वंदे भारत मिशनच्या चौथ्या टप्प्यात 170 उड्डाणे
ब्रेनवृत्त, नवी दिल्ली
केंद्र शासनाच्या ‘वंदे भारत मोहिमे’च्या चौथ्या टप्प्याअंतर्गत एअर इंडिया 3 ते 15 जुलै दरम्यान 17 देशांमधून एकूण 170 उड्डाणे करणार आहे. विदेशात अडकलेल्या लोकांना विशेष स्वदेशी उड्डाणांच्या माध्यमातून त्यांच्या निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी शासनाने 6 मे रोजी हे अभियान सुरू केले. कोरोना विषाणू साथीच्या आजारामुळे 23 मार्चपासून भारतातील आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे थांबविण्यात आली आहेत.
मोहिमेच्या चौथ्या टप्प्यात एअर इंडिया 3 ते 15 जुलै या कालावधीत कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, केनिया, श्रीलंका, फिलीपिन्स, किर्गिस्तान, सौदी अरेबिया, बांगलादेश, थायलंड, दक्षिण आफ्रिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, म्यानमार, जपान, युक्रेन आणि व्हिएतनाम या देशांमधील अटी आणि नियमांनुसार १७० उड्डाणे करणार आहे. तर कागदपत्रानुसार, अनुक्रमे इंडो-यूके आणि इंडो-यूएस मार्गांवर एकूण 38 आणि 32 उड्डाणे निश्चित करण्यात आली आहेत. तसेच, भारत आणि सौदी अरेबियामध्ये एकूण 26 उड्डाणे होणार आहेत.
([प्प्रतीनिधिक छायाचित्र)
‘वंदे भारत मोहिमे’चा (Vande Bharat Mission) पहिला टप्पा 7 ते 16 मे दरम्यान होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. तर वंदे भारत मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात ४९५ चार्टर्ड उड्डाणे निश्चित करण्यात आली होती. मोहिमेचा तिसरा टप्पा 10 जून रोजी सुरू झाला असून, तो ४ जुलैला संपत आहे.
दरम्यान, सद्या भारताकडून अमेरिकी वाहकांना भारत-अमेरीका दरम्यान उड्डाण करण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे. यास जशास तसे म्हणून अमेरिकेच्या परिवहन विभागानेही २२ जूनपासून एअर इंडियाला भारत आणि अमेरिका दरम्यान उड्डाणे भरण्यास प्रतिबंधित केले आहे. दुसरीकडे, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी २० जून रोजी दिलेल्या माहितीनुसार, इतर देशांकडून भारतात उड्डाणे सुरू करण्याचे प्रस्ताव आले होते. त्यानंतर भारतानेही अनेक देशांकडून आलेल्या प्रवासाच्या विनंत्या विचारात घेतल्या. त्यानुसार भारत-अमेरिका, भारत-फ्रान्स, भारत-जर्मनी, भारत-ब्रिटन यांच्यात वैयक्तिक ‘द्विपक्षीय हवाई मार्गिका’ (Bilateral Bubbles) स्थापन करण्याची शक्यताही भारत पाहत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
त्याचबरोबर, ‘कोव्हिड-१९’ महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाण महासंचालनालयाने गेले दोन महिने आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद केली होती. त्यानंतर २५ मे पासून काही अटी शर्थी लागू करत देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय विमान प्रवासी वाहतूक सेवा १५ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली असून, काही निवडक आंतरराष्ट्रीय हवाई मार्गिकांनाच परवानगी देण्यात आली आहे.