पंतप्रधानांचे भाषण प्रसारित न करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण प्रसारित होण्यापासून रोखणाऱ्या चेन्नई दूरदर्शन केंद्राच्या एका अधिकाऱ्यावर प्रसारभारतीने निलंबनाची कारवाई केली आहे. शिस्तभंग केल्याबद्दल ही निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे प्रसार भारतीने सांगितले आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
चेन्नईतील दूरदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक आर वसुमथी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास (आयआयटीएम) येथील भाषण प्रसारित होण्यापासून रोखले होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रसारभारताने निलंबनाची कारवाई केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३० सप्टेंबर रोजी आयआयटी मद्रास येथे पदवीदान समारंभात हजेरी लावली होती. त्यानिमित्ताने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ‘डीडी पोडीगई’ या शासकीय दूरचित्रवाहिनीवर पंतप्रधान मोदींचे भाषण प्रसारित करण्यासाठी परवानगी दिली होती, पण वसुमथी यांनी भाषण प्रसारित होण्यापासून रोखले.
दरम्यान, निलंबनाच्या आदेशात प्रसारभारतीने कारवाई करण्यामागचे कारण स्पष्ट सांगितलेले नाही. संबंधित अधिकाऱ्याने शिस्तभंग केल्यामुळेच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे प्रसारभारतीने म्हटले आहे. ही कारवाई ‘नागरी सेवा नियम १९६५’ अंतर्गत करण्यात आली असल्याचे सांगितले आहे.
◆◆◆