दिल्लीकरांवर ‘कोरोना कर’ ; पेट्रोल-डिझेलची किंमतही वाढली !
ब्रेनवृत्त, नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्रालयाने ४ मे पासून १७ मे पर्यंत दुसऱ्यांदा लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. मात्र लॉकडाऊनच्या या तिसऱ्या टप्प्यात देशातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील काही भागांत काही प्रमाणात सूटही दिली आहे. त्याचबरोबर मद्याची दुकाने करण्याचा निर्णयही घेतला. या निर्णयानंतर देशात तब्बल ४० दिवसांनंतर दारूची दुकाने उघडल्यानंतर मद्यप्रेमींची, तसेच तळीरामांची दारु खरेदीसाठी एकच झुंबड उडालेली ठिकठिकाणी पहायला मिळात आहे, तर काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत.
परिणामी, यावर उपाय म्हणून दिल्लीतील केजरीवाल सरकारने मात्र थेट पर्याय योजला आहे. दिल्लीमध्ये दारु विक्रीवर विशेष ‘कोरोना शुल्क’ म्हणून अधिभार लावून मद्यप्रेमी, तळीरामांना जोराचा झटकाच दिला आहे. त्यामुळे आता दारुच्या कमाल किरकोळ किंमतीवर (एमआरपी) 70 टक्के विशेष कोरोना शुल्क आकारला जाणार आहे. म्हणजेच, आता दिल्लीकरांना दारु एकूण किमतीपेक्षा 70 टक्के जास्त महाग मिळणार आहे. आजपासून (ता. 5) हे नवे दर दिल्लीत लागू झाले आहेत. याचा अर्थ असा की, दारुची एक बॉटल जर 100 रुपयांना मिळत असेल, तर आता ग्राहकांना त्यासाठी 170 रुपये द्यावे लागतील.
दुसरीकडे, या शुल्क आकारणीबरोबरच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांद्वारे दारू दुकानांसमोर गोंधळ घातला गेला आणि नियमांचे उल्लंघन केले, तर मोठी कारवाई करणार असल्याचेही बजावले आहे. “दिल्लीतील काही दुकानांबाहेर काल गोंधळ पाहायला मिळाला ही दुर्दैवाची गोष्ट आहे. जर कुठेही सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही आणि इतर नियमांचं उल्लंघन केल्याचं समजलं, तर आम्हाला तो परिसर पूर्णतः बंद करावा लागेल. तसेच तिथे दिलेली शिथिलताही मागे घ्यावी लागेल. दिल्लीकरांच्या आरोग्यासाठी कठोर पावले उचलावी लागतील”असे म्हणत त्यांनी तळीरामांना इशारा दिला आहे.
दारू दुकाने उघडल्याने बाटलीसह कोरोना आणि हिंसाही घरी पोहचेल : डॉ अभय बंग
तसेच, आज दिल्ली शासनाने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये किंमत आधारित कर (व्हॅट) अनुक्रमे ₹१.६७ आणि ₹७.१० नी वाढ केली आहे.
Delhi Government increases VAT on petrol from 27% to 30%, and on diesel from 16.75 % to 30%. Price of petrol increased by Rs 1.67 & diesel by Rs 7.10 pic.twitter.com/AzcZgYAvZ1
— ANI (@ANI) May 5, 2020
दरम्यान, गृहमंत्रालयाने ग्रीन आणि झोनमध्ये मद्य आणि तंबाखूची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. तसेच, रेड झोनमध्येही कन्टेंन्मेंट क्षेत्र वगळता दारु विक्रीला परवानगी मिळाली आहे. मात्र दारूच्या दुकानांवर गर्दी करत मद्यप्रेमीं, तळीरामांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियमही पायदळी तुडवले असल्याचे दिसते. दुकानांबाहेरील गर्दी अनियंत्रित झाल्याने आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याने पोलिसांनी काही ठिकाणी सौम्य लाठीमारही केला.
◆◆◆