आयन परिक्षाकेंद्र व्यवस्थापनाची परिक्षार्थ्यांना प्रवेशास मनाई!
न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड च्या परीक्षेसाठी परिक्षाकेंद्र असलेल्या आयन डिजिटल, रामटेकडी, हडपसरच्या व्यवस्थापनाने परीक्षार्थी वेळेवर न पोहचल्याचे सांगत, पेपर सुरू होण्याआधीच गेट बंद करून विद्यार्थ्यांना पेपर देण्यास नाकारले.
प्रतिनिधी
पुणे, ३० जानेवारी
‘न्यू इंडिया इन्शुरन्स लिमिटेड’च्या विविध पदांसाठी ऑनलाइन परीक्षा द्यायला आलेल्या विद्यार्थ्यांना उशिरा आलेल्याचे कारण सांगत आयन डिजिटल, रामटेकडी, हडपसर या परिक्षाकेंद्राच्या व्यवस्थापनाने परिक्षार्थ्यांना प्रवेश नाकारला. पुणे व पुण्याबाहेरून परीक्षा द्यायला आलेल्या विद्यार्थ्यांना उशिरा आल्याचे सांगत गेट बंद करून व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना आतमध्ये प्रवेशच दिला नाही. प्रवेश नाकारण्यात आलेल्या या विद्यार्थ्यांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड च्या सामान्य व विशिष्ट प्रशासकीय अधिकारी व अन्य पदांसाठी ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी आयन डिजिटल झोन, सहयोग डिजिटल हब, रामटेकडी, हडपसर, पुणे या परीक्षा केंद्रावर पुणे व पुण्याबाहेरून परीक्षार्थी आले होते. मात्र, व्यवस्थापनाने परीक्षा द्यायला आलेल्या विद्यार्थ्यांना उशिरा आल्याचे सांगत प्रवेश नाकारला व परीक्षाही देऊ दिली नाही. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर दुपारी १२:०० अशी परीक्षा केंद्रात प्रवेश करण्याची वेळ आहे. मात्र, पेपरचा वेळ दु. १ ते २:०० असा होता. काही विद्यार्थ्यांना वाहतूक, बस आणि परीक्षाकेंद्र शोधण्यात झालेल्या धावपळीमुळे यायला १२:३० वाजलेत, असे त्यांचे म्हणणे आहे. तरीपण विद्यार्थ्यांचे काहीही न ऐकून घेता, विद्यार्थ्यांनी योग्य ते कारण सांगितल्यावरही परिक्षा व्यवस्थापनाने दोन्ही मुख्य गेट बंद करून आतमध्ये येऊच दिले नाही. मुलांच्या विनंत्या मान्य न करता, उलट विद्यार्थ्यांना धक्के देत बाहेर काढण्यात आले.
परीक्षा द्यायला आलेल्या, पण प्रवेश नाकारण्यात आलेल्या या विद्यार्थ्यांमध्ये दिव्यांग (दृष्टी नसलेल्या) उमेदवारांचाही समावेश आहे. यापैकी एका विद्यार्थ्याने सांगितले की, “आम्ही साडेबारापर्यंत पोहचलो होतो, मात्र तरीही परीक्षा केंद्रावरील व्यवस्थापनाने आधीच गेट बंद करून आम्हाला आता येऊ दिले नाही. एकतर सेन्टर खूप दूर आणि खूप आतमध्ये आहे. त्यातच ट्राफिकमुळे लवकर पोहचणे शक्य झाले नाही. मात्र इथे विनवणी करूनही आम्हाला आतमध्ये येऊ दिल्या जात नाही आहे.”
आकुर्डी, निगडी, अहमदनगर, पुणे आणि पुण्याबाहेरील भागांतून मुले पेपर द्यायला आली होती. मात्र परीक्षा केंद्रावरील लोकांनी पेपर सुरू व्हायला अर्धा तास उरलेला असताना सुद्धा विद्यार्थ्यांना आत येऊ दिले नाही. उलट विद्यार्थ्यांना धक्के देऊन बाहेर काढू लागले. यामुळे अनेक विद्यार्थी आज परिक्षेपासून मुकले. कित्येक विद्यार्थ्यांनी हे परीक्षाकेंद्र नकोच असायला, इथे सतत असाच त्रास होतो असे म्हटले आहे. “आम्हाला परीक्षेसाठी नगरचा केंद्र म्हणून पर्याय म्हणून उपलब्ध नसल्याने मी पुण्याला आले. याआधीही हाच सेन्टर मला मिळाला होता. खरंतर, हे सेन्टर खूप बाहेर आहे आणि इथे वेळेवर पोहचताच येत नाही. येथील प्रशासनही योग्य नसून, नेहमी मुलांना त्रास होत असतो. हे ठिकाण परीक्षा केंद्र म्हणून असायलाच नको.”
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या विनंत्या ऐकून घेण्यासही व्यवस्थापनाची माणसे गेटपर्यंत आली नाहीत आणि विद्यार्थ्यांचे म्हणणेही ऐकून घेतले नाही. परीक्षा सुरू व्हायला अर्धा तास उरलेला असताना सुद्धा बहुतांश विद्यार्थ्यांना बाहेरच राहावे लागले व यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, औरंगाबाद अशा ठिकाणांहून परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले.
◆◆◆