अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात आगीची दुर्घटना; १० जण दगावले!

वृत्तसंस्था । आयएएनएस

ब्रेनवृत्त । अहमदनगर 


अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता गृहात (ICU) लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार १० जण घटनास्थळीच दगावले असून, काही रुग्णांना गंभीर इजा झाली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल तातडीने दाखल झाल्याने आग लवकर आटोक्यात आली, मात्र बचावाच्या धावपळीत अनेक रुग्ण व कर्मचारी जखमीही झाले आहेत.

अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आज सकाळी सुमारे अकरा ते साडेअकराच्या सुमारास भीषण आग लागली. अचानक आग लागल्याने रुग्णालयात खळबळ उडाली आहे व तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल करून आग आटोक्यात आणली गेली, पण आगीच्या दुर्घटनेमुळे अनेक रुग्णांचा नाहक बळी गेला आहे. जवळपास १० रुग्ण घटनास्थळीच होरपळून मृत्युमुखी पडले आहेत, तर काही रुग्णांना गंभीर इजा झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात जवळपास २० रुग्ण असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा । प्राणवायू तुटवड्यामुळे महाराष्ट्रात एकही मृत्यू नाही!

रुग्णालयात अचानक आग लागल्याने अतिदक्षता गृहातील रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलावण्यात आले. दरम्यान, या धावपळीत काही सिव्हिल कर्मचाऱ्यांनाही इजा झाली आहे. “सद्या रुग्णालयातील नर्स, वॉर्ड बॉय आणि डॉक्टरांद्वारे रुग्णांना सुरक्षित काढण्याचे कार्य सुरु आहे. अतिदक्षता विभागाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे आणि त्यामुळे रुग्ण भाजले गेले”, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

सदर आगीच्या घटनेबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दखल घेतली असून, ते लवकरच जिल्हा रुग्णालयाला भेट देणार आहेत. “आगीचे कारण स्पष्ट झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल आणि मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना व जखमींना तात्काळ मदत केली जाईल”, असे मुश्रीफ म्हणाले. 

 

सहभागी व्हा 👉 मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: