एमईआरसीची समिती करणार वाढीव वीजदरांची चौकशी
नियमबाह्य वाढीव वीजदर आकारण्यात आलेल्या प्रकरणांच्या चौकशीसाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग द्विस्तरीय समिती गठीत करणार आहे.
मराठीब्रेन वृत्त
मुंबई, ७ डिसेंबर
मुंबई उपनगरातील वाढीव वीजदर आणि मीटर रीडिंगनुसार बिल न आकारण्याच्या गैरप्रकारांची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून (Maharashtra Electricity Regulation Commission) द्विस्तरीय समिती नेमण्यात येणार आहे. आयोगाने ठरवून दिलेल्या दरांपेक्षा वाढीव दराने विद्युत देयके ग्राहकांना देण्यात आलेल्या प्रकरणांच्या अनुषंगाने ही दखल घेण्यात आली आहे.
अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडद्वारे उपनगराच्या काही क्षेत्रात वीज पुरवठा केला जातो. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (MERC) या क्षेत्रांमध्ये १ सप्टेंबर २०१८ पासून वीज दरात सुधारणा केली आहे. त्यानुसार सरासरी ०.२४ टक्के इतकी वीज दरवाढ मंजूर करण्यात आली होती. मात्र अदानी इलेक्ट्रिसिटीने नियमित दरापेक्षा खूप जास्त रकमेची वीज देयके ग्राहकांना पाठवल्याबाबतच्या बातम्या विविध वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमांमधून समोर आल्या आहेत. एमईआरसीने ग्राहकांच्या तक्रारींची आणि या वृत्तांची दखल घेतली आहे.
सौभाग्य योजनेत मोठ्या राज्यांचा मंद वेग
ठरवून दिलेल्या वीजदरांपेक्षा जास्त दर आकारण्याबाबत आयोगाने अदानीला २४ तासांत स्पष्टीकरण देण्याचे परिपत्रक ४ डिसेंबरला दिले होते. ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी आणि त्यामुळे निर्माण होणारा असंतोष लक्षात घेत आयोगाने आता या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी द्विस्तरीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. सनदी अधिकारी अजित कुमार जैन आणि एमईआरसीचे माजी सदस्य विजय सोनवणे यांचा या समितीत समावेश असेल. ही समिती येत्या दोन-तीन महिन्यांत वीज देयकाच्या गैरप्रकारांची चौकशी करणार आहे.
दरम्यान, एबीपीमाझा च्या एका वृत्तानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाबाहेर आंदोलन केले होते. एमईआरसीचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांना निवेदन दिल्यानंतर कुलाब्यातील वर्ल्ड ट्रेंड सेंटरबाहेर त्यांनी पाच मिनिटं निदर्शने व घोषणाबाजी केली आणि आंदोलन संपवले.
◆◆◆