लँसेट नियतकालिकेने एचसीक्यू औषधावरील शोधनिबंध मागे घेतला

ब्रेनवृत्त, वृत्तसंस्था 

कोरोना विषाणूबाधित रुग्णांच्या उपचारावर प्रभावी मानल्या जाणाऱ्या ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ (HCQ) औषधावरील शोधनिबंध लँसेट नियतकालिकेने मागे घेतला आहे. लँसेटमध्ये २२ मे रोजी प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात एचसीक्यू औषध कोरोना रुग्णांसाठी घातक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, जागतिक आरोग्य संघटनेने एचसीक्यूच्या चाचण्यांवर बंदी घातली. मात्र, या लेखात दिलेल्या माहितीत कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आल्यानंतर लँसेटने याबाबत माफी मागत हा शोधनिबंध मागे घेतला. तसेच, यानंतर न्यू इंग्लंड वैद्यकीय नियतकालिकेनेही (New England Journal of Medicine) हे संशोधन मागे घेतले आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

लँसेट आणि न्यू इंग्लंड वैद्यकीय नियतकालिक ही दोन्हीही नियतकालिके वैद्यकीत शोधनिबंध प्रसिध्द करतात. दरम्यान, लँसेटने नुकतेच प्रकाशित केलेल्या एका शोधनिबंधात कोरोनाबाधित रुग्णांवर ‘एचसीक्यू’चा अतिवापर हा घातक ठरू शकतो. तसेच, या औषधाच्या अतिवापरामुळे रुग्णांच्या हृदयाचे ठोके अनियमित झाल्याचे म्हटले होते. मात्र, लँसेटमध्ये प्रकाशित झालेल्या शोधनिबंधावर आक्षेप घेत १०० हून अधिक वैज्ञानिकांनी या नियतकालिकातून हा शोधनिबंध हटविण्याची मागणी केली व या नियतकालिकाचे संपादक रिचर्ड हार्टन यांना पत्र लिहून याबाबत आक्षेपही घेतला.

आक्षेप पत्रात शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, या शोधनिबंधात 14 एप्रिलपर्यंत दाखल झालेल्या हजारो रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. म्हणजेच, संशोधकांनी हे संशोधन पाच आठवड्यांत प्रकाशित करण्यास पाठविले जे अशक्य आहे. त्यामुळे या औषधावर घातलेली बंदी हे या औषधाविरुध्द रचलेले षड्यंत्र आहे, हेच सिध्द होते, असेही या पत्रात म्हटले आहे. त्यानंतर लँसेटमध्ये हा विवादित शोधनिबंध प्रकाशित करण्यासाठी लँसेटचे संपादक रिचर्ड हार्टन यांनी माफीही मागीतली. तसेच, ज्या शास्त्रज्ञांनी या शोधनिबंधावर आरोप केले आहेत, त्यांनी केलेल्या संशोधनात रुग्णांची जी माहिती दिली आहे, ती कोणत्या रुग्णालयातून मिळवली त्या रुग्णालयाचे नाव प्रसिद्ध करण्यात आले नसल्याचे म्हटले आहे.

सोबतच, कोणत्याही देशाचे नावदेखील या संशोधनात नाही. ड्यूक क्लिनिक रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ. अॅड्रियन हॅन्डरिस म्हणाले, संशोधनात बरेच गोंधळ आहेत. 671 रुग्णालयांकडून डेटा गोळा केला गेला, परंतु ते रुग्णालय आहे की नाही हे याबाबतच साशंकता आहे.

दरम्यान, लँसेटमध्ये प्रकाशित झालेल्या या शोधनिबंधाच्या लेखकांनी माफी मागितली आहे. तसेच, न्यू इंग्लंड वैद्यकीय नियतकालिकात प्रसिध्द झालेला लेखही मागे घेतला आहे. ” संशोधकांनी त्यांना मिळालेल्या माहितीची कोणत्याची प्रकारची पडताळणी आणि फेरतपासणी केली नाही. तसेच, कोणतेही ठोस विश्लेषण करण्यात ते अयशस्वी ठरले आहेत. परिणामतः या शोधनिबंधातील माहितीच्या सत्यतेची जबाबदारी ते घेऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण लँसेटने दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: