फक्त २५ शहरे उत्सर्जित करतात ५०% पेक्षा जास्त हरितगृह वायू!

ब्रेनवृत्तसागर बिसेन 


जगभरातील शहरांमधून होणाऱ्या एकूण हरितगृह वायू (Greenhouse Gas) उत्सर्जनाच्या ५० टक्क्यांहून अधिक उत्सर्जनासाठी जगातील फक्त 25 शहरे जबाबदार असल्याचे एका संशोधन अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.  आशिया खंडात जपान आणि चीन हे देश हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात वरच्या स्थानी आहेत. 

छायाचित्र स्रोत : scitechdaily

चीनच्या पर्यावरण अभ्यासकांनी अलीकडेच एक संशोधनपर अभ्यास केला आहे. त्यांच्या या पाहणीचा अहवाल फ्रंटियर्स इन सस्टेनेबल सिटीज या संशोधन नियतकालिकेत ‘जगभरातील १६७ शहरांमधील हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याच्या प्रगती व लक्ष्यांसाठीचे प्रयत्न सुरु ठेवणे’ (Keeping Track of Greenhouse Gas Emission Reduction Progress and Targets in 167 Cities Worldwide) या शीर्षकाखाली प्रकाशित झाला आहे. संशोधकांनी या अभ्यासात एकूण ५३ देशांतील १६७ शहरांमधील उत्सर्जनाच्या आकडेवारीची तपासणी केली.

या अभ्यासानुसार, जपानमधील टोकियो आणि चीनमधील शांघाय यांसारख्या आशियातील महानगरे हरितगृह वायूंची सर्वात मोठी उत्सर्जक आहेत. विकसनशील देशांमधील शहरांच्या तुलनेत युरोप, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसारख्या विकसित देशांमधील शहरांचे  दरडोई उत्सर्जन जास्त होते, असे या अभ्यासात म्हटले आहे. चीनचा विकसनशील देशांमध्ये  समावेश होता असला, तरी चीनमधील बहुतेक शहरांमध्ये विकसित देशांतील शहरांइतकेच हरितगृह उत्सर्जन होते. 

हेही वाचा । २०४०पर्यंत नवीन प्लास्टिक उत्पादन बंद करणे गरजेचे!

> संशोधन अभ्यासातील ठळक बाबी

विद्युतनिर्मिती, उद्योगधंदे आणि परिवहन हे तीन घटक हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात सर्वात मोठी भूमिका निभावतात, असे या अभ्यासाच्या निष्कर्षात मांडले आहे. पाहणीत समाविष्ट असलेल्या १६७ शहरांपैकी एक तृतीयांश शहरांमध्ये रस्ते वाहतुकीमुळे 30% हून अधिक उत्सर्जन होते. परिवहन या कारकामध्ये रस्ते वाहतूक व्यतिरिक्त रेल्वे, जलमार्ग आणि विमानचालन हे इतर कमी उत्सर्जन करणारे स्रोत आहेत. हे तीन घटक एकूण उत्सर्जनाच्या 15 टक्क्यांहून कमी उत्सर्जन करतात. 

संशोधकांना असेही आढळले आहे, की 2005 ते २०१६ या कालावधीत 42 शहरांपैकी 30 शहरांमध्ये प्रदूषणाच्या पातळीत घट झालली आहे. यांमध्ये ओस्लो, ह्युस्टन, सिएटल आणि बोगोटा या शहरांचा समावेश आहे. तर दुसरीकडे, ४२ पैकी जी उर्वरित 12 शहरे आहेत, त्यांमध्ये हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढले आहे.  रिओ डी  जानेरो, जोहान्सबर्ग आणि व्हेनिस या शहरांमध्ये उत्सर्जनात सर्वाधिक वाढ झाल्याचे अभ्यासात म्हटले आहे.

ब्रेनविश्लेषण । सन २०७० मध्ये एक तृतीयांश लोकसंख्या असेल अतिउष्ण प्रदेशात !

संबंधित अभ्यासात सहभागी असलेले चीनच्या सून यात सेन विद्यापीठातील संशोधक शाओकींग चेन सांगतात, “आज जगातील 50 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शहरांमध्ये रहात आहेत. ही शहरी लोकसांख्या जगभरातील 70 टक्क्यांहून अधिक हरितगृह वायू  उत्सर्जनासाठी जबाबदार असल्याचे समजते.  जागतिक अर्थव्यवस्थेला कार्बनमुक्त करण्यासाठी त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.” 

 

Join @ मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इत्यादी. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: