मंदावलेल्या अर्थव्यवस्थेत ५ टक्के विकास दर समाधानकारक : मुख्य आर्थिक सल्लागार

वृत्तसंस्था, एएनआय

नवी दिल्ली, ३० ऑगस्ट

चालू आर्थिक वर्ष २०१९-२० च्या पहिल्या तिमाहिनंतर (एप्रिल ते जून) आर्थिक विकास दर (जीडीपी) कमी होऊन ५ टक्के इतका झाला आहे. म्हणजेच हा विकास दर गेल्या साडेसहा वर्षातील दरांच्या तुलनेत सर्वाधिक खालच्या पातळीवर पोहोचला आहे. मात्र, जागतिक अर्थव्यवस्थेच्या खराब कामगिरी व भारतीय अर्थव्यवस्था सुस्तीत असताना, हा आर्थिक दर देशासाठी समाधानकारक असल्याचे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेचा एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीचा जीडीपी दर ५ टक्क्यांवर आला आहे. मागील आर्थिक वर्षातल्या अखेरच्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च २०१९ या दरम्यान जीडीपी ५.८ टक्के होता. हा दर आता अजून घसरून ५ टक्क्यांपर्यंत आला आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने (CSO) दिलेल्या माहितीत हे आकडे समोर आले आहेत. गेल्या सहा वर्षातला हा सर्वात कमी जीडीपी आहे, असेही कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

मानव विकास निर्देशांकात भारत १३०व्या स्थानी !

देशाच्या आर्थिक विकासाच्या खालावलेल्या या स्थितीवर देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार (चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर) कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, केंद्र सरकार अर्थव्यवस्थेला वेग देण्यासाठी अनेक प्रयत्न करीत आहे, जे अर्थमंत्र्यांनी नुकत्याच केलेल्या घोषणांवरुनही दिसून येते. सरकार पाच लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी व तसेच, अर्थव्यवस्थेला उर्जितावस्था प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले आहेत.

दरम्यान, देशाच्या खालावलेल्या अर्थव्यवस्थेच्या या स्थितीच्या पार्श्वभूमीवर ५ टक्के आर्थिक दर किती उपयोगी ठरू शकतो, यावर आर्थिक सल्लागारांना प्रश्न विचारण्यात आले. यावेळी उत्तर देताना कृष्णमूर्ती म्हणाले, “आपण ज्या शब्दांचा वापर करीत आहोत, त्यावरुन असे वाटते की आपण मंदीच्या काळातून जात आहोत. त्यामुळे आपण काय बोलत आहोत याचा विचार व्हायला हवा. देशाच्या अर्थव्यवस्थेत सुस्ती असली, तरी जगाची अर्थव्यवस्थेचीही प्रकृती खराब झाली आहे. तरीही आपण ५ टक्क्यांच्या दराने पुढे जात आहोत.”

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: