मी अर्धा भारतीय झालो आहे : धडाकेबाज डिव्हिलियर्स सर्वच प्रकारांतून निवृत्त
मराठी ब्रेन ऑनलाईन
ब्रेनवृत्त । पुणे
क्रिकेट विश्वातील धडाकेबाज फलंदाज म्हणून जगजाहीर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या ए बी डिव्हिलियर्स (AB de Villiers) याने क्रिकेटच्या सर्वच प्रकारांतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दक्षिण आफ्रिका संघाकडून व भारतीय प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून (RCB) फटकेबाजी करणाऱ्या डिव्हिलियर्सने ट्विटरच्या माध्यमातून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. यामुळे क्रिकेटमधील एका मोठ्या फटकेबाजीचा पर्व संपला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज ए बी डिव्हिलियर्सने २०१८ मध्ये फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती, मात्र त्यानंतरही तो फ्रॅन्चायजी क्रिकेटमध्ये, विशेषकरून आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (आरसीबी) संघाकडून खेळत होता. मात्र आता एबीडीने सर्वच क्रिकेट प्रकारांतून निवृत्ती घेतली आहे. निवृत्ती जाहीर करताना त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या असून, भारतीय खेळाडूंसोबत आयपीएल खेळून मी अर्धा भारतीय झालो आहे आणि त्याचा मला अभिमान असल्याचे म्हटले आहे.
वाचा । टी-२० विश्वचषकाचा प्रवास संपला!
निवृत्तीची घोषणा करताना ए बी डिव्हिलियर्सने त्याचा आयपीएल फ्रॅन्चायजी संघ आरसीबी आणि चाहत्यांसाठी एक भावनिक संदेश सामायिक केला आहे. त्यात तो म्हणतो, “मी आयुष्यभर आरसीबीचा सदस्य असेल. आरसीबीमधील प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी एक कुटुंब बनलेला आहे. लोकं येतात आणि जातात, पण आरसीबीत प्रत्येकांना एकमेकांबद्दल असलेली प्रेरणा आणि प्रेम कायम टिकून राहण्यासारखी आहे. मी अर्धा भारतीय झालो असून, त्याचा मला अभिमान आहे.”
ए बी डिव्हिलियर्सने आयपीएलच्या सुरुवातीच्या तीन सत्रांमध्ये दिल्ली कॅपिटल्स (पूर्वीचे दिल्ली डेअरडेव्हिल्स) या संघाकडून क्रिकेट खेळले आणि त्यानंतर पुढचे एक दशक तो आयपीएलमध्ये आरसीबी संघाकडून खेळला आहे. २०२१ चे आयपीएलचे सत्र हे ए बी डिव्हिलियर्ससाठी शेवटचे सत्र होते. दरम्यान, जाता संघाला विजयी करून जाण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले.
“I’m going to be an RCBian for life. Every single person in the RCB set-up has become family to me. People come & go, but the spirit & the love we have for each other at RCB will always remain. I’ve become half Indian now & I’m proud of that.” – @ABdeVilliers17 #ThankYouAB pic.twitter.com/5b6RUYfjDY
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) November 19, 2021
“संघ थकला आहे, खेळाडूंना विश्रांती हवी असते!”
३७ वर्षीय एबीने भारतीय प्रीमिअर लीगमध्ये एकूण १८४ सामने खेळले आहेत. त्यांत त्याने 39.70 च्या सरासरीने एकूण 5162 धावा केल्या असून, त्याचा फटकेबाजीचा दर 151.68 इतका आहे. एबीडीच्या आयपीएल कारकिर्दीत आरसीबीकडून खेळताना ३ शतके व ४० अर्धशतकांचा समावेश आहे.
दुसरीकडे, ए बी डिव्हिलियर्सने त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दही अतिशय गाजवली आहे. कसोटी क्रिकेट स्पर्धेत २२ आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५ शतके त्याच्या नावावर आहेत. तसेच एकदिवसीय क्रिकेट प्रकारात सर्वांत जलद ५० १०० आणि १५० पूर्ण करण्याचा विक्रमही त्यांच्या नावे आहे.
सहभागी व्हा👉मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा writeto@marathibrain.in