‘एलएसी’वरील सैन्य चीनने मागे घ्यावे !
ब्रेनवृत्त, १० जून
गेल्या काही दिवसांपासून पूर्व लडाखच्या सीमा भागात ठाण मांडून असलेल्या चिनी सैन्याने अखेर माघार घेतली आहे. चीनी सैन्य भारतीय हद्दीजवळील गलवान खोरे विभागातील तीन ठिकाणांसह अडीच ते तीन किलोमीटर मागे हटले आहेत. मात्र, हा वाद पूर्णपणे मिटविण्यासाठी चीनने ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या (पीएलए) 10,000 सैनिकांना ‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषे’तून (LAC : Line of Actual Control) मागे घ्यावे, अशी भूमिका भारताने घेतली आहे. याबाबत आज दोन्ही देशाच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा चर्चा होणार आहे.
सरकारी सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, “भारताचा विश्वास संपादन करण्यासाठी चीन सैन्याने भारतीय हद्दीजवळ तैनात केलेल्या सैन्याच्या तुकड्या शस्त्रास्त्र, तोफाही मागे घेणे गरजेचे आहे. तसेच, पूर्व लद्दाख प्रदेशात चीनी सैन्याने माघार घेतली आहे, परंतु एलएलसीमधून त्याचे १०,००० हून अधिक सैनिक मागे घ्यावे, अशीही आमची इच्छा आहे.” चीनी सैन्याने माघार घेणे ठीक आहे, परंतु चीनी सैन्याने त्या भागात तैनात केलेल्या तोफा, लढाऊ वाहने, टँक त्वरित काढून टाकल्यानंतरच दोन्ही देशातील सीमेवरील तणाव कमी होणार आहे.
हेही वाचा : लिपुलेख मार्गावर नेपाळच्या आक्षेपामागे चीनचा दबाव
दरम्यान, गेल्या महिन्यात ४ मेपासून चीनी सैन्याच्या भारतीय लष्कराविरोधात लहानसहान शाब्दिक चकमकी सुरु होत्या. त्यामुळे सीमेवरील वातावरण प्रचंड तणावपूर्ण झाले होते. तसेच, चीनी सैन्याने गस्त बिंदूच्या पलीकडे सुमारे एक बटालियन आकाराच्या तुकडीइतके सैन्य, लढाऊ वाहने आणि अवजड वाहने तैनात केली होती. होतान आणि गर गुणसा हवाईतळावर लढाऊ विमान आणि लढाऊ बॉम्बर तैनात केले आहेत.
हेही वाचा : चीन भारताशी असलेले मतभेद वादात बदलणार नाही
“येत्या दहा दिवसांत याबाबत बटालियन पातळी, ब्रिगेड पातळी आणि मेजर जनरलस्तरीय चर्चा होणार असून, यात भारतीय बाजूने अनेक मुद्दे मांडण्याची अपेक्षा आहे. तसेच, बटालियन कमांडर स्तरावर सैन्याच्या माघार घेण्याच्या मुद्याबाबत चर्चा होईल”, असेही सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.