जग करतोय कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रवेश!
ब्रेनवृत्त । जिनेव्हा
संपूर्ण जग कोव्हिड-१९ च्या तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रवेश करू लागले असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसूस यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत विषाणूचा डेल्टा प्रकार सर्वाधिक घातक ठरणार असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
“कोव्हिड-१९ चा डेल्टा प्रकार संपूर्ण जगभर वेगाने पसरत चालला आहे. सुरुवातीला भारतात आढळलेला हा उत्परिवर्तित प्रकार आता १११ पेक्षा अधिक देशांमध्ये अस्तित्त्वात आहे. लवकरचा हा प्रकार जगभरात सर्वांत प्रभावी ठरेल”, असे डब्ल्यूएचओचे .प्रमुख म्हणाले. परिणामी, संपूर्ण जग आता कोव्हिड-१९च्या तिसऱ्या लाटेत प्रवेश करू लागले आहे, असेही ते म्हणाले.
वाचा । कोरोनामुक्त बालके परत रुग्णालयांच्या वाटेवर!
सलग १० आठवड्यांच्या घसरणीनंतर नव्याने कोव्हिड-१९ बाधितांची संख्य व मृत्यू दोन्ही परत वाढू लागले आहेत. सुरु झालेली सामाजिक हालचाल व वैद्यकीय उपाययोजनांचा अनियमित वापर यांमुळे ही वाढ होत आहे, असेही घेब्रेयेसूस सांगितले.
डब्ल्यूएचओच्या मते, वैश्विक पातळीवर कोव्हिड-१९ लसींच्या वितरणात मोठी असमानता आहे. ज्या देशांकडे लसींचा पुरेसा पुरवठा आहे, ते देश निर्बंध शिथिल करत आहेत व लोकांना मोकळीक देत आहेत. तर दुसरीकडे, ज्या देशांकडे लस नाहीत, ते देश विषाणूच्या दयेवरच जगत आहेत. २०२१च्या अखेरपर्यंत प्रत्येक देशांनी किमान ४०% लोकसंख्येचे करावे, अशी विनंती जागतिक आरोग्य संघटनेने देशांना केली आहे.
Join @ मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in