पोखरणमधील मातीची भांडी घडवण्‍याच्‍या प्राचीन कलेचे पुनरुज्जीवन

ब्रेनवृत्त, नवी दिल्ली

राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्याच्या पोखरण या छोट्या गावातल्या 80 कुटुंबाना 80 इलेक्ट्रिक मातीकाम चाकांचे वितरण करण्यात आले. पोखरणमधील भांडी तयार करण्याच्या कलेला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने ‘खादी आणि ग्रामोद्योग आयोगा‘कडून (केव्हीआयसी) इतर कामाच्या शोधात असणाऱ्या कुटुंबाना या चाकांचे वाटप करण्यात आले.

पोखरणमधील जवळपास 300 कुंभार कुटुंबे अनेक दशके मातीची भांडी तयार करण्याच्या कामात आहेत. मात्र कष्टकरी आणि बाजारपेठेचा आधार नसल्याने ही कुटुंबे चरितार्थासाठी इतर मार्गाच्या शोधात होती. या नागरिकांची गरज ओळखून इलेक्ट्रिक चाकांबरोबरच केव्हीआयसीने माती मिश्रणासाठीच्या 8 यंत्रांचेही वाटप केले. या यंत्रामुळे 800 किलो मातीचे 8 तासातच मिश्रण करता येते.

प्रातिनिधिक छायाचित्र

दरम्यान, भारताची पहिली अणुचाचणी झालेल्या या गावाला ‘टेराकोटा’ उत्पादनांची समृध्द परंपरा लाभली आहे. भांडी करण्यासाठी लागणारी ही माती कुंभारांनी हतांनी मळायची ठरवल्यास 800 किलो मातीसाठी त्यांना साधारणतः 5 दिवस लागतात. ‘केव्हीआयसी’ने गावात 350 थेट रोजगार निर्माण केले आहेत. या 80 कुंभाराना केव्हीआयसीने 15 दिवसांचे प्रशिक्षण दिले असून, त्यांनी उत्कृष्ट भांडी घडवली आहेत. कुल्हडपासून ते फुलदाणी, मूर्ती, पारंपरिक भांडी, स्वयंपाकासाठी तसेच शोभेच्या वस्तु अशा विविध प्रकारच्या वस्तू हे कारागीर घडवतात.

हेही वाचा : जाणून घ्या भांडी आणि आपले आरोग्य यांचा संबंध!

कुंभारानी अतिशय कल्पकतेने आपल्या कलेतून स्वच्छ भारत अभियान आणि आंतरराष्ट्रीय योग दिन साकारला. पंतप्रधानांनी साद घातल्याप्रमाणे आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी, स्वयं रोजगार निर्माण करून कुंभाराना बळकट करण्यासाठी आणि त्याच बरोबर नष्ट होत जाणारी ही कला पुनरुज्जीवित करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी इलेक्ट्रिक चाक आणि इतर साहित्याचे दूरचित्रसंवादद्वारे (Video Conference) वाटप केल्यानंतर सांगितले.

पोखरण आतापर्यंत अणू चाचणीचे स्थान म्हणून ओळखले जात होते. मात्र, आता लवकरच उत्कृष्ट भांडी तयार होणारे स्थान अशीही नवी ओळख निर्माण होईल. ‘कुंभार सशक्तीकरण योजनें’तर्गत (Potters Empowerment Scheme) कुंभार समुदायाला मुख्य प्रवाहात परत आणण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यांना आधुनिक साहित्य आणि प्रशिक्षण पुरवून समाजाशी परत जोडत कलेला पुनरुज्जीवित करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही सक्सेना यांनी सांगितले.

या कुंभाराना बाजारपेठेचे सहाय्य मिळावे यासाठी बारमेर आणि जैसलमेर रेल्वे स्थानकांवर या भांड्यांची विक्री आणि विपणन सुलभ करण्याच्या सूचना त्यांनी केव्हीआयसीच्या राजस्थान राज्य संचालकांना केली. ‘पोखरण’ हे नीती आयोगाने निश्चित केलेल्या आकांक्षी जिल्ह्यांपैकी (Apirational Districts) एक आहे. राजस्थानमधील सुमारे 400 रेल्वे स्थानकांवर खाण्याच्या वस्तूची केवळ मातीच्या/टेराकोटाच्या भांड्यात विक्री केली जाते. त्यामध्ये बारमेर आणि जैसलमेरचा समावेश असून, ही ठिकाणे पोखरणजवळ आहेत.

हेही वाचा | ‘केव्हीआयसी’च्या मदतीने सशस्त्र दल टाकणार ‘स्वावलंबी भारत’चे पहिले पाऊल !

राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, हरियाणा, पश्चिम बंगाल, आसाम, गुजरात, तमिळनाडू, ओडिशा, तेलंगणा, बिहार मधल्या अनेक दुर्गम भागात केव्हीआयसीने ‘कुंभार सशक्तीकरण योजना’ सुरु केली आहे. राजस्थानमधे जयपूर, कोटा, श्री गंगासागर यांसारख्या बारापेक्षा जास्त जिल्ह्यांना या कार्यक्रमाचा लाभ होत आहे.या योजनेअंतर्गत केव्हीआयसी माती मिश्रणासाठी यंत्र आणि भांडी तयार करण्यासाठी इतर साहित्य पुरवते. यंत्रामुळे भांडी निर्मितीच्या प्रक्रियेतले कष्ट कमी होऊन कुंभारांच्या उत्पन्नातही 7 ते 8 पटींनी वाढ झाली आहे.

(पत्र माहिती कार्यालयाच्या संदर्भासह)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: