‘सुन्न झाले ग्रामीण जीवन’

०४ डिसेंबर २०१८

ग्रामीण जीवन म्हटलं की, चोहीकडे हिरवळ, मातीची घरे, गावातील चौकाचौकांत गप्पा मारत बसलेली मंडळी, क्रिकेट, लपंडाव, विटीदांडू यांसारखे खेळ खेळणारी लहान मुलं, असे सुंदरसे चित्र आपल्या डोळ्यासमोर येत असते. गावात एखादी सुखद-दुःखद घटना घडली की संपूर्ण गाव त्या सुख-दुःखात सहभागी होत असे. असं साधं आणि देखणं चित्र एकेकाळी ग्रामीण जीवनाचं दिसत होतं. मात्र आजच्या आधुनिक काळात हळूहळू ग्रामीण जीवनाची संरचना बदलत चालली आहे. माझे बालपण ग्रामीण भागातच गेल्याने मला या विषयावर बरंच काही लिहिता येण्यासारखे आहे.

छायाचित्र स्रोत : प्रहार

माझ गाव म्हणजे ‘कमरगाव’. नैसर्गिकदृष्ट्या ते खूप परिपूर्ण नसलं, तरी गावच्या १०० मीटर दूरवरची झाडे ह्या ग्रामीण भागाची साक्ष देतात. असं माझं लहानसं खेडं. मला आठवतंय माझ बालपण! आम्ही जेव्हा लहान होतो, तेव्हा गावात मोबाईल फोन नव्हते आणि जर कुणाकडे असलेच, तर फोन येणे आणि जाणे, असे दोनच पर्याय त्या मोबाईलमध्ये असायचे. त्यामुळे आतासारखं फेसबुक, व्हाट्सऍप, विडियो गेम्स यांसारखे मनोरंजन आम्ही करू शकत नव्हतो. पण गावातल्या चौकाचौकांत खेळले जाणारे भोवरा, लपंडाव, कंच्या (गोट्या), क्रिकेट, चोर-पोलिस यांसारखे खेळ आमच्या वाट्याला आले. त्यामुळे मी स्वतःला नशिबवान समजतो. या खेळांमुळे आम्ही पूर्ण दिवस व्यस्त राहायचो. पण आता यांतला कोणताही प्रकार गावात दिसेनासा झाला आहे. या सगळ्या खेळांची जागा हल्लीच्या ह्या मोबाईलने घेतली.

पूर्वीची माणसं गावात एखादी दुःखद घटना घडली की त्या दुःखात सहभागी होत असत. पण आता असला कोणताही प्रकार दिसून येत नाही. नविन पिढी अशा गोष्टींना निरर्थक समजून फक्त स्वत:चाच विचार करते. कधी-कधी प्रश्न पडतो की, पूर्वीची माणसं जशी एकमेकांना समजून घेत होती, तसंच आताची पिढी घेईल का समजून? की फक्त आपल्या मोबाइलच्या दुनियेलाच सर्वस्वी समजुन अडकून पडेल या मोबाईलच्या  काल्पनिक दुनियेत? ग्रामीण जीवनाची संस्कृती तीच राहील की बदलून जाईल या बंद दरवाजाच्या संस्कृतीमुळे? असा प्रश्न सहज पडतो आणि ग्रामीण जीवनावरील खालील ओळी मनात आपसूकच रेंगाळतात…

“ग्रामीण जीवन कसे ,
होते सुखी समाधानी.
सुखी असायचे लोक,
हीच ग्रामिण जीवनाची निशानी…”


लेख : देवेंद्र रहांगडाले

कमरगांव, ता.गोरेगांव
जि.गोंदिया, ४४१८०१
संपर्क क्र. ७०३०५४३०९६

 

◆◆◆

(इथे प्रकाशित होणाऱ्या लेखांतील माहिती, तपशील आणि विचारांशी मराठी ब्रेन सहमत असेलच असे नाही.)

विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

तुम्हाले लिखाण, साहित्य आम्हाला पाठवा writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: