अखेर अकलूज व नातेपुते ग्रामपंचायतींचे नगरपरिषद व नगरपंचायतीत रूपांतर!

ब्रेनप्रतिनिधी । अकलूज


सोलापूर जिल्ह्यातील अकलूज माळेवाडी व नातेपुते या दोन्ही ग्रामपंचायतींना अनुक्रमे नगरपरिषदेचा व नगरपंचायतीचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. राज्य शासनाने या निर्णयाविषयी काल अध्यादेश पारित केला असून, यामुळे अकलूज, माळेवाडी व नातेपुते वासियांना मोठे यश मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, यासंदर्भातील निर्णय होऊनही अंतिम अध्यादेशासाठी नागरिकांना तब्बल दीड वर्षे वाट बघावी लागली आहे.


अकलूज-माळेवाडी व नातेपुते ग्रामपंचायतींना नगरपरिषदेचा व नगरपंचायतीचा दर्जा देण्याच्या निर्णयाची अंलबजावणी व्हावी यासाठी मागील ४३ दिवसांपासून अकलूजकरांचे साखळी उपोषण सुरु होते. त्यांच्या या उपोषणाला शासनाच्या नगरविकास खात्याने जाहीर केलेल्या अंतिम अध्यादेशाच्या स्वरूपात मोठे यश प्राप्त झाले आहे. तिन्ही गावांच्या नागरिकांनी फटाक्यांच्या आतिषबाजीने या अध्यादेशाचे स्वागत केले असून, सगळीकडे आनंदोत्सव आहे. काल साखळी उपोषणाचा ४३ वा दिवस होता.
वाचा । स्थानिक स्वराज्य संस्थांना २,९१३ कोटी ५० लाखांचा निधी प्राप्त
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ अंतर्गत माळशिरस तालुक्यातील अकलूज-माळेवाडी ग्रामपंचातीला नगरपरिषदेचा व नातेपुते ग्रामपंचातीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने सप्टेंबर, २०१९ मध्येच राजपत्राद्वारे उद्घोषणा प्रसिद्ध करून संबंधित निर्णयावर आक्षेपांची मागणी केली होती. त्यानंतर संपूर्ण अवलोकन करून महाराष्ट्र शासनाने अकलूज व माळेवाडी या दोन ग्रामपंचायतींचे स्थानिक क्षेत्र ग्रामीण क्षेत्रातून लहान नागरी क्षेत्र म्हणून ‘अकलूज नगरपरिषद’ या नावाने नगरपरिषद गठीत करण्याच्या दृष्टीने अंतिम अधिसूचना जाहीर केली आहे. या लहान नागरी क्षेत्राच्या हद्दी कोणत्या असतील त्याची सूचीही अधिसूचनेत जोडण्यात आली आहे.


सोबतच, नातेपुते ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठीही शासनाने सारखच निर्णय घेतला आहे. नव्याने रचना केलेल्या नगरपंचायतीची रीतसर रचना होईपर्यंत तिचे कर्तव्य व अधिकार पार पाडण्यासाठी शासनाने पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची ‘नातेपुते नगरपंचायते प्रशासक’ म्हणून नेमणूक केली आहे. तर अकलूज नगरपरिषदेचा कारभार सध्या माळशिरसचे तहसीलदार यांच्याकडे असणार आहे.

संग्रहित छायाचित्र

हेही वाचा । २२ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल : काय सुरु आणि काय बंद?
> बऱ्याच दिवसांपासून रखडून होती प्रक्रिया
अकलूज-माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत आणि नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतरण करण्याची प्रक्रिया २०१८ मध्येच सुरु झाली होती. सप्टेंबर, २१९ मध्ये याविषयी अंतिम निर्णयही घेण्यात आला होता, मात्र अंतिम अध्यादेश पारित करण्याची प्रक्रिया शासन दरबारीच अडकून होती. दरम्यान, यासंदर्भात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, नेते धैर्यशील मोहिते-पाटील व तत्कालीन सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांचाही शासनाकडे पाठपुरावा सुरु होता.


दुसरीकडे, गेल्या दीड वर्षांपासून अधिसूचना जाहीर न झाल्यामुळे त्रस्त नागरिकांनी गेल्या २२ जूनपासून तब्बल ४३ दिवस साखळी उपोषण केले. त्यांच्या या उपोषणाला अखेर काळ फळ मिळाले. विधानपरिषद सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी नव्या नगरपरिषद व नगरपंचायत गठीत झाल्याबद्दल ज्यांच्या काळात हा प्रश्न पूर्णत्वास निघाला ते माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अकलूज-माळेवाडी-नातेपुते या गावांचे नागरिक व पदाधिकारी या सर्वांचे आभार मानले आहेत. नागरिकांचा सामूहिकपणा व एकसंघतेचे हे यश असल्याचे ते म्हणाले.

Join @ मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in वर. तुमच्या परीसरातील घडामोडी आणि उपक्रमांबद्दल आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: