आंध्रप्रदेशच्या माजी विधानसभा अध्यक्षांनी केली आत्महत्या

आंध्रप्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष कोडेला शीवप्रसाद राव यांनी स्वतःच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे प्रकरण समोर आले आहे. दरम्यान, आत्महत्या का केली याचे मुख्य कारण कळू शकलेले नाही. 

 

हैदराबाद, १६ सप्टेंबर

आंध्रप्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) ज्येष्ठ नेते कोडेला शिवप्रसाद राव यांनी आत्महत्या केली असल्याचे वृत्त समोर आले आहे. आज, १६ सप्टेंबर रोजी कोडेला यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, असल्याची माहिती त्यांच्या घरच्यांनी पोलिसांना दिली आहे.

आंध्रप्रदेशचे माजी विधानसभा अध्यक्षांनी अनपेक्षितपणे केलेल्या आत्महत्येचे मूळ कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांचे सरकार आल्यानंतर कोडेला यांचे पुत्र आणि कन्येविरुद्ध भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे दाखल करण्यात आली होती. मीडिया रिपोर्टनुसार, आंध्र प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष असताना विधानसभेच्या सभागृहातील टेबल-खुर्च्या आपल्या मुलाच्या शोरुममध्ये पोहोचवण्याचा कोडेला यांच्यावर आरोप करण्यात आला होता.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी  कोडेला शिव प्रसाद राव यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. आपण राव कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे के. चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे. आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनीही कोडेला यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान, कोडेला यांच्या संशयास्पद आत्महत्येविषयी पश्चिम हैद्राबादचे डीसीपी यांनी स्पष्टीकरण देताना खरं काय आहे ते शवविच्छेदनानंतरच कळणार असल्याचे म्हटले आहे. “कोडेला शिवप्रसाद यांनी त्यांच्या घरी स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे घरच्यांनी सांगितले आहे. या प्रकरणी केस दाखल करण्यात आला असून, हे प्रकरण आत्महत्येचे आहे की नाही हे शवविच्छेदन केल्यानंतरच कळेल”, असे डीसीपी यांनी म्हटले आहे.

तेलगु देशम पक्षाकडून कोडेला शिव प्रसाद राव हे सहा वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. २०१४मध्ये झालेल्या विभाजनानंतर कोडेला यांची आंध्र प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षपदी नियुुुक्ती करण्यात आली होती. 1985 मध्ये माजी मुख्यमंत्री एनटीआर यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. सोबतच, चंद्राबाबू नायडू यांच्या मंत्रिमंडळातही त्यांनी अनेक खात्यांचे मंत्री म्हणून काम पाहिले आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: