‘कोव्हिड-१९’वर मात केलेल्यांना ‘थायरॉईड’चा धोका !
ब्रेनवृत्त, २४ मे
चीनच्या वूहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूवर औषध आणि लस तयार करण्याचं काम जगभरात युध्दपातळीवर सुरु आहे. मात्र दुसरीकडे, ‘कोव्हिड-१९’ आजारापासून बऱ्या होणाऱ्या लोकांमध्ये थायरॉईडसारख्या गंभीर आजार होत असल्याचे व शरीराच्या अवयवांवर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.
इटलीमधील पिसा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी ‘कोव्हिड-१९’च्या आजारातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांना थायरॉइडसारखा गंभीर आजार होत असल्याचा दावा केला आहे. तसेच, कोरोनाचे विषाणू हे शरीरातील एखाद्या विशिष्ट भागावर परिणाम करत असल्यामुळे बऱ्याचदा ऍनिमिया, ब्रेन स्ट्रोक किंवा इतर आजारही होण्याचा धोका होऊ शकतो, विद्यापीठातून प्रकाशित अहवालातून काही दिवसांपूर्वी समोर आलं आहे.
पिसा विद्यापीठातील (Pisa University) शास्त्रज्ञ फ्रान्सिस्को लॅट्रोफा (Francesco Latrofa) यांच्या म्हणण्यानुसार, नवीन कोरोना व्हायरस ‘सार्स -सीओवी-2’चे (SARS-CoV-2) विषाणू श्वसनातून शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यासोबतच कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये इतरही लक्षण या रुग्णांमध्ये आढळून आली आहेत. दरम्यान, 21 फेब्रुवारीला विद्यापीठाच्या रुग्णालयात 18 वर्षांच्या तरुणीची तपासणी केल्यानंतर तिच्या चाचणीचे अहवाल होकारात्मक आले. कोरोना पॉझिटिव्ह वडिलांच्या संपर्कात आल्यामुळे तिलाही कोरोनाची लागण झाली होती. पिसा विद्यापीठाच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. उपचारांनंतर 14 मार्च रोजी महिलेची तपासणी केली गेली तेव्हा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि डिस्चार्ज देण्यात आला.
मात्र, त्यानंतर तीन दिवसांनी पुन्हा या तरुणीला ताप, थकवा आणि घशात वेदना होऊ लागल्या. जेव्हा डॉक्टरांनी त्या तरुणीची तपासणी केल्यानंतर तिचा रक्तदाबही खूप वाढल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या तरुणीच्या सर्व चाचण्या पुन्हा करण्यात आल्या, त्यावेळी या महिलेला थायरॉइड झाल्याचं समोर आलं. याआधी एक महिन्यापूर्वी केलेल्या चाचण्यांमध्ये महिलेला हा आजार नव्हता. कोरोनाच्या संक्रमणानंतर महिलेला ‘सबअक्यूट थायराइडिटिस’ (Subacute Thyroiditis) आजार झाल्याचं रिेपोर्टनंतर समोर आलं. या तरुणीचे रिपोर्ट पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. त्यानंतर आठवड्याभराचा उपचारानंतर तरुणीची प्रकृती सुधारली.
हेही वाचा : ‘आयोडीन’युक्त मीठ, आरोग्य आणि राष्ट्रीय धोरण
जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. लाखो लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या या व्हायरसवर अद्यापही ठोस लस सापडलेली नाही. अनेक देशांत या विषाणूवर औषध आणि लस तयार करण्याचं काम सुरू आहे. ही लस कधी येणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
◆◆◆