धनंजय मुंडे नावाचा झंझावात
“धनंजय मुंडे यांना ‘मुंडे’ हे आडनाव सहज मिळाले असले, तरी पुढे त्यांना मिळालेली अनेक पदं ही त्यांना त्यांचं कर्तृत्व सिद्ध करूनच मिळवावी लागली किंवा मिळाली. त्यांच्यावर झालेल्या कडव्या टीकेचाही त्यांनी अत्यंत संयमाने सामना केला.”
ब्रेनसाहित्य | रविवारीय विशेष
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात परळी मतदारसंघ महत्त्वाच्या स्थानी राहीलं आहे. परळीने अनेकदा राज्यालाच नव्हे, तर अधून मधून दिल्लीच्या तख्तालासुद्धा धक्के दिले आहेत. अनेकांच्या साम्राज्याला सुरुंग लावून ‘गोपीनाथरावजी मुंडे’ नावाचं वादळ गेली अनेक दशकं राजकारणात तुफान घोंगावत राहिलं.
‘शेटजी अनं भटजीचा पक्ष’ म्हणून हिणवलं गेलेल्या भाजपला खऱ्या अर्थाने वाडी, वस्ती, तांड्यावर पोहचवण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं. केंद्रात प्रमोदजी आणि राज्यात गोपीनाथजी हे समीकरण पक्कं जुळलं होतं. मुंडे साहेब सबंध महाराष्ट्राचं राजकारण करत असताना त्यांच्या होम ग्राउंडवर त्यांचे बंधू ‘पंडित अण्णा मुंडे’ यांनी भर भक्कम साथ दिली.
दुसरीकडे, हे सगळं घडत असताना मुंडे परिवारात ‘धनंजय मुंडे’ नावाचं नवं नेतृत्व बाळसं धरायला लागलं होतं. गोपीनाथ मुंडे साहेब, पंडित अण्णा पाठोपाठ धनंजय मुंडेही हळूहळू तालुक्याच्या, जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय व्हायला लागले होते. गोपीनाथ मुंडे साहेब राज्यात अनं धनंजय मुंडे साहेब हे तालुक्यातील गोष्टी सांभाळून त्यांना चांगली साथ द्यायला लागले होते. नगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून धनंजय मुंडे हळूहळू संपूर्ण जिल्ह्यात सक्रिय व्हायला लागले.
त्यांच्यातील नेतृत्त्व गुण बघून भारतीय जनता पक्ष व गोपीनाथ मुंडे साहेबांनी त्यांना हळूहळू राज्याच्या राजकारणात संधी दिली. भाजपच्या युवा मोर्च्याच्या माध्यमातून धनंजय मुंडे हे देखील कमी अधिक प्रमाणात राज्यात सक्रिय व्हायला लागले. त्याचवेळी स्थानिक राजकारणात ही त्यांची घट्ट पकड बसली होती. त्यावेळी गोपीनाथ मुंडे साहेबही हळूहळू दिल्लीच्या राजकारणात सक्रिय व्हायला लागले होते.
सगळं व्यवस्थित चालू असताना शेवटच्या काही काळात मात्र ज्युनिअर मुंडे अनं सिनिअर मुंडे यांच्यात सगळंच आलबेल नसल्याचा प्रत्यय यायला लागला. मुंडे साहेब लोकसभेत गेल्यानंतर विधानसभेच्या वेळी परळीतून धनंजय यांच्या ऐवजी पंकजा ताई यांना संधी देण्यात आली. हळूहळू धनंजय मुंडे वेगळा विचार करू लागले. बऱ्याच दिवस धुसफूस चालू असताना धनंजय मुंडे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली.
यात खरं कारण काय ? चूक कोणाची ? कशामुळे मुंडे कुटुंब फुटले? याविषयी अधिक फक्त मुंडे कुटुंबियांनाच माहीत. पण धनंजय मुंडे यांनी थेट राष्ट्रवादीची वाट धरणं हा मुंडे साहेबांनाच नव्हे, तर त्यांच्या लाखो समर्थकांना, अनेकांना मोठा धक्का होता. धनंजय मुंडे यांच्या मनातही त्यांना डावलल्याची भावना असेल किंवा अनेक दिवसांची इतर काही राजकीय खदखद असेल …!!
मुंडे यांना मानणारा बीड जिल्ह्यातील व बाहेरील मोठा वर्ग धनंजय यांच्यावर नाराज झाला. ज्या मुंडे साहेबांनी शरद पवारांशी संघर्ष केला, त्यांच्या कळपात जाणे हे अनेकांना खटकलं असलं, तरी स्थानिकचे काही अनं इतर काही जिवलग धनंजय मुंडे यांच्याही पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. बंड केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी परळीची नगर परिषद गोपीनाथ मुंडे यांच्या हातातून काढून घेत राष्ट्रवादीच्या ताब्यात नेऊन दाखवली.
विविधांगी लेखांसाठी क्लिक करा : ब्रेनसाहित्य
तसं असलं तरी अनेकांसाठी धनंजय मुंडे हे खलनायक झाले. अनेकांनी त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली. पुढं अनेक छोट्या मोठ्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. भगवान गडावर एकदा त्यांच्या ताफ्यावर दगडफेकही झाली. पण धनंजय मुंडे हे सुद्धा गोपीनाथ मुंडे यांच्यात तालमीत तयार झालेले होते. त्यांनी जवळच्या साथीदारांना घेऊन काम करायचा धडाका लावला. त्यातच पुढं राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवर घेऊन विरोधी पक्षनेते पदावर काम करण्याची संधी दिली. नेमकं याच संधीचं सोनं करत धनंजय मुंडे यांनी लोकांचे काम करत लोकांचे मनं जिकायला सुरुवात केली. त्यांच्या कामाची प्रगती पाहून पवारांनी त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली.
धनंजय मुंडे यांनी आपल्या अभ्यासू, आक्रमक भाषणातून सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही आपली छाप सोडली. त्यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या तुलनेत धनंजय मुंडे यांचे काम उठून दिसायला लागले. त्यांनी अनेकदा शासनाला अनेक मुद्यांवर कोंडीत पकडले. आपल्या भाषणांचा धडाका लावत सगळा महाराष्ट्र पिंजून काढला. स्थानिक पातळीवर परळी मतदारसंघातही चांगल्या प्रकारे संपर्क ठेवला.
धनंजय मुंडे यांना ‘मुंडे’ हे आडनाव सहज मिळाले असले, तरी पुढे त्यांना मिळालेली अनेक पदं ही त्यांना त्यांचं कर्तृत्व सिद्ध करूनच मिळवावी लागली किंवा मिळाली. अनेक दिवस सतत पराभव पाहत राहिलेले धनंजय मुंडे हे पुढे नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा अशा निवडणुकात विजयी होत गेले. त्यांच्यावर झालेल्या कडव्या टीकेचा त्यांनी अत्यंत संयमाने सामना केला. महादेव जानकर यांनी त्यांच्यावर भगवानगडावरून केलेल्या जहरी टीकेला देखील त्यांनी अत्यंत संयमाने हाताळले.
प्रमोद महाजन साहेबांच्या भाषणाचा पगडा मानल्या जाणाऱ्या धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषद ते राज्याच्या कॅबिनेट मंत्री असा खडतर प्रवास विरोधी पक्षनेते पदाच्या मार्गाने अन बारामतीच्या आशीर्वादाने व सहकार्याने सुसह्य केला. येणाऱ्या काळातही ते अनेक महत्त्वाच्या पदावर दिसतील यात शंका नाही.
लेख : शुभम पांडुरंग तांदळे
ट्विटर : @shubhamtandales
ई-पत्ता : tandaleshubham27@gmail.com
Join @marathibraincom
(इथे प्रकाशित होणारे लेख लेखकांच्या हक्काधीन असून, संबंधित साहित्य व विचारांशी मराठी ब्रेन सहमत असेलच असे नाही.)
लेखावरील आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या प्रतिक्रिया चौकटीत नक्की नोंदवा !
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इत्यादी. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहाwww.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर