चीनमध्ये परत आढळला नवा विषाणू ; विषाणूमध्ये मोठ्या साथीची क्षमता !
ब्रेनवृत्त, ३० जून
चीनमधील वूहान शहरात उगम पावलेल्या कोरोना विषाणूच्या साथीमुळे संपूर्ण जगभरात चिंतेचे वातावरण आहे. आता याच चिंतेत भर घालणारी बातमी पुन्हा एकदा चीनमधून आली आहे. चीनमध्ये डुकरांमध्ये इन्फ्लूएंझाचा ताप (फ्लू) पसरवणारा एक नवीन विषाणू शास्त्रज्ञांना सापडला आहे. तसेच या विषाणूमुळे नवी जागतिक साथ पसरवण्याची क्षमता असल्याचा इशाराही शास्त्रज्ञांनी दिला आहे.
‘प्रोसेडींग ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स’ या विज्ञानविषयक नियतकालिकेत संशोधकांनी या नव्या विषाणूविषयी माहिती दिली आहे. यात शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या विषाणूची लागण झालेली डुकरे माणसांच्या संपर्कात आली, तर माणसांनाही याची लागण होऊ शकते. असे असले तरी, तूर्तास या विषाणूमुळे धोका नाही, पण माणसांना या विषाणूची लागण होण्यासाठीचे सर्व गुणधर्म या विषाणूमध्ये आहेत आणि म्हणूनच यावर बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे. याहून चिंताजनक बाब म्हणजे या विषाणूचा सामना करण्यासाठी आपली रोगप्रतिकार शक्ती समर्थ नाही, असेही शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
संग्रहित छायाचित्र
तसेच हा नवा विषाणू आरोग्याविषयक मोठ्या धोक्यांपैकी एक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. डुकरांमध्ये आढळलेला हा विषाणू नियंत्रणात ठेवण्याच्या उपाययोजना राबविल्या पाहिजेत आणि सोबतच, या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांवर बारकाईने लक्ष ठेवणंही गरजेच असल्याचेही संशोधकांनी म्हटले आहे.
● विषाणूचे नाव आणि त्यापासून असलेला धोका किती ?
चीनमधल्या डुकरांमध्ये जो नवा विषाणू आढळला आहे त्याला ‘G4 EA H1N1’ असे नाव देण्यात आले आहे. या विषाणूचा अभ्यास करणारे प्रा. किन-चाओ चँग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. या विषाणूची लागण झालेल्या डुकरांच्या संपर्कात आलेल्या माणसाच्या श्वसन नलिकेत असणाऱ्या पेशींमध्ये हा विषाणू वाढतो आणि पसरतो.
प्रातिनिधिक छायाचित्र
हेही वाचा : सिडीसी व विविध संस्थांनी जाहीर केली कोरोनाची नवी लक्षणे
● घाबरण्याची गरज आहे का?
या फ्लूवर सध्या उपलब्ध असलेली लस प्रभावी नाही. मात्र युकेतल्या नॉटिंघम युनिव्हर्सिटीत शिकवणारे प्रा. किन-चाओ चँग म्हणतात, सध्या सर्वांचं लक्ष कोरोना विषाणूवर आहे आणि ते बरोबरही आहे. मात्र, धोकादायक असणाऱ्या इतर नवीन विषाणूंकडे दुर्लक्ष होता कामा नये. फ्लूचे विषाणू कायम बदलत असतात आणि म्हणूनच त्यावरच्या लसींमध्येही वेळोवेळी बदल करणे गरजेचं असतं. फ्लू विषाणू बदलत असले, तरी प्रत्येक नवीन विषाणूमुळे जागतिक साथ येईलच, असेही नाही.
● २००९ मध्ये आलेल्या स्वाईन फ्लूशी संबंध आहे का ?
संबंधित विषाणू २००९ च्या स्वाईन फ्लू विषाणूसारखाच असला, तरी त्यात काही नवीन बदल आढळले आहेत. मात्र सध्यातरी या विषाणूमुळे कोणताही धोका नाही, पण यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. तसेच २००९ मध्ये आलेल्या स्वाईन फ्लूची साथ इतकी धोकादायक नव्हती. त्या विषाणूला ‘H1N1’ म्हणण्यात आले. पुढे त्या आजारावर लसही तयार करण्यात आली.