‘नीट’मध्ये तिघांना पैकीच्या पैकी गुण; एक विद्यार्थी महाराष्ट्रातील
ब्रेनवृत्त | नवी दिल्ली
वैद्यकीय क्षेत्रातील पदवीच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा (नीट) काल निकाल जाहीर झाला असून, तीन विद्यार्थ्यांनी देशात संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र, दिल्ली व तेलंगणा राज्यातील असलेल्या ह्या विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत.
यंदाच्या वर्षासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात आलेल्या नीट २०२१ (NEET 2021) परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. मृणाल कुट्टेरी (तेलंगणा), तन्मय गुप्ता (दिल्ली) आणि कार्तिक नायर (महाराष्ट्र) यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळवत एकूण ७२० पैकी ७२० गुण मिळवले आहेत. यंदा चिकित्सक व दंत अभ्यासक्रमासाठी देशभरातून सुमारे ८ लाख ७० हजार विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
मोठी बातमी : वैद्यकीय व दंत शिक्षणात ओबीसी व ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना आरक्षण जाहीर!
राष्ट्रीय पात्रता व प्रवेश चाचणीचे (NEET-UG) हे पहिलेच वर्ष आहे, ज्यामध्ये एकापेक्षा जास्त विद्यार्थी प्रथम स्थानी असले, तर स्थान निश्चितीसाठी वयाच्या अटीचीविचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे तिन्ही विद्यार्थ्यांना संयुक्तपणे प्रथम क्रमांक देण्यात आला आहे.
दरम्यान, कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लागू असतानाही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. सप्टेंबर, २०२१ मध्ये पार पडलेल्या या परीक्षेत एकूण १५.५ लाख विद्यार्थी उपस्थित होते, तर २०२०मध्ये १३.६ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. कोरोना विषाणू आजाराच्या दुसऱ्या लाटेमुळे नीट पुढे ढकलण्यात आली होती.
वैद्यकीय विद्यार्थ्यांना आयुषचे प्रशिक्षण देण्यास आयएमएचा विरोध !
दुसरीकडे, यंदा बहुतांश प्रवर्गांसाठी पात्रता गुणांची सीमारेषा (कटऑफ) कमी झाली आहे. सामान्य प्रवर्गासाठी मागील वर्षी १४७ गुणांची सीमारेषा होती, यंदा १३८ गुणांपासून पुढचे विद्यार्थी पात्र झाले आहेत. तर इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती व जमातीसाठी १०८ गुणांची सीमारेषा आहे. तसेच, सामान्य प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकासाठी (ईडब्ल्यूएस) पात्र होण्याकरिता १२२ गुण आवश्यक आहेत.
आमच्या टेलिग्राम वाहिनीत नक्की सहभागी व्हा 👉 मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी www.marathibrain.in सोबत जुळून रहा ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in
