‘मासिकपाळी: स्त्रीसाठी सर्वांत पवित्र गोष्ट’ : भाग २
मासिक पाळी विषयीच्या लेखमालेतील ‘मासिकपाळी: स्त्रीसाठी सर्वांत पवित्र गोष्ट’ या लेखाच्या पहिल्या भागात आपण अनन्या आणि समृद्धी यांच्यात सुरू असलेल्या मासिक पाळीबाबतच्या चर्चेविषयी बघितले. आईने जेवायला बोलावल्यानंतर त्यांच्यातील संभाषण काही वेळ थांबले आणि नंतर जेवता जेवता पुन्हा सुरू झाल्या दोघींच्या गप्पा.
पहिल्या भागात सुरू असलेली मासिक पाळीबाबतची चर्चा दुसऱ्या भागात पूर्णत्वास आली आहे. वाचा काय काय माहिती सांगितली अनन्याने समृद्धीला…
‘एका आवाजात आल्या गं बाई! माझ्या दोन्ही राण्या…!’ हे शब्द उच्चारत आईने जेवणासाठी स्वागतच केले. हात धुवून झाल्यावर अनन्या समृद्धीस हळुवारपणे जेवण्याच्या टेबलवर बसवते.
‘थँक्स अनन्या!’
तेवढ्यात जेवणाच्या टेबलावर नजर फिरवल्यावर लगेच समजलं की, आज आईने स्वयंपाकगृहात चांगलेच कष्ट उपसले असावेत. कारण जेवणासाठी तिथे खुपच पर्याय उपलब्ध होते. त्यातच एक विचार मनात आला की, पृथ्वीच्या सुगंधावर आणि वायुजीवी वनस्पतींप्रमाणे प्रकाशावर आपल्याला जगता आले असते तर महिलांचे स्वयंपाकी कष्ट किती वाचले असते. तेवढ्यात ते विचार नष्ट करत मनाला बजावले की, असे कधीच होऊ नये. नाहीतर आपल्याला आपल्या आईच्या हातचे स्वादिष्ट आणि पौष्टिक जेवण कसं मिळेल ?
‘ये वेडे जेव ना ? काय विचार करते आहेस…?’
‘मला तर थोडीसुद्धा भूक नाही आहे?… पण चल, थोडं खाऊन घेऊया!’
तत्क्षणी समृद्धी बोलते, ‘अनन्या! माझ्या प्रश्नांचे अपूर्ण ठेवलेले उत्तर पूर्णत्वास नेणार आहेस की नाही?’
‘हो, नेणार ना!’
३. कापडी नॅपकिन्स:
आजकाल कापडाचे छान सॅनिटरी नॅपकिन आले आहेत. ते शिवलेले असतात आणि वापरायलाही सोपे असतात. भारत सरकारच्या ‘स्वच्छ भारत योजने’ अंतर्गत पाळी संदर्भात लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हे ध्येय ठेवलं गेलं पाहिजे. तसेच कापडी पॅडचा वापर वाढला पाहिजे. कारण या पॅडचा अजून एक फायदा म्हणजे, ते धुवून पुन्हा वापरता येतात.
मासिकपाळी: स्त्रीसाठी सर्वांत पवित्र गोष्ट : भाग १
४. पिरीयड पँटी
पँटीच्या आत पाळीचा रक्तस्राव शोषण्यासाठी पॅड, टॅम्पॉन, कप वापरण्यापेक्षा पॅन्टीच रक्तस्राव शोषणारी असेल तर? पिरियड पँटीची शोषक्षमता टॅम्पॉन एवढीच, किंबहुना जास्त आहे, असा दावा या पँटी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा आहे. पाळी दरम्यान फक्त ही पँटी घालायची आणि दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज पडणार नाही. भारतात या पँटी ऑनलाईनही उपलब्ध आहेत.
५. पीरियड स्पंज
समुद्रात सापडणाऱ्या या नैसर्गिक स्पंजचं आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. या स्पंजचा वापर टॅम्पॉनसारखाच करता येतो आणि हेही पुन्हा वापरण्यासारखे असतात. नैसर्गिक असल्यामुळे याचा पर्यावरणाला काही धोका नाही. पण आरोग्यासाठी हे पीरियड स्पंज वापरणं योग्य आहे की नाही, याविषयी तज्ज्ञांमध्ये वाद आहेत.
‘मग हे वापरण्यासाठी काही अडचणी आहेत का?’ (हे बोलताच तिला ठसका लागतो.)
‘हळू बोल समू! हे घे पाणी पी…जेवताना बोलायची सवय नाही ना ?’
‘खरी अडचण एकच आहे, यांच्या किंमती जास्त आहेत आणि त्या देण्यासाठी कोण तयार होईल हे माहीत नाही. पण ही साधने उपलब्ध आहेत, हेच मुळी भारतीय महिलांना माहीत नाही ना ?’
‘अनन्या ! तसं काही या विषयावर बोलायला सुरुवात केली की हा सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचा विषय होईल. जर आपण बोलणारच नाही, तर जनजागृती करण्यात आपण यशस्वी होऊ का ? ‘
‘नाहीतर काय? तसेच आपल्याला मागील वर्षी प्रदर्शित झालेला ‛पॅडमॅन’ हा मासिक पाळीसंबंधी केंद्रस्थानी असलेला चित्रपट ग्रामीण भागात दाखवावा लागेल. तसेच महिलांना अल्पदरात सॅनिटरी नॅपकिन्स मिळावेत यासाठी ग्रामीण व शहरी भागातील महिलांना बचतगटामार्फत प्रशिक्षण देऊन कमी किंमतीचे सॅनिटरी नॅपकिन्स बाजारपेठांत उपलब्ध करून द्यायला हवेत.
‘यावर माझं वेगळं मत आहे. सांगते पुढे, पण अजून या विषयी स्त्रिया कुठे बोलतात का अनन्या??’
‘समृद्धी! भारतात सध्या तरी सर्वात चर्चित विषय मासिक पाळी हाच आहे. तसेच जागतिक पातळीवर #HappyToBleed या हॅशटॅगव्दारे महिलांनी पाळीदरम्यान असलेल्या जाचक प्रथा, गैरसमजुतींविषयी सोशल मीडियावर व्यक्त व्हायला सुरुवात केली आहे.’
‘हा बदल मस्तच आहे, पण एका गैरसमजुतीकडे तुझं लक्ष वेधून घ्यायचं आहे. तो मासिकपाळी संबंधीत आहे की नाही एवढं सांग?’
‘बोल ना?’
‘मासिकपाळी मध्ये अतिप्रमाणात रक्तस्राव झाल्यास स्त्रीचा योनीचा पडदा फाटू शकतो का?’
‘त्याचं उत्तर ‘हो’ असेच आहे समू !! कारण तो पडदा इतका नाजूक असतो की मासिकपाळीत अतिप्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्यावर अतिदाबाव पडल्यास तो फाटू शकतो. तसेच आपल्या वैवाहिक संबंधाविषयी मुला-मुलींमध्ये असणारे गैरसमज समुपदेशनामुळे दूर होतात; पण समाजाने डॉक्टरांबरोबर चर्चा करताना कोणत्याही गोष्टी सविस्तरपणे जाणून घेतल्या पाहिजेत, हेही समजणं गरजेचं आहे. कुठेतरी वाचून किंवा ऐकून पहिल्या संबंधानंतर स्त्रीच्या योनीतील पडदा फाटून रक्तस्राव झाला म्हणजे ती कुमारी असल्याचं लक्षण, हे अनेकांच्या डोक्यात पक्कं भिनलेलं असतं, पण प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत असं घडेलच असं नाही. अशा गैरसमजामुळे पत्नीच्या चारित्र्यावर संशय वगैरे घेण्याच्या घटना आजही घडताना बघुन आश्चर्य वाटतं.’
‘थोडं लोणचं दे समृद्धी इकडे!’
‘घे ! मला तर खायचं नाही आहे, तू घे बाई खाऊन.’
‘हो हो !!’
‘समृद्धी एक निरीक्षण तुला सांगू का?’
‘सांग ना अनन्या?’
‘अक्षय कुमारच्या ‛पॅडमॅन’ या हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने ‘मासिक पाळी’ आणि त्यासाठी वापरण्यात येणारे पॅड्स यासंदर्भात देशभरात, सोशल मीडियावर जणू जनजागृतीची त्सुनामीच आली, त्यात तो त्याची पत्नी, बहीण तसेच गावांतील स्त्रियांसाठी स्वस्त दरात पॅड बनवण्याचे प्रयत्न देशभर पोहचवतो.. हे सारं असले तरीही मासिक पाळीसंदर्भातला एक महत्वाचा पैलू आपल्या अजूनही लक्षात आला नाही. तो असा की, दिव्यांग, गतिमंद, मूक-बधिर युवती, महिलांना मासिक पाळीत काय त्रास होत असेल, त्या काळात त्यांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागत असेल? या विचाराने मला नेहमीच अस्वस्थ केले आहे. ‘
‘अनन्या ! माझं एक वेगळं मत असं आहे की, अशा स्त्रियांसाठी सरकारने सरकारी दवाखान्यात प्रत्येक महिन्याला मोफत सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून दिले, तर त्यामुळे महिलांना मासिक पाळीसाठी सुती कापडाऐवजी कायमस्वरूपी पॅड उपलब्ध होतील. कारण आरोग्यासाठी खर्च करणे ही सुद्धा सरकारची जबाबदारी आहेच ना? तर सरकार बोलते काय ‘अस्मिता योजनेमार्फत ग्रामीण भागात माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स.’
त्यापेक्षा सॅनिटरी नॅपकिन्स माफक दरात, टॅक्स फ्री नव्हे; तर काही नॅपकिन्स फ्री द्या, मग एकदा सवय लागली की, फ्री नॅपकिन्सची संख्या हळूहळू कमी करावी. कारण महिलांच्या अनेक आजारांचे मुळ कारण मासिकपाळी दरम्यान अस्वच्छता आहे. त्याच्यावरच उपाय केला तर नंतर होणाऱ्या आजारांवर सरकार खर्च करतेच ना? मग सुरवातीलाच काही प्रमाणात खर्च केला तर ‘वित्तीय तूट’ भरून न येण्याइतकी वाढणार आहे का?’
‘तू बोलते आहेस ते एकदम बरोबर आहे. त्यात शहरात नाही, तर निदान भारताच्या काही दुर्गम भागातील गावात तरी ही योजना सरकारने हातात घ्यायला हवी. नाहीतर कापडी धुडके आहेतच महिलांच्या पाचवीला पुजलेले.’
‘त्यातही ज्या दिव्यांग, गतिमंद लोकांना स्वतःचे जीवनही जगणे अवघड असते, अशा मुलींना स्वतःमधील शारीरिक, मासिक पाळीच्या रूपातील बद्दल वगैरे समजत असतील का अनन्या?’
‘समजलं तरी ते सॅनिटरी पॅड्स बदलणे त्यांच्यासाठी निश्चितच सोपे काम नसेल. त्यामुळे त्याचाही विचार होणे गरजेचे आहे. त्यातही मासिक पाळीच्या काळात पॅड्स उपलब्ध होणे हीच प्राथमिकता नाही, तर मासिक पाळीत प्रत्येक महिलेला पुरेसे पाणी, पुरेसा आहार, स्वच्छतागृह, आणि शेवटी उत्तम दर्जाचे सॅनिटरी पॅड्स या गोष्टी मूलभूत हक्क म्हणून तरी मिळायला हव्यात.’
‘तू बोलते आहेस ते अगदीच बरोबर आहे, पण सरकारच्या राजकोषीय भंडारातून त्यासाठी हक्काचा निधी उपलब्ध होईल का? कारण केवळ पॅडनिर्मिती, त्यांची योग्य दरात विक्री, किंवा मोफत उपलब्धता या उद्देशाने सरकारने काम न करता, पोलिओच्या संदर्भात कशी व्यापक मोहीम यशस्वी राबविण्यात आली, त्याप्रमाणेही ‛मासिक पाळी’च्या बाबतीत करायला पाहिजे. त्यासाठी मोठया प्रमाणावर जाहिरातबाजी करायलाच लागली तरी चालेल, त्यामुळे जनजागृती तर होईल ना!’
‘असंपण जाहिरातबाजी करण्यात सरकार पुढे आहेच की समृध्दी !!’
‘हाहाहाहा!!’
‘मासिक पाळी हा विषय महिलांसाठी पुरुषांच्या दाढीइतका सहज-सोपा विषय झाला पाहिजे गं अनन्या!’
‘हो ना समू !! चल झालं माझं जेवण, आले हात धुवून.’
‘अनन्या! तुझी राहिलेली किवी मी खाते गं.’
‘हो खा !! खाऊ खादाड.’
◆◆◆
(प्रस्तुत लेख हा पूर्णतः लेखिकेच्या हक्काधीन आहे. प्रकाशित करण्याच्या उद्देशाने फक्त आवश्यक त्या सुधारणा व मुद्रितकार्य मराठी ब्रेनमार्फत झाले आहे.)
तुमच्या सूचना आणि प्रतिक्रिया दिलेल्या प्रतिक्रिया बॉक्समध्ये नक्की कळवा.
लिहा- writeto@marathibrain.com
पहिला भाग हा आपल्या गुंफण ठेवण्यात यशस्वीपणे भूमिका पार पाडतो तर दुसरा भाग या समस्याच्या अनेक पैलूंना स्पर्श करतो त्यात प्रामुख्याने अंध मतीमंद मुलांच्या तसेच अनेक गोष्टींवर भाष्य करण्यात दिपाली यशस्वी झाली आहे शेवट खूप मस्त आहे. या भागाची खरी नायिका कोण समृद्धी की अनन्या ? किंवा मग दोघीजणी एकमेकांना पूरक आहेत. ” अनन्या ” हे नाव मलाही विशेष प्रिय आहे.