जाणून घ्या लढाऊ विमाने ‘सुखोई-३०एमकेआय’ व ‘मिग-२९’ विषयी

भारतीय हवाई दलाने (आयएएफ) केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे ३३ नवी रशियायी लढाऊ विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती समोर आली आहे. हवाई दलाचा हा प्रस्ताव देशाच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा आहे. नव्या प्रस्तावित विमानांच्या यादीत २१ ‘मिग-२९’ (MiG-29) व १२ सुखोई-३० (Su-30MKI) या लढाऊ विमानांचा समावेश आहे. 

 

ब्रेनबिट्स | लढाऊ विमाने

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीमुळे भारत आणि चीनमध्ये युद्धसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने (आयएएफ) केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे ३३ नवी रशियायी लढाऊ विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती समोर आली आहे. हवाई दलाचा हा प्रस्ताव देशाच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा आहे.

नव्या प्रस्तावित विमानांच्या यादीत २१ ‘मिग-२९’ (MiG-29) व १२ ‘सुखोई-३०’ (Su-30MKI) या लढाऊ विमानांचा समावेश आहे. ही दोन लढाऊ विमाने भारतीय हवाई  दलासाठी इतकी महत्त्वाची का आहेत आणि त्यांची काय काय वैशिष्ट्ये आहेत, याबद्दल आपण जाणून घेत आहोत.

● ‘मिग-२९’ (MiG-29) काय आहे ? 

इ.स १९८६ मध्ये ‘मिग-२९ के’ (MiG-29K) हे लढाऊ विमान भारतीय हवाई दलात सामील झाले. ‘मिग-२९ एस’ या विमानांवर आधारीत ‘मिग-२९ के’ ही नौदलासाठी निर्मिलेली सुधारित आवृत्ती आहे. हे दोन आसनी विमान आहे. युद्धाच्या काळात शत्रूच्या दळणवळण यंत्रणेत अडथळे निर्माण करण्यासाठी जॅमर म्हणूनही याचा उपयोग करता येतो. यामध्ये मागील वैमानिकाच्या आसनाखाली एक जास्तीची इंधन टाकी बसविण्यात आली असून आणीबाणीच्या वेळी इंधन वाहक विमानाची भूमिकाही हे विमान घेऊ शकते.

● विमानाचे स्वरूप 
‘मिग २९ के’ हे एक रशियन बनावटीचे विमान आहे. हे विमान असणारे भारतीय नौदल हे जगातील एकमेव नौदल आहे. या विमानाचा पल्ला ८५० कि.मी. आहे. याचा कमाल वेग २४०० कि.मी. प्रतितास आहे. हवेत उडत असतानाच यात इंधन भरल्यास याचा पल्ला ३५०० कि.मी.पर्यंत वाढतो. जास्तीची इंधन टाकी असल्यामुळे आणीबाणीच्या वेळी इंधन वाहक विमानाची भूमिका बजावते.

Su-30MKI

● विमानाची वैशिष्ट्ये 

‘मिग-२९ के’ भारतीय जहाजांवर तैनात होणार असल्याने हे हवाई दलातील ‘मिग-२९एस’पेक्षा आकाराने लहान आहे. तसेच याचे वजनही तूलनेने कमी आहे. या विमानाच्या पंखांच्या घड्या होत असल्याने ते कमी जागेत उभे करणेही शक्य होते. जहाजावरील मर्यादित धावपट्टीवर उतरणे शक्य व्हावे यासाठी याला आकडे बसविण्यात आले आहेत.

● विमानाची क्षमता 
केएच-३१ ए, केएच-३१ पी, केएच-२९ टी आणि रडार नियंत्रित केएच-३५ ई जहाजभेदी क्षेपणास्त्रे या विमानांत बसविण्यात आली आहेत. आर-६६ आणि आर-७३ ई ही हवेतून हवेतील लक्ष्यावर मारा करणारी क्षेपणास्त्रे ही यावर बसविण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर क्लस्टर बॉम्बस्, व अन्य शस्त्रास्त्रांसह एकूण साडेपाच टन वजनाची शस्त्रास्त्रे हे विमान वाहून नेऊ शकते. यावर ‘जीएसएच-३०१’ ही स्वयंचलित मशीनगन बसविण्यात आली आहे.

● सुखोई-३०एमकेआय (Su-30MKI) 
रशियाच्या सुखोई आणि भारताच्या ‘हिंदुस्तान एअरोनॉटीक्स लिमिटेड’ने तयार केलेले ‘सुखोई एसयू-३० एमकेआय’ हे भारतीय वायुसेनेतील एक बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. हे विमान ‘सुखोई एसयू – ३०’ या विमानाची सुधारित अवृत्ती आहे.

MiG-29

● ‘सुखोई-३०एमकेआय’ची वैशिष्ट्ये 
चालक दल : २
लांबी : २१.९३५ मी (७२.९७ फुट)
पंखांची लांबी : १४.७ मीटर (४८.२ फुट)
उंची : ६.३६ मी (२०.८५ फुट)
पंखांचे क्षेत्रफ़ळ : ६२.० चौरस मी (६६७ चौरस फुट)
निव्वळ वजन : १८,४०० कि.ग्रॅ.
सर्व भारासहित वजन : २६,०९० कि.ग्रॅ.

● ‘सुखोई-३०’ची क्षमता
कमाल वजन क्षमता : ३८,८०० किलो
इंधन क्षमता : ३,२०० किलो
कमाल वेग : कमी उंचीवर – १.२ मॅक (१,३५० किमी/तास)
अति उंचीवर – २ मॅक (२,१०० किमी/तास)
पल्ला : ३,००० किमी
बंदुक : ३० मिमी
उडताना समुद्रसपाटीपासून कमाल उंची : १७,३०० मी

 

टेलिग्राम वाहिनीचे मोफत सभासद व्हा : @marathibraincom

विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: