मुंबई विद्यापीठातील पासिंग माफियांचे गैरप्रकार उघडकीस
मराठी ब्रेन वृत्त
मुंबई, २४ नोव्हेंबर
गैरव्यवहार आणि भोंगळ कारभारामुळे आधीच चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठात पैसे घेऊन विद्यार्थी उत्तीर्ण करण्याचा ‘पासिंग माफिया’ चा गैरप्रकार उघडकीस आला आहे.
गैरप्रकारांसाठी नेहमीच चर्चेत राहणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात आणखी एक गैरप्रकार उघडकीस आला आहे. विद्यापीठातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये वसूल करून, त्यांना उत्तीर्ण करणारे “पासिंग माफिया’ विद्यापीठात सक्रिय असल्याचे माहित झाले आहे. या गैरप्रकारात विद्यापीठातील कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे कळते. त्यापैकी काहींवर विद्यापीठाने यापूर्वीही फौजदारी केली आहे. मात्र चौकशीच्या फेऱ्यातून सुटलेले हे माफीये विद्यापीठात आजही कार्यरत आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या उघडकीस आलेल्या या गैरप्रकारात मुख्यत्त्वाने अभियांत्रिकी आणि विधी शाखांसाठी उत्तीर्ण करून देण्याचा भाव सर्वाधिक आहे. या अभ्यासक्रमांच्या एका विषयात उत्तीर्ण करण्यासाठी एक विद्यार्थ्यांकडून २५ हजार रुपये घेतले जातात.
दरवर्षी लाखो विद्यार्थी विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची परीक्षा देतात. उत्तरपत्रिका तपासणी, तसेच निकाल जाहीर करण्याचे काम विद्यापीठाच्या कालिना संकुलातील परीक्षा भवनातून चालते. उत्तरपत्रिकांच्या ऑनलाईन मूल्यांकन पद्धतीमुळे निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेत फारसा मानवी हस्तक्षेप नसतो. त्यामुळे निकालात फेरफार करणे कठीण बनले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील “पासिंग माफियां’नी पुनर्मूल्यांकन, फोटो कॉपी, मार्कशीट तयार करणाऱ्यांकडे मोर्चा वळवला आहे. प्रलंबित निकाल आणि गुणपत्रिका काढून देण्यास दीड ते दोन हजार रुपये घेतले जात असल्याचे सूत्रांकडून माहिती झाले आहे.
नापास झालेल्या विद्यार्थ्यांना जाळ्यात ओढत त्यांना उत्तीर्ण करण्याचे प्रलोभन दाखवले जाते. एका विषयात उत्तीर्ण करण्यासाठी त्यांच्याकडून हजारो रुपये घेतले जातात. विद्यापीठात सुमारे 600 कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यापैकी 300 परीक्षा भवनात कार्यरत आहेत. अत्यल्प मानधन मिळत असल्याने त्यापैकी काहीजण नियमित कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पैशांसाठी हे उद्योग करतात.
दै. सकाळने प्रकाशित केलेल्या संबंधित वृत्तानुसार, नापास विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याचे आमच्या कानावर आले असून, संबंधित या प्रकारणाविषयी कुलगुरूंकडे पाठपुरावा करण्यातयेणार असल्याचे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, प्रदीप सावंत यांनी सांगितले आहे. दरम्यान, निकालासंबंधित काही कामांमध्ये आजही मानवी हस्तक्षेप असतो. या प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी विद्यापीठाने विशेष खबरदारी घेतल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
◆◆◆