सौरऊर्जेवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनची चाचणी यशस्वी
ब्रेनवृत्त | जबलपूर
‘कोव्हिड-१९‘ महामारीच्या काळात भारतीय रेल्वे संरचनेच्या दृष्टीने एकामागून एक नवे पाऊल उचलत आहे. भारतीय रेल्वेने बॅटरीवर चालणारे इंजिन तयार केले असून, त्याची यशस्वी चाचणीही केली आहे. त्यामुळे काही दिवसांतच बॅटरीवर धावणाऱ्या रेल्वेगाड्या रुळांवरून धावताना दिसण्याची शक्यता आहे. रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे नवनिर्मित इंजिन वीज आणि डिझेलचा वापर वाचविण्यासाठी तयार केले आहे.
भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे क्षेत्रातील जबलपूर विभागात एक बॅटरीचलित ड्युअल-मोड शंटिंग लोको ‘नवदूत’ तयार करण्यात आले आहे. तसेच, या इंजिनची चाचणी यशस्वी झाली असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. डिझेल वाचविण्याबरोबरच पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी हे बॅटरीचलित लोको म्हणजे एक मोठे यश रेल्वेचे हाती आल्यासारखे आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
सोबतच, भारतीय रेल्वेने सौरऊर्जेच्या माध्यमातून गाड्या चालवण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. यासाठी मध्य प्रदेशातील बीना येथे रेल्वेने सौर उर्जा प्रकल्प तयार केला असून, या प्रकल्पातून 1.7 मेगावॅटची वीज निर्मिती होईल आणि थेट गाड्यांच्या ओव्हर हेडपर्यंत पोहोचेल, असेही रेल्वे विभागाने सांगितले आहे.
या वर्षाअखेरीस दोन रेल्वे स्थानके होणार जागतिक !
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, बॅटरी चालित लोको हे उज्ज्वल भविष्याचे लक्षण आहे, जे डिझेलद्वारे परकीय चलन वाचविण्यास आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी एक मोठे पाऊल असेल. या इंजिनच्या सहाय्याने गेल्या आठवड्यात रेल्वेने 2.8 किमी लांबीची मालवाहतूक रेल्वे चालवून इतिहास रचला. रेल्वे विभागाने या रेल्वेचे नाव ‘शेषनाग’ असे ठेवले आहे. या रेल्वेमध्ये चार इंजिन बसविण्यात आली होती, तर 251 वॅगन घेऊन ट्रेन धावली. यापूर्वी, रेल्वेने 2 किमी लांबीची सुपर अॅनाकोंडा रेल्वे चालवली होती, ज्यात 6000 अश्वशक्तीची क्षमता असणारी 3 इंजिन स्थापित केली गेली. या ट्रेनमध्ये 177 भारित वॅगन होते.