तिरोडा शहर हादरले; गोंदिया जिल्ह्यात एकाच कुटुंबात चौघांची हत्या!
ब्रेनवृत्त । तिरोडा (गोंदिया)
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात संपूर्ण जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. तिरोडा तालुक्यातील व अगदी शहराला लागून असलेल्या चुरडी गावात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या झाल्याची घटना आज (मंगळवारी) सकाळी उघडकीस आली. तिरोडा पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून, सदर घटना नियोजित हत्याकांड तर नाही ना याचाही तपास केला जात आहे. सदर कुटुंब हे राजकारणात सक्रिय असलेल्या एका स्त्रीचे नातेवाईक असल्याची चर्चा आहे. मृतकांमधील रेवचंद्र डोंगरू बिसेन (वय 51) हे दळणवळण व्यवसायिक (ट्रांसपोर्ट) होते.
तिरोडा तालुक्यानजीकच्या चुरडी गावात एकाच कुटुंबातील चौघेजण मृत्यावस्थेत आढळले आहेत. बिसेन आडनाव असलेल्या या कुटुंबातील मृतकांमध्ये रेवचंद्र डोंगरू बिसेन (वय 51), मालता रेवचंद्र बिसेन (वय 45), पौर्णिमा रेवचंद्र बिसेन (वय 20) व तेजस रेवचंद्र बिसेन (वय 17) या चौघांचा समावेश आहे. मारेकऱ्याने घरातील चिमुकल्यांचाही निर्घृण खून केला असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या हत्येचे मूळ कारण व मारेकरी यांबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. ठाणेदारांच्या माहितीनुसार पोलीस पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा । बावनथडी नदीवरील सोंड्याटोला सिंचन प्रकल्पाचे पंप नादुरुस्तच!
आज सकाळी बिसेन कुटुंबीय घराबाहेर दिसले नाही, त्यामुळे शेजाऱ्यांनी चौकशी केली असता त्यांना तिघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. तसेच एकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळला. त्यानंतर पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली आणि तिरोडाचे ठाणेदार योगेश पारधी, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव व पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी घटनास्थळी पोहचून परिस्थितीचा आढावा घेतला. रेवचंद डोंगरु बिसेन यांच्याकडे ३ मेटॅडोर व एक ट्रॅक्टर आहे. ते रेशनचे धान्य ट्रान्सपोर्ट करण्याचे काम ते करीत होते.
जिह्यात दिवसेंदिवस मृत्यूच्या घटना वाढतच असून, त्यातल्या सामूहिकरित्या लोकांच्या हत्या होण्याच्या घटनाही अलीकडे वाढू लागल्या आहेत.
सहभागी व्हा👉मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in