या संघटनासुद्धा उत्खननाला विरोध करतात, तेव्हा अशा दुसऱ्या संघटना नक्षलवाद्यांच्या टार्गेटवर येतात. हे समीकरण समझने किचकट असले, तरी शहरी नक्षलवादच्या कामाचे हे उत्तम प्रतीक आहे.

 

● नक्षल फ्रंट संघटना आणि त्यांची क्रियाशीलता

‘CPI Maoist’ ह्या एकछत्री राष्ट्रीय माओवादी संघटनेच्या बांधणीत किशनजी शिवाय फ्रंट संघटनांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. पूर्वीपासूनच नक्षलवाद्यांच्या आंतरराष्ट्रीय संयोजन समितीच्या प्रश्नांवर तोडगा काढणे, महत्त्वाच्या विषयांवर बाहेर चर्चा घडवून आणणे, अशा विविध कामात भुमिगत नक्षलवादी सहभागी होऊ शकत नाही. ती उणीव शहरी एजंट भरून काढतात. खरंतर, मागील ५० वर्षांत टिकून असलेल्या नक्षल चळवळीचे शहरी पाळेमुळे नसते, तर ग्रामीण भागात किंवा जंगलात दिसणाऱ्या नक्षलवादाला सरकारने कधीच भुईसपाट करून टाकले असते. मात्र याचा आधार बौद्धिक समाज आहे. हे नक्षल चळवळीला बहुआयामी भरीव मदत पुरवतात. परिणामी जंगलात कितीही नक्षलवादी मारले, तरी त्यांचे मनोबल खालावत नाही. मागील कोणत्याही शासनाच्या नक्षलविरोधी प्रखर भूमिकेनंतरसुद्धा, याचा प्रभाव दंडकारण्य, झारखंड, आंध्रप्रदेश, बिहार, ओरिसा सीमा भागात, उत्तर तेलंगणा, आणि अन्य भागात सु-संयोजनामुळे टिकून आहेत.

 

● शहरी नक्षली संघटनांची कामे 

सगळ्या शहरी संघटना एका नियोजित प्रक्रियेतून नक्षलवादाचे काम करतात. यांची भूमिका नक्षलवादी साहित्याचा आणि विचारधारेचा प्रचार प्रसार, संघटनेसाठी ऊर्जा निर्माण करणे, भुमिगत चलवळींसाठी व्यासंगी क्रांतिकारी उभे करणे, चळवळीसाठी पैसा उभा करणे, चळवळीच्या सर्व लोकांना वेळीच कायदेशीर संरक्षण मिळवून देणे, एका भागातून दुसऱ्या भागात माहिती पोहोचवणे, भुमिगत नक्षल्यांना लपून आवश्यक ठिकाणी घेवून जाणे, त्यांच्या आरोग्याची सोय करणे, खुल्या कार्यक्रमातून विविध विषयावर वातावरण निर्मिती करून नक्षल समर्थनार्थ लोकांची भूमिका तयार करणे, कोणतीही नक्षल हानी झाल्यास सत्यशोधन समितीच्या नावाने शासनाच्या भूमिकेला दूषित ठरवण्याचे षडयंत्र करणे, इत्यादी अशा अनेक कामांत शहरी संघटना महत्त्वाची भूमिका पार पाडतात.

 

● सत्यशोधन समितीचे शहरी समीकरण

शासकीय माहितीनुसार आज २० पेक्षा अधिक राज्यांत ह्या फ्रंट संघटना यशस्वीपणे क्रियाशील आहेत. यात भुमिगत नक्षलवादी चळवळ पोलीस प्रभावामुळे संकुचित होत चालली असताना, नक्षलवादाचा प्रभाव टिकवून ठेवण्यात शहरी नक्षलवादी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. भूमिगत आणि शहरी नक्षलवाद्यांचे आंतरिक संयोजन लक्षात घेण्यासाठी सत्यशोधन समितीचे समीकरण डोळे उघडणारे आहे. याच वर्षी गडचिरोलीतील कसनासुर बोरीयाच्या घटनेत ४० नक्षलवादी मारले गेले. एवढ्या मोठ्या संख्येत नक्षलवादी मारले गेल्याची ही भारतातील पहिलीच घटना. नक्षलवादाच्या राष्ट्रीय हानीमुळे आठ दिवसाच्या आत १२ राज्यातून विविध मानवाधिकार संघटना सत्यशोधन करायला एकत्र आल्या. यांचे सर्व पैशासंहित आवश्यक संयोजन महेश राऊत, गडचिरोलीतील नक्षल प्रभावित भागात क्रियाशील पेसा कार्यकर्त्यांनी आणि भारत जन आंदोलनाच्या चमूने केले.

स्रोत : द क्विंट

मानवाधिकार समितीने जमेल त्या पद्धतीने शासनाला गुन्हेगार ठरवण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यात जे वाईट झाले असेल, त्याला माझे समर्थन नाहीच. काही मानवाधिकार संघटनामुळेच देशात लोकशाही टिकून आहे हे मान्य, पण  भारतात नक्षलवाद्यांनी ६०-७० सामान्य लोकांना आणि प्रसंगी पोलिसांना एकत्र मारून टाकल्याच्या अनेक घटना आहेत. गीतांजली एक्स्प्रेस उलटवून शेकडोंची निष्पाप हत्या आणि जिरम घाटीतील अमानुष हिंसाचार सहज आठवतात. नक्षलवादी महेंद्र कर्माचे कसे हिंसक पशुप्रमाणे रक्त प्यायले आणि सगळया लोकांना एकाच ठिकाणी उभे करून जलियनवाला बागप्रमाणे जिवंत उडवून टाकले. तेव्हा नक्षलवाद्यांनी केलेल्या हत्या मानवाधिकारवादाचे हनन का वाटत नाही? आजपर्यंत नक्षलवाद्यांनी हजारो निष्पाप दलित आदिवासींना शुल्लक कारणांसाठी मारून टाकले. ज्यांनी नक्षलवाद्यांना आयुष्य दिले त्यांनाही ह्यांनी सोडले नाही. याविषयी आजपर्यंत हे विशिष्ट मानवाधिकारवादी संघटना सत्यशोधन करायला निष्पक्षरित्या समोर का आली नाही? ते नक्षल मारले गेले तेव्हा तत्काळ CPDR, CDRO, CLC, IAPL आणि काही अन्य लोकांच्या संघटना समोर आल्या. विशेष म्हणजे ह्याच्यासंहित अनेक संघटना काँग्रेस सरकारच्या काळापासूनच नक्षल फ्रंट संघटनेच्या शासकीय सूचित आहेत.

शहरी नक्षलवाद : भ्रम आणि वास्तव – भाग १

अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेतही नक्षलवादाची चांगली पकड निर्माण झाली असल्याचे दिसते. नक्षलवादी शहरी समीकरण समझायला वरील  संघटनांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. वरील उल्लेखित IAPL यात सुरेंद्र गडलिंग आणि अरुण परेरा हे दोघेही महत्त्वाच्या पदावर आहेत. यातील अरुण परेरा यापूर्वीही नक्षलवाद कारवाईमुळे सहा वर्ष न्यायालयीन कोठडीत होता, मात्र पुराव्याअभावी त्याची सुटका झाली. CPDR संघटनेची सुरुवात कोबाड गांधीने केली. तो पुढे नक्षलवादाच्या पॉलिट ब्युअरोचा सदस्य होता, आता तिहार जेल मध्ये आहे. २००४ च्या संयुक्त माओवादी पार्टीच्या निर्मितीत किशनजी संहित याचे योगदान महत्त्वाचे होते. त्याच्यानंतर प्रा. साईबाबा हा अटकेपूर्वी CPDR ची जबाबदारी सांभाळीत होता. सध्या ही जबाबदारी आनंद तेलतुंबडे याच्याकडे सचिव म्हणून आहे. ही संघटना वरील CLC सह भारतातल्या वेगवेगळ्या राज्यात २० अन्य संघटनेशी संयुक्तपणे काम करते. या संघटनेतील बरोबरीचे कार्यकर्ते रोणा विल्सन (CRPP), गौतम नवलक्खा (PUDR), सुधा भारद्वाज (PUCL) आणि अन्य लोक अलीकडे आरोपाच्या घेऱ्यात आले. त्यांची वर दिलेल्या संघटनेच्या माध्यमातून केलेली नक्षल समर्पित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कामे  नवीन नाहीत. हे नक्षलवाद्यांच्या भूमिकांच्या एकांगी समर्थनात वारंवार दिसून येतात, हा योगायोग नाहीच.

स्रोत : द हिंदू

महाराष्ट्र सरकारने भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात किंवा प्रधानमंत्री हत्येचा कट, अशा कारणांसाठी केलेल्या कारवाईत काही कायदेशीर त्रुटी आणि राजकीय पक्षाचे राजकारण दिसून येत आहे. त्यामुळे समाजात यावर दुफळी निर्माण झाली आहे. कदाचित पुराव्या अभावी भविष्यात आरोपी निर्दोष सुटतीलही, पण यांची आणि ज्यांना अद्याप अटक झाली नाही, अशा साथीदारांची नक्षलवादविषयी ऐतिहासिक भूमिका निर्दोष म्हणता येणार नाही.  ह्या संघटनांनी केवळ काही महत्त्वाच्या विषयावर शासनविरोधी भूमिका घेतली म्हणूनही त्यांना वाईट ठरविता येत नाही. हेही तेवढेच खरे, मात्र आजपर्यंत यांच्या कामाचे उद्देश, भूतकाळातील नक्षलसमर्थनात केलेली कामे आणि गंभीर गुन्हेगार नक्षलवादी सोबतचे संबंध राष्ट्रीय हिताचे नाही.

आज नक्षलवादाची ‘वैचारिक फॅक्टरी’ म्हणून काम करीत असणाऱ्या ह्या लोकांच्या तात्कालिक कामावरून केलेले निरीक्षण चुकीचे असेल. मानवाधिकाराच्या नावाने, बुद्धिवादी किंवा समाजसुधारक लोकांकडून नक्षलवादाला जे सहकार्य केले जाते, त्याचे भविष्याच्या दृष्टी गांभीर्याने परीक्षण व्हायला पाहिजे. ‘शहरी नक्षलवाद’ भ्रामक कल्पना नव्हेच. ते एक कटू सत्य आहे, फरक तो केवळ शाब्दिकच. वास्तवात, रोज होत असलेल्या निष्पाप लोकांच्या हत्येसाठी भूमिगत नक्षलवादी, त्यांच्या समर्थनात उभे असणारे शहरी नक्षलवादी आणि त्यांना अप्रत्यक्ष मानसिक बळ देणारे आपल्यातील सफेदपोष बुद्धिवादी, हे सगळेच समांतर दोषी आहेत.

नक्षलवाद हा गंभीर प्रश्न केवळ विषमता विरहित आदर्श राज्य निर्माण करण्याचा आणि शासनाच्या वाईट प्रवृत्ती उजागर करण्यापुरता सीमित नाही, त्याहीपेक्षा कोणत्याही न्याय आणि आधाराशिवाय जे नाहक मारले जात आहेत अशा हजारो निष्पाप भारतीयांचा आहे!

 

लेखक: प्रा. श्रीकांत मिरा बळीराम भोवते
संपर्क क्र. ९४२०३०४०२४
ईमेल : bhumkalorg@gmail.com

लेखक नागपूर येथील ‘भुमकाल संघटने’चे सचिव असून मनोहरभाई पटेल महाविद्यालयात सहा. प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 

संपादन : www.marathibrain.com 

◆◆◆

 

(प्रस्तुत लेखात प्रकाशित माहिती आणि विचार हे पूर्णतः लेखकांच्या हक्काधीन असून, मराठी ब्रेन त्या विचारांशी सहमत असेलच असे नाही.)

विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: