कामगार टंचाई भरून काढण्यासाठी राज्यात स्थापन होणार ‘कामगार केंद्र’

ब्रेनवृत्त, मुंबई

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक कारखान्यांतील परप्रांतीय कामगार त्यांच्या घरी निघून गेलेत. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगांमध्ये कामगारांची टंचाई निर्माण होऊ नये, या उद्देशाने विशेष ‘कामगार केंद्रा’ची (Labour Bureau) स्थापना केली जाणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

महाराष्ट्राच्या ‘उद्योग, कामगार कल्याण, कामगार व कौशल्य विकास विभागा’च्या वतीने या कामगार केंद्राची स्थापना होणार असल्याने स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची नवी संधी निर्माण झाली आहे. यामध्ये कामगारांची त्यांच्या कौशल्याप्रमाणे विभागणी केली जाईल व त्यानंतर, अवघ्या सात दिवसांत कामगारांना प्रशिक्षण देऊन उद्योगांची गरज पुरविली जाणार आहे. उद्योगांना कुशल, अकुशल मजूर, कामगार मोठ्या संख्येने उपलब्ध होतील आणि युवकांनाही चांगला रोजगार निर्माण होईल. त्यामुळे मराठी मुलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुभाष देसाई यांनी केले आहे.

परराज्यातून नोकरी, कामधंद्यांसाठी राज्यात आलेले अनेक कामगार आता पुन्हा आपापल्या गावी परतले आहेत. त्यांच्या जाण्याने राज्यात आता रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. ही सुवर्णसंधी स्थानिक भूमिपुत्रांनी सोडू नये, कारण, त्यासाठी आम्ही अनेकदा आंदोलने केली आहेत. महाराष्ट्राला ही एक संधी मिळाली आहे. त्यामुळे आता उद्योजकांनी स्थानिक भूमिपुत्रांना प्रथम संधी द्यावी. यामुळे मराठी माणसांची महाराष्ट्रातील बेकारी कमी होईल’, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे.

संग्रहित छायाचित्र

दुसरीकडे, चीनमधून अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपला कारभार गुंडाळला असून, ते विविध देशांमध्ये आपल्या कंपन्या, कारखाने हलविण्याच्या दृष्टीने काम करत आहेत. महाराष्ट्राही याकडे संधी म्हणून पाहत आहे, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील याबाबत दोन बैठका घेऊन आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचाच भाग म्हणून कामगार ब्युरोची स्थापना केली जाणार असल्याचे सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, आधीही मागील वर्षी ऑगस्ट महिन्यातील एका पत्रकार परिषदेत देसाई यांनी (तत्कालीन मंत्रीमंडळात असताना) राज्यात सुमारे ६० लाख रोजगार निर्माण झाले असून, त्यांत राज्यातील जवळपास ८०% भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात आले असल्याचे म्हटले होते.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: