पुढील १० वर्षांत हिंदूंना शरणार्थी व्हावे लागेल : साध्वी कांचनगिरी

ब्रेनवृत्त । मुंबई


पुढील १० वर्षात भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ शकते आणि तेव्हा हिंदूंना भारतात शरणार्थी व्हावे लागेल, असा दावा साध्वी कांचनगिरी यांनी केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांची मुंबईतील कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतल्यानंतर माध्यमांशी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी हिंदू राष्ट्रासाठी सर्व नेत्यांनी एकत्र यावे असे आवाहनही केले. 

साध्वी कांचनगिरी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, “अफगाणिस्तानचे काय हाल झालेत हे सर्वजण पाहत आहेत. पुढील १० वर्षात भारताचीही स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ शकते आणि हिंदूस्थान या धोक्याच्या काठावर आहे. १० वर्षांनंतर हिंदूंना भारतातच शरणार्थी व्हावे लागेल. आज हिंदू जागे झाले नाही, तर कधीच जागे होणार नाही.” पुढे त्यांनी काश्मीरच्या मुद्यावरून पंडित नेहरू आणि महात्मा गांधींना जबाबदार धरले आहे. 

“काश्मीर आजच नाही, तर खूप आधीपासून जळत आहे. हे सर्व नेहरू आणि गांधीजींमुळे झाले. पाकिस्तानला वेगळं केलं नसतं, तर काश्मीर जळालंच नसतं. अफगाणिस्तान देखील आपलाच होता, मग का फाळणी करण्यात आली? आजच्या अफगाणला आधी कंधारच्या नावानं ओळखलं जात होत,” असेही कांचनगिरी यांनी म्हटले आहे.

वाचा । रामदेवबाबा साधूंना म्हणाले ‘चिलम ओढणे सोडा!’

> संन्याशी लोकांना राजकारणात येण्याचे आवाहन ?

साधू आणि संन्याशी लोकांनाही राजकारणात यायला हवे का? या मुद्यावरही कांचनगिरी  यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  त्या म्हणाल्या, “संतांनी राज्यांचे नेतृत्व केल्याचा भारताला जुना इतिहास आहे. चंद्रगुप्त मौर्य यांचे उदाहरण पाहू शकता, त्यांना चाणक्याने मार्ग दाखवला. त्यानंतर ते यशस्वी राजा बनले. राजकीय नेत्यांना मार्गदर्शन करणे हे संतांचे कामच आहे.”

दरम्यान, सद्या राजकारणात येण्याचा कोणताही विचार नसल्याचे साध्वी कांचनगिरी यांनी स्पष्ट केले आहे. “माझा राजकारणाशी संबंध नाही. पण जे खरे राष्ट्रवादी राजकीय नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वात आम्ही राहू. परंतु सध्या पदाबाबत कोणताही विचार नाही,” असे कांचनगिरी म्हणाल्या.

दुसरीकडे, राज ठाकरे यांचे उत्तर भारतीयांवर खूप प्रेम आहे, हे स्पष्ट करायला कांचनगिरी विसरल्या नाही. त्या म्हणाल्या, “राज ठाकरेंचे उत्तर भारतीयांवर खूप प्रेम आहे. त्याचं म्हणणं आहे, की बिहारमधील गावांमधून लोकांचे स्थलांतर होत आहे. तिथंच कंपन्या सुरू झाल्या, तर लोकांना त्यांच्या गावातच रोजगार मिळू शकतील. त्यांना घर सोडून जावे लागणार नाही. त्यांच्या या भूमिकेचा लोकांनी चुकीचा अर्थ काढला आहे. जितकं प्रेम ते महाराष्ट्रातील लोकांवर करतात, तितकंच प्रेम उत्तर भारतीयांवरही करतात.”

हेही वाचा । हिंदू प्रतिष्ठान मंडळाने समाजकार्य करावे : खा. विजयसिंह मोहिते पाटील

> कोण आहेत साध्वी कांचनगिरी? 

साध्वी कांचनगिरी या जुना आखाड्याशी संबंधित आहेत. त्या महिला संत म्हणून प्रसिद्ध असून, दिल्लीच्या सेक्टर-5 मधील वैशाली येथे राहतात. त्यांनी मधल्या काळात देश बचाओ आंदोलन सुरू केले होते. आता त्यांनी हिंदुराष्ट्राच्या स्थापनेचे अभियान हाती घेतले असून, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यापूर्वी त्यांनी जम्मू-काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्याचीही घोषणा केली आहे. त्या हिंदुराष्ट्र स्थापनेच्या संकल्पनेसाठी कार्यरत आहेत. 

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: