चिकनगुनिया आणि त्यावरील उपचार!

चिकनगुनिया हा एक त्रासदायक आजार आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी चिकनगुनियाची मोठी साथ आली होती. तेव्हा पासून चिकनगुनिया हा शब्द लोकांच्या ओळखीचा झाला. आज ह्या आजाराबद्दल थोडं जाणून घेऊया.

 

साप्ताहिक सदर । आरोग्यमंत्र


चिकनगुनिया म्हणजे काय? हा काय आजार आहे?

चिकनगुनिया हा व्हायरस किंवा विषाणूंमुळे होणारा आजार आहे. ‘चिकनगुनिया’चे विषाणू डासांच्यामार्फत निरोगी व्यक्तीच्या शरीरात जातात. हे व्हायरस किंवा विषाणू निरोगी व्यक्तीच्या शरीरात वाढून त्याला चिकनगुनियाचा आजार होतो. हा आजार बराचसा डेंगू सारखा आहे. या दोन्ही आजारांचे विषाणू ‘एडिस’ ह्या जातीच्या डासांमुळे पसरतात. त्यांना ‘टायगर डास’ सुद्धा म्हणतात. डेंगू किंवा चिकनगुनिया हे आजार संसर्गजन्य नाहीत. म्हणजेच आजारी व्यक्तीच्या स्पर्शाने पसरणारे नाहीत. या विषाणूजन्य डासांचा नायनाट केला किंवा त्यांच्या संपर्कापासून दूर राहिले तर डेंगू आणि चिकनगुनियाला दूर ठेवता येते.

चिकनगुनियाची लक्षणे काय?

चिकनगुनिया हा तापाचा आजार आहे. ताप हा साधारण तीन ते चार दिवस असते. ताप थंडी वाजून येऊ शकतो. सोबत डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ होणे, उलटी होणे, पुरळ येणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात. पण तापासोबतचे मुख्य लक्षण म्हणजे ‘सांधेदुखी’. सांधेदुखी जोरदार असते. हातापायाचे छोटे आणि मोठे सगळेच सांधे दुखू शकतात. सांध्यांवर सूजसुद्धा येऊ शकते. हे दुखणे इतकं त्रासदायक असते की रोगी व्यक्ती हवालदिल होऊन जातो. ‘चिकनगुनिया’ ह्या आफ्रिकन शब्दाचा अर्थ (दुखण्याने) वाकून गेलेला असा होतो. ही सांधेदुखी काही दिवस असते व ताप कमी झाल्यावर हळूहळू कमी होते. पण काही रुग्णांमध्ये ही सांधेदुखी बराच काळ टिकू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेतल्यास ही सांधेदुखी बरी होण्यासारखी असते. 

वाचा ।  आयोडीनयुक्त मीठ, आरोग्य आणि राष्ट्रीय धोरण

चिकनगुनियाचं दुखणं हे तीव्र स्वरूपाचं असलं तरी ह्या आजारात जीवाला धोका होत नाही. डेंग्यूत ज्याप्रमाणे रक्तवाहिन्या पाझरून रक्तदाब (बीपी) कमी होऊ शकतो किंवा इतर अवयवांवर परिणाम होऊ शकतो. तसे गंभीर परिणाम चिकनगुनियात सहसा दिसत नाहीत. त्यामुळे घरी आराम करून इलाज करण्यासारखा हा आजार आहे. पण हे नेहमी लक्षात ठेवावं की तुम्हाला चिकनगुनिया वाटणारा आजार हा दुसराही  ताप असण्याची शक्यता असू शकते. तापाचे बरेच आजार पहिल्या काही दिवसात सारखेच दिसतात. हिवताप ( मलेरिया ) किंवा टायफॉईडला विशिष्ट औषध द्यावे लागते. डेंगूविशेष लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे हे आजार तर नाहीत ना, ह्याची खात्री काही पेशन्टमध्ये आपल्याला करून घ्यावी लागते.  पुढील काही लक्षणं दिसल्यास आपण डॉक्टरांना लगेच भेटून तपासणी करून घ्यावी.

चिकनगुनियाची धोक्याची लक्षणे: 

१. ताप कमी न होणे किंवा वाढतच जाणे
२. चक्कर येणे
३. पोटात खूप दुखणे
४. वारंवार उलटी होणे
५. नाकातून/तोंडातून/लघवी संडासावाटे रक्तस्त्राव होणे
६. चक्कर येणे
७. दम लागणे/धाप लागणे
८. लघवी कमी होणे
९. गुंगी येणे
१०. हातपाय थंड पडणे, बीपी कमी होणे
११. लहान मुलांमध्ये मुल सारखे रडणे
१२. मुलांचे खाणे व पिणे कमी होणे

इत्यादी लक्षणे दिसल्यास वेळ न दवडता डॉक्टरांना भेटावे . बहुदा ही लक्षणे चिकनगुनियाची नसून गंभीर आजारांचीही  असू शकतात.

जॉन्सन व जॉन्सनची लस ठरली पाचवी मान्यताप्राप्त लस!

चिकनगुनियाचे निदान:

चिकनगुनियासाठी रक्ताची तपासणी आजाराच्या साधारणतः एक आठवड्यानंतर करतात. अँटिबॉडीची ही तपासणी चिकनगुनिया आहे की नाही हे सांगू शकते. ही तपासणी डॉक्टरांच्या निदानाला पूरक म्हणून करतात. इतर तापाच्या आजारांची शक्यता फेटाळून लावण्यासाठी डॉक्टर इतरही काही तपासण्या सांगू शकतात.

चिकनगुनियाचा उपचार:

इतर विषाणूजन्य तापांप्रमाणेच चिकनगुनिया हा आपोआप बरा होणारा आजार आहे. ह्या विषाणूच्या विरोधात           कुठलेही औषध सध्या तरी आपल्याकडे नाही. त्यामुळे उपचार हे फक्त लक्षणे कमी करण्यासाठी दिला जातात.

१. योग्य प्रमाणात आराम करावा.
२. दुखण्यासाठी व तापासाठी पॅरासीटामोल व गरज पडल्यास वेदनाशामक औषधे घ्यावी.
३. भरपूर पाणी व पेये घ्यावीत.
४. ताप गेल्यावरही दुखणे सुरु राहिल्यास डॉक्टरांना भेटावे. ही सांधेदुखी जवळपास सगळया रुग्णांमध्ये ठीक होते.
जर रक्तदाब, मधुमेह, किडनीचे आजार किंवा हृदयविकार ह्यांसारखे काही आजार असतील तर अधिक काळजी घेण्याची गरज असते.

डास हा आपला राष्ट्रीय शत्रू आहे. आपल्या शेजारी राष्ट्रांपेक्षा जास्त नुकसान डास करतात. त्यामुळे डासांचा नायनाट करणं हे प्राधान्य आहे. वैयक्तिक पातळीवर आपल्या घरातील व परिसरातील डासांचा नायनाट करणे व स्वच्छता ठेवणे, तसेच नगरपालिका/ ग्रामपंचायत पातळीवर प्रयत्न करून गावातील डासांचा नायनाट करणे आवश्यक आहे. डासांपासून वाचण्यासाठी मच्छरदाणी, हातपाय झाकणारे कपडे, डास दूर ठेवणाऱ्या क्रीम इत्यादींचा आपण वापर करू शकतो.

 

लेख : डॉ विनायक हिंगणे

(फिजीसियन, आरोग्यविषयक मराठी लेखक)

ट्विटर: @WEnayak 

 

संपादन व मुद्रितशोधन : मराठी ब्रेन

 

सहभागी व्हा 👉 मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा  www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: