सत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम महिला विधेयक संमत करू : राहुल गांधी

जर सत्तेवर आलो, तर सर्वप्रथम संसदेत महिला आरक्षण विधेयक संमत करू, असे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे.

 

वृत्तसंस्था

कोची, २९ जानेवारी

जर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही सत्तेवर आलो, तर सर्वप्रथम महिला आरक्षण विधेयक संमत करू, असे आश्वासन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांनी काल कोची इथे दिले.

लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर काँग्रेस पक्षातर्फेही विविध आश्वासन देणे सुरू झाले आहे. कोची येथे बुथस्तरीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत महिलांना आरक्षण देऊ करणारे विधेयक संमत करवून देण्याची घोषणा केली आहे. ‘जर २०१९ मधील लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची सत्ता आली तर महिला आरक्षण विधेयक संमत होण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. आम्ही महिलांना नेतृत्वच्या भूमिकेत बघू इच्छितो’, असे राहुल गांधी म्हणाले.

याआधी राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक जिंकून आल्यानंतर शेतकऱ्यांना किमान भाव देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, ‘पंतप्रधानांनी धनाढ्य लोकांना कमाल उत्पन्नाची हमी दिली आहे. आम्ही शेतकऱ्यांना किमान उत्पन्नाची हमी देतो.’ मात्र, राहुल गांधींचे हे वक्तव्य खोटे असल्याची टीका बसपच्या (बहुजन समाजवादी पक्ष) अध्यक्ष मायावती यांनी केली आहे. राहुल गांधींचे हे अश्वासन खोटे असून, त्यांची आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या १९७१ मधील ‘गरिबी हटाओ!’ नाऱ्याप्रमाणे निरुपयोगी असल्याचे त्या म्हणाल्या.

महिलांना संसदेत देण्यात येणाऱ्या आरक्षणाच्या विधेयकानुसार, लोकसभा आणि राज्य विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षणाच्या तरतुदीचा प्रस्ताव आहे. या मुद्यावर सर्वसहमती न झाल्यामुळे अजूनही हे विधेयक संसदेत अजूनही प्रलंबित आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: