ब्रेनबिट्स : राष्ट्रीय हायड्रोजन अभियान (नॅशनल हायड्रोजन मिशन)

ब्रेनबिट्सराष्ट्रीय हायड्रोजन अभियान


भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (रविवारी) राष्ट्रीय हायड्रोजन अभियानाची (नॅशनल हायड्रोजन मिशन) घोषणा केली. पर्यावरण संवर्धन व हवामान बदलाच्या (Climate Change) संदर्भातील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी शासनाने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे. या अभियानांतर्गत भारताला जगातील हरित हायड्रोजन उत्पादक व निर्यातक केंद्र बनवण्याचे प्रमुख उद्दिष्ट प्रस्तावित आहे. यामुळे नवऊर्जा व हरित ऊर्जा क्षेत्रात भारताला एक नवी ओळख प्राप्त होईल.

“भारतीय स्वातंत्र्याच्या या अमृत काळात आपल्याला भारताला हरित हायड्रोजन उत्पादन व निर्यातीचे वैश्विक केंद्र (Green Hydrogen  Production & Export Hub) बनवायचे आहे. यामुळे भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यात फक्त मदतच होणार नाही, तर स्वच्छ ऊर्जा (Clean  Energy) संक्रमणाच्या बाबतीत भारत जगासाठी एक प्रेरणास्रोत बनेल”, असे पंतप्रधान मोदी राष्ट्रीय हायड्रोजन अभियानाची घोषणा करताना म्हणाले.

हेही वाचा । फक्त २५ शहरे उत्सर्जित करतात ५०% पेक्षा जास्त हरितगृह वायू!

याआधी, एका हरित आणि शाश्वत भविष्यसाठी देशात हरित ऊर्जा क्षेत्रात हायड्रोजन निर्मितीसह अभिनव पाऊल उचलण्यासाठी मोदींनी नोव्हेंबर, २०२० मध्ये एक घोषणा केली होती. या संकल्पनेला साकारण्याचा उद्देशाने म्हणून अर्थमंत्र्यांनी २०२१-२२ केंद्रीय अर्थसंकल्पात राष्ट्रीय हायड्रोजन ऊर्जा अभियान (National Hydrogen Energy Mission) सुरु करण्याचा प्रस्ताव जाहीर केला होता.

स्वच्छ आणि हरित ऊर्जेचा स्रोत म्हणून हरित हायड्रोजनची प्रदूषण कमी करण्यात मदत होईल, तसेच हरित रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल अशी शासनाची अपेक्षा आहे. पुढील ६ वर्षांमध्ये देशातील अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांची क्षमता अडीच पट वाढवण्याच्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी या अभियानाची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

प्रदूषणासाठी बीपीसीएल, एचपीसीएलसह चार कंपन्यांना ₹२८६ कोटींचा दंड

> राष्ट्रीय हायड्रोजन अभियानाची (NHM : National Hydrogen Mission) वैशिष्ट्ये 

  • या अभियानचा सर्वप्रथम प्रस्ताव फेब्रुवारीमध्ये जाहीर करण्यात आलेल्या संघ अर्थसंकल्प २०२१-२२ मध्ये मांडण्यात आला होता.
  • याअंतर्गत देशातील हरित ऊर्जा स्रोतांच्या मदतीने हरित हायड्रोजनची (green hydrogen) निर्मिती करण्यात येईल.  
  • भारताला जगातील हरित हायड्रोजन उत्पादक व निर्यातक देश बनवण्याचे प्रमुख उद्दिष्ट या अभियानात प्रस्तावित आहे.
  • पॅरिस करारांतर्गत ठरवलेल्या उत्सर्जन लक्ष्यांच्या पूर्ततेसाठी या अभियानाची मदत होणार.  
  • २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात नूतनीकरणयोग्य ऊर्जा व हायड्रोजन ऊर्जा अभियानासाठी एकूण १,५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

> हरित हायड्रोजन म्हणजे काय ? 

अपारंपरिक ऊर्जा स्रोत जसे की, हवा व सौरशक्ती इत्यादींपासून प्राप्त झालेल्या विद्युत ऊर्जेच्या साहाय्याने चालणाऱ्या इलेक्ट्रोलायझरद्वारे पाण्याला हायड्रोजन व प्राणवायू (ऑक्सिजन) विभाजित केले जाते. या प्रक्रियेतून प्राप्त होणाऱ्या हायड्रोजनला हरित हायड्रोजन (Green Hydrogen) म्हणतात. 

हरित हायड्रोजन हा एक स्वच्छ जळणारा रेणू असून, त्यामुळे लोह-पोलाद (आयर्न अँड स्टील), रसायने व वाहतूक सारख्या क्षेत्रांना कार्बनमुक्त करता येणे शक्य आहे. ह्या नवीकरणीय ऊर्जांना साठवता येत नाही किंवा ग्रीडच्या माध्यमातून प्रवाहित करता येत नाही, त्यांचा वापर हायड्रोजन निर्मितीसाठी करता येऊ शकतो. 

 

(मराठी ब्रेनवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या मूळ आणि कॉपीराईट असतात. तरीही, यावरील मजकूर चोरताना अथवा इतरत्र सामायिक करताना ते साभार करत चला. संबंधितांनी याविषयी काळजी घ्यावी.) 

सहभागी व्हा 👉 मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: