शासनातर्फे ऑनलाईन वर्गांविषयी शाळांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील शाळांद्वारे सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन वर्गांविषयी मार्गदर्शक सूचना काल जाहीर करत एका दिवसांत किती तासिका आयोजित केल्या जाव्यात व त्यांमध्ये किती वेळेचा अंतर असावा याविषयीही मर्यादा घालून दिल्या आहेत.
ब्रेनवृत्त | नवी दिल्ली
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील शाळांद्वारे सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन वर्गांविषयी मार्गदर्शक सूचना काल जाहीर केल्या. सोबतच, एका दिवसांत किती तासिका आयोजित केल्या जाव्यात व त्यांमध्ये किती वेळेचा अंतर असावा याविषयीही मंत्रालयाने मर्यादा घालून दिल्या आहेत. ‘कोव्हिड-१९‘च्या पार्श्वभूमीवर शाळांद्वारे ऑनलाइन शिक्षणाची सुरुवात झाल्याने मुलांचा बहुतांश वेळ हा डिजिटल स्क्रीनच्या समोर जात असल्याने, अनेक पालकांनी शासनाकडे चिंता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने संबंधित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
‘कोव्हिड-१९’च्या महासाथीमुळे देशातीलच नव्हे, तर विदेशातही बहुतांश शाळा बंद आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून ऑनलाइन शिक्षण देण्याचे सुरु करण्यात आले आहे. भारतातही या पर्यायांची सुरुवात हळूहळू झाली आहे. मात्र, ऑनलाइन पद्धतीच्या या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना, विशेषतः लहान मुलांचा बहुतांश वेळ हा डिजिटल पटलाच्या समोर जातो आहे. त्याविषयीच्या गंभीर परिणामांना लक्षात शासनाने ऑनलाइन वर्गांविषयी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
वाचा : युजीसीच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक : मनुष्यबळ मंत्रालय
‘प्रज्ञाता’ म्हणून संबोधित करण्यात आलेल्या या सूचनांमध्ये पूर्व प्राथमिक वर्गांच्या तासांचा जास्तीत जास्त कालावधी ३० मिनिटे असावा, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सूचित केले आहे. तसेच, वर्ग १ ते ८ च्या ऑनलाइन वर्गांसाठी प्रत्येकी ४५ मिनिटांचे दोन सत्र (तासिका), तर वर्ग ९ ते १२ साठी प्रत्येकी ३०-४५मिनिटांच्या दिवसातून एकूण चार तासिका घेण्यात याव्यात, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
“कोव्हिड-१९ ने गंभीरपणे देशाच्या शिक्षणक्षेत्राला प्रभावित केले असून, यामुळे देशातील शाळांमध्ये नोंदणी असलेल्या सुमारे २४० मिलियन विद्यार्थ्यांवर प्रभाव पडला आहे”, असे मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक‘ यांनी म्हटले आहे. “या मार्गदर्शक सूचना टाळेबंदीमुळे घरी असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आल्या असून, सर्व शाळांनी या सुचनांचे पालन करणे गरजेचे आहे. ऑनलाइन शिक्षणावरील या मार्गदर्शक सूचना येत्या काळात देशात शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी पथदर्शी ठरतील”, असेही पोखरियाल यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : शालेय शिक्षणाला सुरुवात करायची! पण कशी?
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावाला लक्षात घेऊन देशात २४ मार्च पासून देशव्यापी टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे शिक्षणक्षेत्रही एकदम थांबले. अनेक परीक्षा अर्ध्यातच थांबवण्यात आल्या, तर विद्यापीठांच्या मागील सत्राच्या अनेक परीक्षा अजूनही प्रलंबित आहेत.
◆◆◆