भारताने टाकलेल्या बहिष्काराचा चीनवर परिणाम होतोय !
ब्रेनवृत्त, नवी दिल्ली
”आपण भारतीयांनी मोठ्या प्रमाणात चीनच्या सामानावर बहिष्कार टाकायला सुरुवात केली असून, चीनचे अनेक ऍप्लिकेशन्सही काढून टाकतो आहोत. एका सर्वेक्षणातून ९१% जनता चीनच्या सामानावर बहिष्कार टाकू इच्छित असल्याचेही समोर आले आहे. याचा परिणाम चीनवर होत असून, तो गुगल आणि ट्विटरवर दबाव टाकत आहे. याचा अर्थ आपण जे काही करत आहोत ते परिणामकारक ठरत आहे,” असे उत्तर सोनम वांगचुक यांनी ग्लोबल टाइम्सच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर दिले आहे.
संग्रहित छायाचित्र
चीनमधून उगम पावलेला कोरोना विषाणू आणि त्यातच भारत – चीन सीमाभागातील तणावही वाढत आहे. त्यामुळे संतापलेले भारतीय चीनी उत्पादनांवर बहिष्कार टाकत आहेत, तर काही ठिकाणी मोबाईलममधील अनेक अनुप्रयोगही (Applications) काढून टाकण्यात आले आहेत. यावर चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं एका लेखातून टीका केली. ”सामान्य भारतीयांना चीनविरोधात भडकवण्याची आणि चीनला कलंकित करण्याचा प्रयत्न जाणूबूजून केला जात आहे. चीनची उत्पादनं सामान्य भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनले आहेत आणि ते हटवणं कठिण आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन पूर्णपणे अपयशी ठरेल,” असे ग्लोबल टाईम्समध्ये म्हटले आहे.
तसेच, सोनम वांगचुक भारतीय नागरिकांना चीनविरोधात भडकविण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. याला उत्तर देत वांगचुक यांनी चीनचा समाचारच घेतला आहे. वांगचुक यांनीदेखील एका व्हिडीओद्वारे चीनला प्रत्युत्तर दिले आहे. “अमूलने चीनविरोधात एक जाहिरात टाकल्यानंतर ट्वीटरने त्यांचे अकाऊंट बंद केले. तसेच काही अनुप्रयोगही गुगलने हटवली आहेत. त्यानंतर ग्लोबल टाईम्समधील लेखाविरोधात माझी प्रतिक्रिया विचारण्यात आली. जर ट्विटर आणि गुगलने असे केलेय, तर ती आपल्यासाठी चांगलीच बाब आहे. याचाच अर्थ, आपलं जे औषध आहे ते काम करू लागलंय, असं आपण समजलं पाहिजे, असे सोनम वांगचूक म्हणाले.
हेही वाचा : चिनी उत्पादनांवर बहिष्काराचा भारताचा प्रयत्न अपयशी ठरेल !
“ज्याप्रमाणे ग्लोबल टाईम्समध्ये भारतविरोधी टीका करण्यात आली, याचाही अर्थ असाच आहे की, भारताने चीनी उत्पादनांवर टाकलेल्या बहिष्काराचा त्यांच्यावर निश्चितच परिणाम होत आहे. कारण ग्लोबल टाईम्स कोणाच्याही गोष्टींवर टीका करत नाही. ते जर ‘भारतीय नागरिक चीनच्या उत्पादनांशिवाय राहूच शकत नाही’ अशी टीका करत असतील, तर त्यामागेही अनेक करणे आहेत, असे वांगचुक म्हणतात.
त्यामुळे, आता आपण चीनच्या सामानाशिवाय राहू शकतो की नाही, याचा विचार आता भारतीय जनतेनेच करायचा आहे. आपल्यामुळे सीमेवरच्या जवानांना कितीही त्रास झाला, तरी आम्हाला चीनच्या वस्तू हव्या, अप्लिकेशन्स हवी याचे उत्तर आता चीनला नागरिकांनीच घ्यायचे आहे”, असेही वांगचुक म्हणाले.