‘श्रमिक विशेष’ गाड्यांतून १२ लाख प्रवासी घरी पोहचले
१ मे रोजी केवळ ४ गाड्यांपासून सुरुवात झाल्यानंतर १५ दिवसांत एक हजारहून अधिक श्रमिक विशेष गाड्यांचे परिचालन करण्यात आले. तर, १४ मे रोजी विविध राज्यांतून १४५ श्रमिक स्पेशल गाड्यांतून तब्बल २ लाख १० हजार लोकांना त्यांच्या स्वतःच्या राज्यात निश्चित ठिकाणी पोहचविण्यात आले.
ब्रेनवृत्त, पुणे
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर रेल्वेने टाळेबंदीमुळे (लॉकडाऊन) देशभरात विविध ठिकाणी अडकलेले परप्रांतीय, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर लोकांसाठी ‘श्रमिक विशेष’ गाड्या सुरु करून ‘घर वापसी मोहिमे’ला गती दिली. कामगार दिनाच्या निमित्ताने 01 मे 2020 पासून या ‘श्रमिक विशेष’ (Shramik Special Trains) गाड्या कामगारांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी सुरु करण्यात आल्या.
१ मे रोजी केवळ ४ गाड्यांपासून सुरुवात झाल्यानंतर १५ दिवसांत एक हजारहून अधिक श्रमिक विशेष गाड्यांचे परिचालन करण्यात यश मिळाले आहे. तर, १४ मे रोजी विविध राज्यांतून १४५ श्रमिक स्पेशल गाड्यांच्या माध्यमातून देशभरातील तब्बल दोन लाख १० हजार यात्रेकरूंना त्यांच्या स्वतःच्या राज्यात निश्चित ठिकाणी पोहचविण्यात आले. एकाच दिवसात कामगार गाड्यांवरील प्रवाशांची संख्या 2 लाखांचा टप्पा ओलांडण्याची ही प्रथमच वेळ आहे. तर, या ‘श्रमिक स्पेशल’ गाड्यांद्वारे आतापर्यंत 12 लाखांहून अधिक प्रवासी त्यांच्या घरी पोहचले आहेत.
या रेल्वेगाड्या आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, ओडिशा, राजस्थान, तमिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये जात आहेत. दरम्यान, घर वापसी मोहिमेंतर्गत देशभरातील सर्व रेल्वे आपापल्या राज्यसरकारांशी समन्वय साधत आहेत. त्यामुळे प्रतिदिवस ३०० हून अधिक श्रमिक विशेष गाड्या सोडून चार लाखांहून अधिक अडकलेल्या लोकांना आपल्या निश्चित ठिकाणी पोचविण्यास सज्ज आहे.
या गाड्यांचे परिचालन दोन्ही राज्यांतील राज्यसरकारच्या संमतीनंतरच चालविल्या जात आहेत. म्हणजेच, एका राज्यातून निघणारी रेल्वे ज्या राज्यात जाणार आहे, त्या राज्यसरकारची संमती मिळाल्यानंतरच गाडी सोडली जाते. त्याचबरोबर रेल्वेत चढण्यापूर्वी प्रवाशांचे योग्य बोर्डिंग निश्चित केले जाते. प्रवाशांना प्रवासादरम्यान मोफत अन्न आणि पाणी दिलेही जाते.
(पत्र माहिती कार्यालयाच्या संदर्भांसह)
◆◆◆