‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ आणि ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’

आज १२ मे, हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ (International Nurses Day) म्हणून साजरा केला जातो. इसवी सन १८५४ साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी ‘आद्य परिचारिका (नर्स) फ्लोरेन्स नाइटिंगेल’ यांचा हा जन्मदिवस. इटलीतील अग्रगण्य परिचारिका, लेखक व संख्याशास्त्रज्ञ अशीही त्यांची ओळख आहे. फ्लोरेन्स नाइटिंगेल यांना ‘आधुनिक शुश्रूषाशास्त्राची संस्थापिका’ समजले जाते.

 

ब्रेनविशेष | अनुराधा धावडे

आपणा सर्वांना हे माहित आहे, की रुग्णालयात गेल्यावर डॉक्टरांना भेटण्याआधी पांढऱ्याशुभ्र कपड्यांमध्ये एक महिला आपल्याला भेटते. तीच आपली विचारपूस करते, डॉक्टरांना भेटण्याआधी आपल्या आजाराबद्दल जाणून घेणारी, रुग्णांची शु्श्रूषा करणारी, हीच महिला ‘परिचारिका’ असते. दरम्यान, आज संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. आपल्या देशाला, राज्याला, शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी डॉक्टर्स, परिचारिका (नर्स) पोलीस प्रशासन, स्वच्छता कर्मचारी, अधिकारी अहोरात्र झटत आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून याच परिचारिका रात्रंदिवस काम करत आहेत.

आज १२ मे, हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ (International Nurses Day) म्हणून साजरा केला जातो. इसवी सन १८५४ साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी ‘आद्य परिचारिका (नर्स) फ्लोरेन्स नाइटिंगेल‘ यांचा हा जन्मदिवस. इटलीतील अग्रगण्य परिचारिका, लेखक व संख्याशास्त्रज्ञ अशीही त्यांची ओळख आहे. फ्लोरेन्स नाइटिंगेल यांना ‘आधुनिक शुश्रूषाशास्त्राची संस्थापिका‘ समजले जाते. आज फ्लोरेन्स यांची २००वी जयंती आहे.

 

मात्र, हा ‘जागतिक परिचारिका दिन’ (International Nurses Day) का साजरा केला जातो, परिचारिकांच्या कामाला सुरवात कशी झाली, जगातील पहिल्या परिचारिका कोण, यांविषयी तुम्हाला माहित आहे का? आजच्या ‘ब्रेनविशेष’मध्ये जाणून घेऊयात याच परिचारिकांबद्दल आणि संबंधित प्रश्नांची उत्तरेही.

फ्लोरेन्स नाइटिंगेल आणि गणितीय जग

फ्लोरेन्स नाइटिंगेल’ (Florence Nightingale) यांचा जन्म १२ मे १८२० रोजी  इटलीतील फ्लोरेन्स येथे झाला. त्यांचे शिक्षण घरीच  झाले. ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, जर्मन व इटालियन या भाषा त्यांना अवगत होत्या. या भाषांशिवाय त्यांच्या वडिलांनी त्यांना इतिहास, तत्त्वज्ञान, गणित हे विषयही शिकवले. पुढे आयुष्यभर त्यांनी विविध भाषांचा अभ्यास चालू ठेवला. मात्र, फ्लोरेन्स नाइटिंगेल यांना लहानपणापासूनच गणिताची गोडी होती. आकडेवारीच्या आलेखांच्या माध्यमांतून दृश्य सादरीकरण करणे, हे त्याकाळात फारसे प्रचलित नव्हते. विल्यम प्लेफेअर यांनी विकसित केलेल्या पाय आकृतीसारख्या आलेखांचा त्यांनी परिणामकारकपणे वापर केला. नाइटिंगेल यांचे संख्याशास्त्रातील सर्वात महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे त्यांनी विकसित केलेली ‘ध्रुवीय क्षेत्र आकृती’ होय.  पारंपरिक शाब्दिक लेखनपद्धतीने मांडलेला संख्याशास्त्रीय अहवाल न समजू शकणाऱ्या नागरी अधिकारी आणि संसदेतील सभासदांसाठी त्यांनी या ‘कॉक्सकोम्ब’चा व्यापक उपयोग केला. त्या आलेखाला त्यांच्या सन्मानार्थ ‘नाइटिंगेल कॉक्सकोम्ब’ (Nightingale Coxcomb) म्हणतात.

नाइटिंगेल कॉक्सकोम्ब

ब्रेनविशेष : सॉल्फरिनोची लढाई’ आणि ‘रेडक्रॉस’ची स्थापना2020

● क्रिमियाच्या युद्धात (Crimean War) परिचारिका दिनाचे मूळ

पुढे इसवी सन १८५४ मध्ये क्रिमिया याठिकाणी रशियाविरूध्द ब्रिटन, फ्रान्स, सार्डेनिया व तुर्कस्तान या देशांचे युध्द सुरू झाले. तेव्हा ब्रिटिश मंत्रिमंडळातील युद्ध सचिव सिडनी हर्बर्ट यांनी नाइटिंगेल यांच्या कार्याचे महत्त्व ओळखून त्यांना युद्धभूमीकडे जाण्याचे सुचविले. या युद्धात अनेक सैनिक जखमी झाले. या जखमी सैनिकांची सुश्रुषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. अतिशय सुखवस्तू घराण्यात जन्म होऊनही परमेश्वराने आपल्याला भूतदयेसाठी व मानवतेची सेवा करण्यासाठीच जन्माला घातले, अशा भावनेने त्या प्रेरित झाल्या होत्या.

त्यांच्या या कार्यामुळे ‘रेडक्रॉस‘चे संस्थापक जॉन हेनरी दुनांत यांनी त्यांना ‘लेडी विथ द लॅम्प‘ ही उपाधी दिली. त्यांच्या हातातील कौशल्य व वैज्ञानिक दृष्टिकोनातून रूग्णसेवा केल्यामुळेच परिचर्याशास्त्राला नवीन दिशा प्राप्त झाली. त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ १२ मे हा त्यांचा जन्मदिवस ‘आंतरराष्ट्रीय  परिचारिका परिषदे’तर्फेे (International Council of Nurses) ‘आंतरराष्ट्रीय परिचारीका दिन‘ म्हणून साजरा केला जातो.

● नाइटिंगेल यांचे संख्याशास्त्र आणि वैद्यकीय सुधारणा

त्या स्वतः काम करीत असलेल्या लष्करी रुग्णालयातील दर महिन्यातील मृत्यूंची संख्या व कारणे यांचे सादरीकरण करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या ‘ध्रुवीय क्षेत्र आकृती’चा वापर केला. एरवी आकडेवारीच्या गुंतागुंतीमुळे संसद सदस्य आणि सरकारी अधिकारी यांच्याकडून असे अहवाल दुर्लक्षित राहात असत. परंतु, नाइटिंगेल यांनी केलेल्या प्रभावशाली दृश्य सादरीकरणामुळे सैनिकांसाठीच्या वैद्यकीय सुविधा किती अपुऱ्या आहेत याची जाणीव होऊन या वैद्यकीय सुविधांचा दर्जा सुधारण्याचे प्रयत्न सुरु झाले.

छायाचित्र स्त्रोत

युद्धाच्या व शांततेच्या काळात वैद्यकीय शुश्रुषा आणि सार्वजनिक आरोग्यसेवा यात सुधारणा करण्यासाठी त्यांनी समर्पक प्रस्तावाचा मसुदा तयार केला. त्यात तत्कालीन स्थितीचे काळजीपूर्वक निरीक्षण, कुशल संघटन आणि तत्पर प्रशासन यांवर आधारलेल्या पद्धती सुचविल्या. तसेच, आरोग्यसेवा, शिक्षण, बालमजुरी, गुन्हे इत्यादी प्रश्नांवरील अहवालात व प्रस्तावात या रेखाकृती त्यांनी समाविष्ट केल्या. त्यांनी काढलेल्या नाविन्यपूर्ण रेखाकृतींच्या स्पष्टीकरणामुळे आणि प्रबोधनामुळे ब्रिटनच्या राजकीय सत्ताधाऱ्यांनी काही प्रमाणात सुधारणा अमलात आणून तेथे सामाजिक विकासाच्या प्रगतीचा वेग वाढवला.

● फ्लोरेन्स नाइटिंगेल : साहित्यसंपदा आणि सन्मान

नाइटिंगेल यांनी त्यांच्या जीवनकाळात बरेच लेखन केले. त्यांचा ‘नोट्स ऑन नर्सिंग’ (१८६०) हा ग्रंथ नावाजलेला आहे. तसेच, ‘नोट्स ऑन मेटर्स ऍफेक्टिंग दि हेल्थ, एफिशियन्सी अँड हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द ब्रिटिश आर्मी‘ हा त्यांचा मोठा ग्रंथ १८५८ साली प्रसिध्द झाला.

संख्याशास्त्राची कुठलीही पदवी पदरी नसूनही १८५९ मध्ये त्या ‘रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी’च्या पहिल्या महिला सदस्य म्हणून निवडून आल्या. त्या अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनच्या मानद सदस्यही झाल्या. १८८३ मध्ये राणी व्हिक्टोरियाने त्यांना ‘रॉयल रेड क्रॉस‘ प्रदान करून सन्मानित केला. सन १९०७ मध्ये त्यांना ब्रिटिश सरकारकडून ‘ऑर्डर ऑफ मेरिट‘ हा किताबही बहाल करण्यात आला व तो मिळविणाऱ्या त्या ‘पहिल्याच महिला’ होत्या. मात्र, सन १९१० च्या सुमारास त्यांना अंधत्त्व आले आणि त्यातच त्यांचा १३ ऑगस्ट १९१० रोजी  लंडन येथे मृत्यू झाला.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: