गिलोय आणि अश्वगंधा कोरोनाची साखळी तोडण्यात 100 टक्के प्रभावी
ब्रेनवृत्त, नवी दिल्ली
गिलोय आणि अश्वगंधा कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यात 100 टक्के प्रभावी आहेत. गिलोयमध्ये ‘किनोकार्टिसाइड’ आहे, तर अश्वगंधामध्ये ‘विथनॉन’ आहे. कोरोना विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करतो आणि संपूर्ण पेशी आणि प्रणालीमध्ये अडथळा आणतो आणि पेशींना संक्रमित करतो. त्यामुळे अश्वगंधा आणि गिलोय शरीरातील कोरोनावर इलाज ठरू शकतो, असा दावा पतंजलीचे संस्थापक आणि योगगुरू बाबा रामदेव यांनी व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
(संग्रहित छायाचित्र )
स्वामी रामदेव यांनी या मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर विशेष चर्चा केली. पतंजलीकडे कोरोना बाधितांसाठी १०० टक्के प्रभावी औषध असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, कोरोना बाधितांवर या औषधाची चाचणी करण्यात आली. यात त्यांना उपाशी पोटी गिलोय आणि जेवल्यानंतर अश्वगंधा आणि तुळसवटी देण्यात आली. परिणामतः ज्या रुग्णांवर ही चाचणी करण्यात आली, त्यांतील १०० टक्के रुग्ण बरे झाले आणि शून्य टक्के मृत्यू दर होता. सध्या या औषधाची प्रयोगशाळेतील चाचणी सुरु आहे. लवकरच त्याची संपूर्ण आकडेवारी समोर येईल आणि आम्ही कोरोनाला कसे पराभूत करू शकतो, हे स्पष्ट होईल.
तसेच, पतंजलीचे संशोधन पूर्ण झाले असून लवकरच संपूर्ण देशासमोर यासंबधीची वैज्ञानिक कागदपत्रे ठेवली जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आयुर्वेदात संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्याची शक्ती आहे. आम्ही कोरोनावर उपचार करण्यास पूर्णपणे सक्षम आहोत. हे केवळ नियंत्रणच नाही, तर आम्ही रोगाचा पूर्णपणे इलाज करण्यास सक्षम आहे, असेही यावेळी स्वामी रामदेव यांनी स्पष्ट केले.
(संग्रहित छायाचित्र)
दरम्यान, भारत सरकारचे आयुष (AYUSH) मंत्रालय म्हणजेच, आयुर्वेदिक, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्ससाठी असलेल्या मंत्रालयाने 6 मार्चला एक परिपत्रक काढले होते. भारतामध्ये आयुष मंत्रालयाच्या एका अहवालामध्ये ‘अर्सेनिक अल्बम ३०’चा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर देशातील बऱ्याच ठिकाणी या औषधाची मागणी वाढली. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे औषध प्रभावी मानले जाते. त्यामुळे जर आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढली, तर ते आपल्यासाठी फायद्याचे ठरू शकतं.
सद्या भारतासह जगभरातील अनेक देशांत कोरोना लस तयार करण्यासाठी संशोधन सुरू आहेत. अनेक देशांनी लस बनविल्याचा दावा केला आहे, मात्र अद्याप कोणत्याही देशांनी याचा ठोस पुरावा दिलेला नाही. आता भारतातील आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी औषधे यावर किती परिणाम कारक ठरतात, हे पाहणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.