सुप्रसिद्ध कवी डॉ. राहत इंदौरी यांचे निधन !
वृत्तसंस्था | इंदौर
सुप्रसिद्ध शायर आणि कवी डॉ. राहत इंदौरी यांचे आज ‘कोव्हिड-१९’ची लागण व हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. मध्यप्रदेशाच्या इंदूरमधील अरबिंदो रुग्णालयात त्यांनी आज संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट होताच त्यांना रुग्णालयात रविवारी दाखल करण्यात आले होते. हिंदी आणि उर्दू शायरीला जगभरात मानाचे स्थान मिळवून देण्यात राहत इंदौरी यांचे मोठे योगदान आहे.
“त्यांना आज दोनदा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली”, अशी माहिती अरविंदो रुग्णालयाचे डॉक्टर विनोद भंडारी यांनी दिली. राहत इंदौरी यांनी आपल्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे मंगळवारी समाज माध्यमांतून सांगितले होते. “कोव्हिडची प्राथमिक लक्षणे दिसू लागताच माझी कोरोना चाचणी करण्यात आली. तिचा अहवाल सकारात्मक आला आहे, त्यामुळे मी अरविंदो हॉस्पिटलमध्ये भरती आहे. या आजाराचा मी लवकरात लवकर पराभव करावा, अशी प्रार्थना करा. आणखी एक विनंती आहे, मला किंवा माझ्या कुटुंबीयांना फोन करु नका, आपणास माझ्या प्रकृतीची माहिती ट्विटर आणि फेसबुकवर मिळेल”, असे ट्विट त्यांच्या खात्यावरून मंगळवारी सकाळी करण्यात आले आहे.
‘साजिद-वाजिद’जोडीतील वाजिद खान यांचे निधन
● डॉ. राहत इंदौरी यांच्याबद्दल
दि. १ जानेवारी १९५० रोजी इंदौरमधील रफतुल्लाह कुरेशी यांच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. कापडाच्या गिरणीत ते काम करायचे. त्यांच्या आईचे नाव मकबूल उन निसा बेगम असे होते. त्यांंनी दहावीपर्यंतचे शिक्षण इंदोरमधीलच नूतन विद्यालयातून पूर्ण केले. पुढे त्यांनी इस्लामिया करिमीया महाविद्यालयातून त्यांनी पदवी आणि बरकतुल्लाह विद्यापीठातून उर्दूमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते.
इंदौरी हे एक लोकप्रिय शायर असण्यासोबतच ते बॉलिवूडमधील प्रसिद्ध गीतकारही होते. राहत इंदौरी हे उर्दू कविता आणि शायरी विश्वातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक गाण्यांचे लेखनही केले आहे. त्यांनी मुन्नाभाई एम.बी.बी.एस., मर्डर आणि इतर चित्रपटांसाठी सुद्धा गाणी लिहिली आहेत. आज हमने दिल का हर किस्सा (सर), चोरी चोरी जब नजरे मिली (करीब), ये रिश्ता क्या कहलता है (मीनाक्षी), धुआ धुआ (मिशन काश्मीर), दिल को हजार बार (मर्डर) अशी अनेक अर्थपूर्ण गाणी त्यांच्या लेखणीतून उतरली. ऋत, मौजूद, नाराज अशा पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले होते.