‘कोव्हिड-१९’च्या रुग्णांना घरी पाठवण्याचे नवे धोरण

‘कोव्हिड-१९’ची लागण झालेल्या रुग्णांना घरी पाठवण्याविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल नवीन धोरण जाहीर केले आहे. यानुसार, अतिसौम्य-सौम्य आणि मध्यम तीव्रतेच्या रुग्णांमध्ये सलग तीन दिवस ताप नसेल, तर नमुना चाचणी न करताही त्यांना घरी पाठवता येईल,

 

ब्रेनवृत्त, नवी दिल्ली

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘कोव्हिड-19′ मधून बरे झालेल्या रुग्णांना घरी पाठविण्यासंदर्भातील नियमांत अधिक मोकळीक देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, अतिसौम्य-सौम्य आणि मध्यम तीव्रतेच्या रुग्णांमध्ये सलग तीन दिवस ताप नसेल, तर नमुना चाचणी न करताही त्यांना घरी पाठवता येईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. त्यामुळे, आता फक्त गंभीर स्वरूपातील रुग्णांना सोडण्यापूर्वी नमुना चाचणी आणि इतर सर्व वैद्यकीय चाचणी करणे बंधनकारक असणार आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या महितीनुसार, सध्या देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ६० हजारांच्यावर पोहचली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातील धोका लक्षात घेता गंभीर रुग्णांवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. सध्या देशात दररोज ९५ हजार नमुना चाचण्या होत असून, त्या १.२० लाखांपर्यंत वाढवण्यात येतील. तसेच,  गंभीर स्वरूपाच्या रुग्णांसाठी टेस्ट किट उपलब्ध होण्यासाठी फक्त गरज असेल तेव्हाच याचा वापर करण्याची सूचना देण्यात आली आहे. या धोरणात अतिसौम्य, सौम्य व मध्यम तीव्रतेच्या रुग्णांना विनाचाचणी घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवे बदल करण्यापूर्वी अतिसौम्य, सौम्य, मध्यम आणि गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना किमान दोन चाचण्या केल्यानंतर घरी जाण्याची परवानगी दिली जायची. तसेच, घरी गेल्यानंतरही  संबधित रुग्णाला १४ दिवस विलगीकरणात ठेवले जायचे आणि वैद्यकीय यंत्रणा दूरध्वनीवरून रुग्णाच्या तब्येतीची चौकशी करत. त्यानंतरही जर  रुग्णाला ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे पुन्हा आढळल्यास या रुग्णांनी आरोग्य केंद्राशी प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवर संपर्क साधणे गरजेचे आहे.

वाचा ब्रेनविश्लेषण : आरोग्य सेतू’ची कार्यपद्धती, सक्तीकरणाची कारणे आणि बरंच काही!

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अतिसौम्य व सौम्य लक्षणे,  मध्यम लक्षणे आणि गंभीर लक्षणे याबाबत काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत.

– अतिसौम्य व सौम्य लक्षणे
सलग  तीन दिवस ताप आणि श्वास घेण्यास  अडथळा येत नसेल, तर १० दिवसांनी रुग्णालयातून विनाचाचणी घरी सोडले जाईल. पण, त्यानंतरही सात दिवस घरी विलगीकरण बंधनकारक असेल.

– मध्यम लक्षणे
तीन दिवसांनंतर कोणत्याही लक्षणाचा अभाव असेल आणि त्यानंतरच्या चार दिवसांनंतर ऑक्सिजन देण्याची गरज भासत नसेल, तर १० दिवसांनंतर विनाचाचणी घरी जाण्याची परवनागी दिली जाईल. त्यानंतरही सात दिवस घरी विलगीकरण गरजेचे असेल.

मात्र, तीन दिवसांनंतरही ताप कमी झाला नसेल आणि ऑक्सिजनची गरज लागत असेल, तर अशा रुग्णांना त्यांची लक्षणे संपेपर्यंत रुग्णालयात राहाणे बंधनकारक आहे. त्यानंतर ताप व ऑक्सिजनची मात्रा याबाबत समाधानकारक प्रगती झाली तरच घरी सोडले जाईल. या रुग्णांनाही विनाचाचणी रुग्णालयातून जाण्याची मुभा असेल.

– गंभीर लक्षणे
एचआयव्हीग्रस्त, अवयव प्रत्यारोपण, कर्करोग आदी करोनाबाधित रुग्णांना घरी सोडताना अधिक काटेकोर वैद्यकीय नियमांचे पालन केले जाईल. ताप नसेल, ऑक्सिजनची मात्रा कायम राहात असेल, तर रुग्णांना घरी जाण्याची परवानगी दिली जाईल. मात्र हे रुग्ण करोनामुक्त झाल्याची नमुना चाचणीद्वारे खात्री करून घेतली जाईल.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: