अमेरिकेचा चीनला भारताच्या हद्दीत घुसखोरी न करण्याचा इशारा !
ब्रेनवृत्त, नवी दिल्ली
देशात एकीकडे कोरोना विषाणूचा कहर वाढत असल्याने देशभर चिंतेचे वातावरण आहे. तर दुसरीकडे, भारताच्या सीमाभागात चिनी सैन्य घुसखोरी करत असून भारताकडूनही या घुसखोरीला योग्य प्रत्युत्तर दिलं जात आहे. त्यामुळे चिनी सैन्याच्या भारतीय हद्दीत अतिक्रमण करण्याच्या प्रयत्नाविरुद्ध अमेरिकाही आता भारताच्या बाजूने उभा राहिला आहे. चीनी सैन्याच्या या घुसखोरी विरोधात चीनला भारताच्या हद्दीत घुसखोरी न करण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे.
अमेरिकेच्या ‘युनायटेड स्टेट्स स्ट्रॅटेजिक अॅप्रोच टू पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना‘ या नावाचा अहवाल अमेरिकन काँग्रेसला सादर केला आहे. व्हाईट हाऊसने सादर केलेल्या आपल्या अहवालात चीन भारतासह सर्व शेजारील देशांमध्ये चिथावणीखोर लष्करी कारवाया करीत आहे. तसेच, अमेरिकी राजदूतांनीही चीन भारतीय सीमांचं उल्लंघन करत असून, तो दिवसेंदिवस इतर देशांसाठी धोकादायक बनत चालल्याचंही म्हटलं आहे.
त्याचप्रमाणे, “चीन जगभरात सामर्थ्यपूर्ण होण्याच्या हेतूने काम करत आहे. तसेच, कोणत्याही देशाला जुमानत नसून, चीन आपली ताकद वाढल्याचं जगाला दाखवत आहे आणि आपल्या शक्तीचा गैरवापर करत आहे. पिवळा समुद्र, पूर्व आणि दक्षिण चिनी समुद्र, तैवान सामुद्रधुनी आणि भारत-चीन सीमेवरील घुसखोरीच्या कृत्यांनी शेजारील देशांना चीन घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे”, असंही व्हाइट हाऊसच्या अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा : लिपुलेख मार्गावर नेपाळच्या आक्षेपामागे चीनचा दबाव
दुसरीकडे, चीनने अमेरिकेचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “अमेरिकेच्या आरोपांत तथ्य नसून, आम्ही सैन्य शक्तीच्या वापराला विरोध करतो. इतर देशांच्या अंतर्गत मुद्यांमध्ये हस्तक्षेप करीत नाही आणि शांततेच्या वाटाघाटीद्वारे सर्व वाद मिटविण्यास कटिबद्ध आहोत”, असे स्पष्टीकरण चीनने दिले आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या दक्षिण व पश्चिम आशियातील प्रमुख कार्यवाह एलिस वेल्स म्हणाल्या की, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया असे समान विचारसरणी असलेले आसियान देशांचे सदस्य चीनच्या चिथावणीखोर आणि त्रासदायक वृत्तीच्या विरोधात एकत्र आले आहेत. चीनला रोखणे आवश्यक आहे. “चीन आपली वाढलेली ताकद दाखवण्याचा वारंवार प्रयत्न करत आहे. त्यामुळे चीनच्या शेजारील देशांना त्याचा धोका वाढत आहे”, असेही एलिस वेल्स यांनी म्हटले आहे. तर, दक्षिण चीन समुद्रातही चीन अशीच दादागिरी करत असून, भूमिका बदलण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे चिनी सैन्याच्या चिथावणीखोरीला समोरे जाण्यासाठी आम्ही कायम भारतासोबत आहोत, असंही अमेरिकेनं चीनला ठणकावलं आहे.
◆◆◆