जाणून घ्या: ‘इंदूर-मनमाड’ लोहमार्ग सामंजस्य करार
‘इंदुर-मनमाड’ या नव्या रेल्वे मार्गाच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
केंद्रीय जहाज बांधणी मंत्रालयाच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र व मध्य प्रदेश शासन यांच्या दरम्यान ३६२ कि.मी. चा हा ‘इंदूर-मनमाड’ लोहमार्ग प्रस्तावित आहे.
Image Source: Daily Shipping Times
जहाज बांधणी मंत्रालयाच्या पुढाकाराने देशात प्रथमच रेल्वे मार्ग
करारानंतर बोलताना श्री.गडकरी म्हणाले की, ” जहाजबांधणी मंत्रालयाच्या वतीने देशात प्रथमच रेल्वे मार्ग उभारण्यात येत आहे. इंदूर-मनमाड नवीन रेल्वे मार्ग हा जहाजबांधणी मंत्रालय, रेल्वे मंत्रालय तसेच मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने उभारण्यात येत आहे. या नवीन रेल्वे मार्गामुळे मनमाड व इंदूर या औद्योगिक केंद्राचा विकास होऊन या मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. तसेच उभय राज्यांतील रेल्वे मार्गालगतच्या शेती व औद्योगिक क्षेत्राचा विकास होईल.”
१) या नव्या मार्गामुळे दिल्ली-चेन्नई व दिल्ली-बंगळूर हे रेल्वेमार्गाचे अंतर ३२५ किलोमीटरने कमी होणार असून मुंबई-इंदूरचे अंतर २०० किलोमीटरने कमी होईल.
२) वर्ष २0१६ मध्ये मंजूर झालेल्या या ३६२ किमी अंतराच्या ‘इंदूर-मनमाड’ रेल्वे मार्गापैकी महाराष्ट्रातून १८६ किमी रेल्वे मार्ग जाणार आहे. हा ब्रॉडगेज रेल्वेमार्ग असून यावर १३ मोठे पूल व २४९ लहान पुलांसह एकूण ५९५ रेल्वे पूल असणार आहेत.
३) रेल्वेमार्गासाठी एकूण २००८ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात येणार असून महाराष्ट्रातील ९६४ हेक्टर तर मध्यप्रदेशातील १०४४ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे.
४) रेल्वेमार्गासाठी एकूण ८ हजार ५७४ कोटी ७९ लाख रुपये खर्च अपेक्षित असून यातील प्रत्येकी १५ टक्के निधी हा महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकार इक्विटीच्या माध्यमातून भांडवल स्वरूपात उभारला जाणार आहे.
Source: Daily Shipping Times
५) उर्वरित ७० टक्के निधी हा जेएनपीटी कर्ज घेऊन उभारणार आहे. नुकतेच या मार्गावरील चार पुलांच्या कामांसाठी ५० कोटींच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत.
(तपशिल, संदर्भ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन)
◆◆◆