सांग देवा, मी तुझा भक्त का होवू?
अर्थात, निसर्ग हाच आपला सर्वांचा जन्मदाता आहे. तोच सर्वांचा बाप आहे. तोच सर्वशक्तिमान आहे. निसर्गाच्या एका तडाख्यात सारं सारं उध्वस्त होऊ शकते, यात संशय नाही. पण म्हणून ह्या भीतीपोटी मुंगीनं वारूळ बांधूच नये का ? चिमणीनं घरटं आणि माणसानं घर बांधूच नये का ?
ब्रेनसाहित्य | २० ऑगस्ट
देव ही संकल्पना ज्या कुणाच्या मनात सर्वात आधी आली असेल, त्याच्या मनात भीती असावी, कुतूहल असावं की कृतज्ञता, हे नक्की सांगता येणार नाही. पण जेव्हा एखादं फुल उमलताना पाहिलं, तेव्हा त्याला देव आठवला असेल का ? एखादा महापूर, एखादं वादळ, निसर्गाचं रौद्र रूप किंवा एखादा भूकंप पाहून त्याला वाटलं असेल का, की ह्या साऱ्याच्या मागे एक अज्ञात शक्ती आहे ? ह्या साऱ्या घटना आपण नियंत्रित करू शकत नाही. म्हणजेच, कसलीतरी मोठी शक्ती तिच्या मर्जीनुसार हे सारं घडवून आणते ? हे लक्षात आल्यावर माणसाला वाटलं असेल का, की आपण कुणाच्या तरी हातातील खेळणं आहोत ? अचानक आभाळातून वीज पडते आणि ज्यावर पडते त्याचा बघता बघता कोळसा होऊन जातो. हे बघून त्याला वाटलं असेल का, की वर आकाशात कुणीतरी बसलं आहे आणि तीच शक्ती आपल्यावर सतत लक्ष ठेवून आहे? त्याचा कोप झाला की आग लागू शकते, महापूर येवू शकतो, भूकंप होऊ शकतो. आणि मग त्याला काहीतरी नाव द्यायचं म्हणून त्यानं ‘देव’ असं म्हटलं असेल का? ‘गॉड’ म्हटलं असेल का किंवा ‘अल्ला’ म्हटलं असेल? पण पहिला शब्द कोणताही असो, तो निश्चितच निसर्गाला उद्देशून होता याबद्दल शंका नाही.
काळ पुढं सरकत गेला. माणूस अनुभवातून शिकत गेला. त्याबरोबर काही हुशार लोकांना निसर्गचक्राची कल्पना यायला लागली. त्यातल्याच काही धूर्त लोकांनी मग इतरांवर प्रभाव टाकण्यासाठी, आपल्या वर्चस्वासाठी आणि नंतर शोषणासाठी देव या संकल्पनेला जन्म दिला. या देवास त्यांनी आपल्या सोयीनुसार वापरणं सुरू केलं. पण मुळात देव असो, गॉड असो की अल्ला असो, ही संकल्पना निश्चितच निसर्गासाठी होती. त्यात काही चूक होती असंही नाही. नंतर मात्र त्यात बदमाशी घुसली. भेसळ झाली. अंधश्रद्धा आली. भुतप्रेत आले. जादुटोणा आला. चमत्कार आले. एकदा देव आला म्हणजे त्याचा विरोधी पक्षही आला! खरंतर, जग म्हणजे सजीवाच्या जन्मापासून आजपर्यंत अखंड चालू असलेलं अफलातून महानाट्य आहे. माणसानं त्यात विशेष रंगत आणली एवढंच. असंख्य हिरो, असंख्य व्हिलन, असंख्य पात्र आणि असंख्य नाट्यमय घडामोडी.
निसर्ग व्यवहाराचा आधार घेवून देव ही संकल्पना आधी वेगळी काढण्यात आली. सर्वात आधी देव आणि निसर्गाची फारकत करण्यात आली. त्याचे नियम, कायदे, कथा माणसांनीच तयार केले. त्या अर्थानं माणूस हाच देवाचा बाप आहे. देवानं माणूस निर्माण केला नाही. माणसानच देव निर्माण केला. स्वतः माणूसच हा निसर्गाची अद्वितीय निर्मिती आहे.
देव आला, मग त्याचा आणि पर्यायानं आपला दरारा कायम राहावा यासाठी माणसाने धर्म निर्माण केला. पाप, पुण्य, स्वर्ग, नरक अशी आमिषं आणि भीती निर्माण केली गेली. अर्थात, त्यातले जे लोक सभ्य होते, त्यांनी धर्माचा सकारात्मक वापर केला. जे स्वार्थी होते, कपटी होते, त्यांनी दुरुपयोग केला. धर्म असो की कोणतीही व्यवस्था, तीत ह्या दोन्ही प्रवृत्ती प्रत्येक काळात कमी अधिक प्रमाणात असतातच. अगदी अलीकडचीच गोष्ट पाहिली तर, ज्यावेळी गरिबापासून श्रीमंतापर्यंत सारा देश एकजूट होऊन इंग्रजांच्या विरोधात लढत होता, त्याचवेळी काही लोक मात्र इंग्रजांची दलाली करत होते. मालगुजारी, वतनदारी मिळविण्यासाठी सारी नीतिमत्ता गुंडाळून बसले होते. देशाशी गद्दारी करत होते. धर्म हा त्याला अपवाद असू शकत नाही.
स्वतःच्या जगण्यातला आनंद शोधतांना आणि इतरांच्या जगण्यात मिठाचा खडा न घालता, साखर घालण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच ‘धर्म’. देवाचं अस्तित्व मानणारे आणि न मानणारे असे दोन वर्ग जगात आहेत. संतांनी सुद्धा देव आहे म्हणत-म्हणत देव नाकारण्याचाच प्रयत्न त्यांच्या साहित्यातून केला आहे. त्यांनी खरा देव माणूस आणि स्वतःमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला आहे. पण धूर्त लोकांनी प्रत्येक प्रवाह गढूळ करण्याचा नेहमीच प्रयत्न केला. संत-महापुरुषांच्या शिकवणीमध्ये अनेक गोष्टी मुद्दाम घुसवल्या गेल्यात. आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या काळात जर एवढ्या खोट्या गोष्टी पसरवल्या जाऊ शकतात, मग तेव्हा तर रानच मोकळं होतं. महात्मा फुल्यांनी सुद्धा देव नाकारताना ‘निर्मिक’ हा शब्द वापरला. अर्थातच, तो निसर्गाला उद्देशून आहे, यात संशय नाही.
मला स्वतःला ‘उपरवाला’ हा शब्द झकास वाटतो. कारण तो दोघांनाही चालू शकतो. अर्थात, निसर्ग हाच आपला सर्वांचा जन्मदाता आहे. तोच सर्वांचा बाप आहे. तोच सर्वशक्तिमान आहे. निसर्गाच्या एका तडाख्यात सारं सारं उध्वस्त होऊ शकते, यात संशय नाही. पण म्हणून ह्या भीतीपोटी मुंगीनं वारूळ बांधूच नये का ? चिमणीनं घरटं आणि माणसानं घर बांधूच नये का ? मला मूर्तीमधला देव मान्य नाही. मला व्यक्तिपूजा असो की मूर्तिपूजा, मुळीच मान्य नाही. मी कुणाचाही भक्त नाही. होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र दोस्ती ही माझ्यासाठी सर्वोत्तम आनंददायी गोष्ट आहे. दोस्ती एक-दुसऱ्याला समजून घ्यायला शिकवते. सहअस्तित्व मान्य करायला शिकवते.
मला दोस्ती करायचीच झाली, तर निसर्गाशी करीन. किंवा निसर्गासारखा नितळपणा जिथं जिथं दिसेल, तिथं माझ्या मैत्रीला जागा असेल. खऱ्या अर्थानं ‘निसर्ग हाच माझा देव आहे’. तोच माझा अन्नदाता आहे. तोच मला तारणारा आहे आणि तोच मला मारणाराही आहे. त्याशिवाय दुसरा कोणताही देव अस्तित्वात नाही, याची मला खात्री आहे. तसा माझा ठाम विश्वास आहे. देव असलाच, तर तो माणसात आहे. माणसाच्या सेवेत आहे. करूणेत आहे. शुद्ध आचरणात आहे. कुठल्याही पोथीत नाही, पुराणात नाही, पुस्तकात नाही. मंदिरात नाही, मशिदीत नाही, चर्चमध्ये नाही, गुरूद्वारामध्ये नाही. कुठल्याही प्रार्थनेत नाही. तो फक्त आणि फक्त आपल्या आचरणात आहे. प्रार्थना वेगळी आणि आचरण वेगळे, समतेशी विसंगत असेल, कपटी असेल, मनात द्वेष असेल, तर साऱ्या प्रार्थना, साऱ्या प्रतिज्ञा निरर्थक आहेत, बकवास आहेत.
मग देवा सांग, मी तुझा भक्त का होऊ?
वाटले तर छान पैकी दोस्त होऊ…!
लेखक : ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष, लोकजागर अभियान, नागपूर
चलभाष क्र. 9822278988
इथे प्रकाशित होणाऱ्या लेख, साहित्य व विचारांशी मराठी ब्रेन सहमत असेलच असे नाही.
Join @marathibraincom
लेखावरील आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या प्रतिक्रिया चौकटीत नक्की नोंदवा !
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इत्यादी. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.com