पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांचे निधन
ठाणे , १३ जुलै
संपूर्ण आयुष्य भारतीय इतिहासाचे जतन आणि अभ्यास करण्यात वेचणारे पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांचे आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजाराने ग्रस्त होते. वयाच्या ८६व्या वर्षी गोरक्षकर यांची प्राणज्योत मालवली. ऐतिहासिक गोष्टींच्या जतनसोबतच लेखक, कला समीक्षक, संग्रहालय तज्ज्ञ अशा विविध भूमिका त्यांनी पार पाडल्या.
भारतीय इतिहास जपण्यासाठी अवघे आयुष्य वेचणाऱ्या सदाशिवराव गोरक्षकर यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात (पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझिअम) सहाय्यक अभिरक्षक म्हणून केली. संग्रहालयात काम करताना त्यांनी संग्रहालय शास्त्रातील डॉक्टरेटदेखील मिळवली. इंग्रजकालीन बॉम्बे स्कूल ऑफ आर्टच्या शैलीतील चित्रकलेचे दुर्मिळ नमुने संरक्षित करण्यात आलेल्या कोकणातील देवरूखमध्ये लक्ष्मीबाई पित्रे कला संग्रहालय त्यांच्या मार्गदर्शनाखाली साकारले गेले.
गोरक्षकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत इतिहास आणि संग्रहशास्त्र अशा विषयांवर व्यापक लिखाणही केले आहे. राजभवन्स इन महाराष्ट्र, अॅनिमल्स इन इंडियन आर्ट, द मॅरिटाइम हेरिटेज ऑफ इंडिया, कार्ले केव्हस ऑफ वेस्टर्न इंडिया, कालिदास अँड द महायोगी ऑफ घारापुरी ही त्यांनी लिहिलेली पुस्तके प्रसिद्ध आहेत. सोबतच त्यांनी भारतीय गुप्तकालीन शिल्पकलेवरही लेखन केलेे. या कार्याचा गौरव म्हणून त्यांना 2003 मध्ये पद्मश्री हा विशेष पुरस्कारही देण्यात आला. २०१६ मध्ये त्यांना चतुरंगच्या जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या दृष्टीने त्यांच्या हातून घडलेली उत्कृष्ट लेखनकृती म्हणजे ‘डॉन ऑफ सिव्हिलायजेशन ऑफ महाराष्ट्र’. यामध्ये त्यांनी उत्खननातून हाती आलेल्या तिसऱ्या शतकातील प्रागैतिहासिक नमुन्यांच्या आधारे इतिहासाच्या प्रदीर्घ कालौघातील महाराष्ट्राचा दीर्घ प्रवास अधोरेखित केला.
भारतातील आणि भारतीय वस्तु संग्रहालय शास्त्राच्या प्रमुख उद्गात्यांपैकी एक डाॅ. सदाशिवराव गोरक्षकर यांच्या निधनाची बातमी अतिशय दु:खद आहे! त्यांनी वस्तुसंग्रहालयांकडे पाहण्याची एक द्रृष्टी विकसित केली,अनेक तरुणांना मेंटर केलं आणि देशात अनेक वस्तुसंग्रहालये विकसित केली! श्रध्दांजली! pic.twitter.com/1i352yM63D
— Dr. VINAY Sahasrabuddhe (@vinay1011) July 13, 2019
पद्मश्री गोरक्षकर यांच्या जाण्याने सगळीकडे एक इतिहास अभ्यासक, संग्रहालयतज्ज्ञ व लेखक हरपल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.
◆◆◆