गोपनीयतेची शपथ आता सरपंचालाही लागू

ब्रेनवृत्त

मुंबई, १७ जुलै 

राज्यातील मंत्री आणि आमदारांप्रमाणे थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांनाही आता पद आणि गोपनियतेची शपथ घ्यावी लागणार आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ग्रामीण विकास आणि सामूहिक बांधिलकी लोकप्रतिनिधींमध्ये विकसित होण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

थेट जनतेतून निवडून येणाऱ्या सरपंचालाही आता पद आणि गोपनीयतेची शपथ घ्यावी लागणार आहे. ग्रामपंचायत सदस्यांना व सरपंचपदावर असलेल्या जनप्रतिनिधींमध्ये बांधिलकी आणि गावाच्या विकासाचा दृष्टिकोन तयार व्हावा या उद्देशाने राज्य शासनाने हे पाऊल उचलले आहे. लोकप्रतिनिधींचे समाजाला व गावातील जनतेच्या कल्याणार्थ काहीतरी देणं लागतं, याची जाणीव त्यांना व सोबतच जनतेलाही व्हावी हा यामागचा उद्देश असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. ग्रामविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा करून यासंबंधी प्रस्ताव मुंडे यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिली आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये हा प्रस्ताव लागू केला जाईल.

ग्रामविकास विभागाचा प्रस्ताव 

सरपंच व सदस्यांना शपथ देण्यासंदर्भात परिपत्रक निर्गमित करण्याच्या सूचना प्रधान सचिव, ग्रामविकास यांनी नुकत्याच दिल्या आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ३३(२) अन्वये जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेला अधिकारी पहिल्या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारेल. पहिल्या सभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी अध्यासी अधिकारी थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच यांना शपथ देईल आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, 1964 चा अवलंब करून कार्यवाही सुरू करेल. अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच ग्रामपंचायती मधील नवनियुक्त इतर सदस्यांना सामुदायिक शपथ देतील व त्यानंतर उपसरपंचांची निवडणूक पार पाडली जाणार आहे, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. महासंवाद

ग्रामपंचायत सदस्यांना व सरपंचांना पद व गोपनीयतेची शपथ देण्याच्या प्रस्तावावर चर्चा करताना, सारखेच बदल जिल्हा स्तरावर आणण्याचे मानस असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. सरपंचांप्रमाणेच जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सदस्य, तसेच पंचायत समिती सभापती आणि सदस्य यांनादेखील शपथ देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे त्या म्हणाल्या.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: