लवकरच व्हाट्सऍप, मेसेंजर आणि इन्स्टाग्राम एकच!

व्हाट्सऍप, मेसेंजर आणि इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांवरील संदेशन प्रणालीला एकीकृत करण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे.

 

मराठी ब्रेन | सागर बिसेन 

३ फेब्रुवारी २०१९

समाजमाध्यमांवर अधिराज्य गाजवणारी फेसबुक कंपनी आता लवकरच ग्राहकांसासाठी एक मोठा बदल घेऊन येत आहे. संदेशनाचा एकीकृत (Merge) पर्याय म्हणून फेसबुकच्या अखत्यारीत असलेल्या व्हाट्सऍप, फेसबुक मेसेंजर आणि इन्स्टाग्राम यांना समक्रमित (Synchronised) करण्यात येणार आहे.

व्हाट्सऍप, मेसेंजर आणि इन्स्टाग्राम यांना एकीकृत करण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे.

समाजमाध्यमांवर संदेशन करणाऱ्या वापरकर्त्यांमधील संवाद अधिक सहज आणि सुरक्षित व्हावा या दृष्टीने फेसबुक लवकरच एका मोठ्या बदल घडवून आणणार आहे.इन्स्टाग्राम, व्हाट्सऍप आणि मेसेंजर प्रणालींना एक करण्याचा विचार फेसबुकने व्यक्त केला आहे आणि तशी अधिकृत सूचनाही फेसबुकतर्फे प्रकाशित करण्यात आली आहे. या बदलामुळे तिन्ही समाजमाध्यमांमधील संवादाची, मेसेजिंग/चॅटिंगची सुविधा एक होणार असून, या प्रणालींचा अंतर्गत संवाद साधणे शक्य होणार आहे. म्हणजेच, व्हाट्सऍप वापरकर्ती व्यक्ती थेट फेसबुकवर (मेसेंजर) असलेल्या व्यक्तीला थेट मेसेज करू शकणार आहे. याप्रकारेच, थेट इन्स्टाग्राम वरून व्हाट्सऍप व मेसेंजरवर, तर मेसेंजरवरून व्हाट्सऍप आणि इन्स्टाग्रामवर मेसेज करणे आता शक्य होणार आहे.

विविध समाजमाध्यमे वापरणाऱ्या व्यक्तींचे लोकेशन, कॉन्टॅक्ट्स व इतर माहिती या प्रणालींमध्ये साठवलेली (सेव्ह) झालेली असते. अशावेळी व्हाट्सऍप, फेसबुक किंवा इन्स्टाग्राम हे प्लॅटफॉर्मस् वापरणारी व्यक्ती एकच आहे याची खात्री पटावी म्हणून आणि अशा व्यक्तींशी इतरांना सहजपणे बोलता यावे, यामुळे हा बदल करण्यात येणार आहे. Reutersविविध माध्यमे हाताळत असलेल्या फेसबुकसारख्या अवाढव्य कंपनीवर खाजगीपणाविषयीच्या असुरक्षिततेचा आरोप भविष्यात होऊ शकतो, म्हणून ही काळजी फेसबुकने घेतली असल्याचे जाणवते.

एकंदरीत, या एकीकरणाच्या पाऊलामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाट्सऍप सारख्या संदेशन प्रणाली अधिक सहजपणे आणि सुरक्षितरीत्या वापरता येतील, असा फेसबुकचा मानस आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: