‘कोव्हिड-१९’वर भारतीय बनावटीची लस तयार !
हैदराबाद स्थित ‘भारत बायोटेक कंपनी’ने ‘कोव्हिड-१९’वरील लस तयार केली असून, या लसीची जुलै महिन्यात माणसांवर चाचणी होणार आहे. ‘कोव्हॅक्सिन’ (Covaccine) असे या लसीचे नाव आहे. भारत बायोटेक कंपनीने ही लस ‘राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था’ (National Institute of Virology) आणि भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था (आयसीएमआर) यांच्या एकत्रित प्रयत्नांतून तयार केली आहे.
ब्रेनवृत्त | हैद्राबाद
भारतातील हैदराबाद स्थित ‘भारत बायोटेक कंपनी’ने ‘कोव्हिड-१९’वरील लस तयार केली असून, या लसीची जुलै महिन्यात माणसांवर चाचणी होणार आहे. ‘कोव्हॅक्सिन’ (Covaccine) असे या लसीचे नाव आहे. भारत बायोटेक कंपनीने ही लस ‘राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था’ (National Institute of Virology) आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्या एकत्रित प्रयत्नांतून तयार केली आहे, अशी भारत बायोटेक कंपनीचे अध्यक्ष डॉ. कृष्णा इला यांनी सांगितले आहे.
ही लस पूर्णपणे स्वदेशी बनावटीची असून विषाणूला विलग करून प्रयोगशाळेत ही लस तयार करण्यात आली आहे. तसेच या लसीची चाचणी मानवावर होणार असली तरी, किती जणांवर लसीचा प्रयोग केला जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राण्यांवरही या लसीची चाचणी यशस्वी आणि सुरक्षितपणे झाली असून, यात कोरोना विषाणूला प्रतिकार करण्याची क्षमता असल्याचं सिद्ध झाले आहे. संपूर्ण जगभरात १२० हून अधिक संस्था ‘कोव्हिड-१९’वरील लसीचे संशोधन करत आहेत. यात सहाहून अधिक भारतीय कंपन्यांचाही समावेश आहे.
हेही वाचा | ‘मॉडर्ना’ची ‘कोव्हिड-१९’वरील लस आणि चाचणीचे टप्पे
कंपनीने जाहीर केलेल्या पत्रकानुसार आयसीएमआरने भारत बायोटेक कंपनीला ‘कोव्हॅक्सिन’ लसीची मानवी चाचणी करण्यासाठी परवानगी दिली आहे. कंपनीने सर्वात आधी प्राण्यांवर या लसीची चाचणी केली. प्राण्यांवरील या लसीचे समाधानकारक परिणाम आल्याने आयसीएमआरने आता या लसीच्या मानवी चाचणीला अनुमती दिली आहे. ही लस सुरक्षित आहे की नाही, हे तपासण्यासाठी आता याची मानवी चाचणी होणार आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
ब्रेनविश्लेषण | ‘कोव्हिड-१९’वर ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ संख्यात्मकरित्या प्रभावी नाही !
दरम्यान, एच1एन1, रोटा व्हायरस अशा विविध आजारांसाठी या कंपनीने ४ अब्जहून अधिक लसींचे डोस तयार करून जगभर पुरवले आहेत. तर दुसरीकडे झायडस कॅडिआ, बायॉलॉजिकल ई, इंडियन इम्यूनॉलॉजिकल्स, मायनवॅक्स या कंपन्याही लसनिर्मिती प्रकियेत सहभागी आहेत.
ब्रेनबिट्स | ‘कोव्हिड-१९’वर प्रभावी ठरणारे ‘डेक्सामेथासोन’ म्हणजे नक्की काय ?
तथापि, पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ ही कंपनी जगात लस पुरवणारी सगळ्यांत मोठी कंपनी आहे. अमेरिकेतील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संयुक्त सहकार्याने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीही ‘कोव्हिड-१९’वर लस तयार करण्यासाठी कार्यरत आहे. पुढील वर्षापर्यंत ही लस उपलब्ध होऊ शकते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.